शनिवार, 1 नवंबर 2014

मनसेच्या पराभवामागे मोठे कारस्थान- राज

राज ठाकरे; टोल वसुलीसाठी "कॅशलेस‘ व्यवहाराची मागणी कायम
नगर - ‘विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदरी पडलेल्या अपयशाचा सध्या खोलात जाऊन विचार सुरू आहे. पराभवाचे बहुतांशी विश्‍लेषण झाले आहे. त्यात पक्षाचा, पदाधिकाऱ्यांचा किंवा कार्यकर्त्यांचा काहीच संबंध नाही. त्यामागे मोठे कट-कारस्थान आहे. राज्याचा दौरा पूर्ण झाल्यानंतर त्याबद्दल सविस्तर बोलू,‘‘ असे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सांगितले.

नगर येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, की राज्यातील टोल बंदच करा, अशी आमची मागणी कधीच नव्हती. राज्यातील अनेक रस्त्यांची कामे "बीओटी‘ तत्त्वावर झाली. त्यांच्या पैशाच्या वसुलीसाठी टोल नाके सुरू करण्यात आले. करारानुसार वसुली झाली असेल, ते नाके बंद करावेत, ही आमची भूमिका होती.‘‘

रस्त्यांवरून जाणारी वाहने किती, त्यातून ठेकेदाराला किती पैसे मिळतात, याचा हिशेब होत नाही. या संदर्भात सरकारकडे निश्‍चित अशी आकडेवारी नाही. म्हणून कॅशलेस व्यवहाराची पद्धत सुरू करण्याची मागणी आम्ही केली, असे सांगून राज म्हणाले, ‘कॅशलेस व्यवहार झाला, तर येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची, त्यापोटी वसूल झालेल्या कराची निश्‍चित आकडेवारी हातात मिळेल. त्यातून करवसुलीस किती दिवस परवानगी द्यायची, हे नक्की करता येईल, ही आमची भूमिका आजही कायम आहे. त्यासाठी जगातील कोणत्याही देशाची कार्यपद्धती राज्य सरकारने स्वीकारावी. ‘‘

फोनवरून दिल्या शुभेच्छा!
नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभ्यासू व चांगल्या स्वभावाचे आहेत. त्यांच्या नवीन सरकारला फोनवरून शुभेच्छा दिल्याच आहेत, असे सांगून राज म्हणाले, ‘वीस मिनिटांच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहूनच शुभेच्छा देता येतात का? त्याचे राजकीय भांडवल करू नका. मी सरकारचे फोन करून अभिनंदन केले आहे.‘

मंगलवार, 28 अक्तूबर 2014

देवेंद्र फडणवीस असणार राज्याचे नवे मुख्यमंत्री

मुंबई- भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर आज (मंगळवार) शिक्कामोर्तब झाले. फडणवीस हे राज्यातील सर्वांत कमी वयाचे दुसरे मुख्यमंत्री असणार आहेत.

देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदावर निवड व्हावी यासाठी मांडलेल्या प्रस्तावात एकनाथ खडसे हे सूचक तर सुधीर मुनगंटीवर व पंकजा मुंडे यांनी अनुमोदन दिले. फडणवीस हे राज्यपाल विद्यासागर राव यांची आज सांयकाळी सहा वाजता भेट घेऊन, सत्ता स्थापन करण्यासाठी दावा करणार आहेत.

भाजपच्या विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यासाठी आज मुंबईत दुपारी चार वाजता बैठक झाली. भाजपचे निरीक्षक केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आणि राज्याचे प्रभारी सरचिटणीस जे. पी. नड्डा, माजी प्रभारी राजीव प्रताप रूडी आणि ओमप्रकाश माथूर आदी बैठकीला उपस्थित होते.

तत्पूर्वी, विधिमंडळ पक्षनेता आणि भावी मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांचे नाव आघाडीवर होते. याबरोबरच एकनाथ खडसे, पंकजा मुंडे-पालवे यांचीही नावे चर्चेत होती. पण, फडणवीस यांचे नाव जवळपास निश्‍चित मानले जात होते.

महाराष्ट्रात बहुमतासाठी भाजपला 23 जागांची गरज असून, पुन्हा शिवसेना व भाजप हे दोन्हीही पक्ष एकत्र येऊ शकतात, असे बोलले जात आहे. मात्र, सत्तेत वाटा मिळण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिवसेनेच्या सूचनांवर सावध पवित्रा घेताना भाजपने "विनाशर्त पाठिंब्याची मागणी केली आहे. प्रसंगी अल्पमताचे सरकारही बनविले जाऊ शकते, असेही भाजपच्या गोटातून सांगितले जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने नव्या सरकारच्या विश्‍वासदर्शक ठरावावरील मतदानादरम्यान अनुपस्थित राहण्याची हमी दिल्यामुळे सत्तेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बाहेरून पाठिंबा घ्यावा की जुना मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे सहकार्य घ्यावे, यावर भाजपने ‘थांबा आणि वाट पाहा‘चे धोरण स्वीकारले आहे. पक्षाचे केंद्रातील नेते उघडपणे यावर काहीही बोलण्यास तयार नाहीत. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना‘मधून पाठिंब्याबाबत स्पष्टपणे संकेत देण्यात आले आहेत.