रविवार, 9 मई 2010

पाणी पुरविण्यापेक्षा रक्त काढण्यातच काही पक्षांना रस

पाणी पुरविण्यापेक्षा रक्त काढण्यातच काही पक्षांना रस Bookmark and Share Print E-mail
राज ठाकरे यांची शिवसेनेवर बोचरी टीका
नवी मुंबई, ९ मे/प्रतिनीधी

मुंबईसह देशात सध्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट रूप धारण करत असताना राज्यातील राजकीय पक्षांना या प्रश्नापेक्षा वह्या वाटप, फळवाटप आणि रक्तदान शिबिरांसारख्या कार्यक्रमांमध्ये अधिक रस आहे, अशी बोचरी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाशी येथे आयोजित एका कार्यक्रमात शिवसेनेवर केली. मुंबईत पाणी माफियांचे अक्षरश थैमान सुरू असताना काही पक्षांना जनतेला पाणी देण्यापेक्षा लोकांचे रक्त काढण्यातच अधिक रस आहे, असा टोलाही राज यांनी यावेळी शिवसेनेला यावेळी लागविला.
नवी मुंबईतील शिवशाही माथाडी कामगार मित्र मंडळ या संस्थेच्या दशकपूर्ती सोहळ्याचे औचित्य साधून वाशी येथील विष्णुदास भावे नाटय़गृहात आयोजित करण्यात आलेल्या एका सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून राज ठाकरे उपस्थित होते. मुंबईसह राज्यातील शहरी भागांमध्ये सध्या मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला आहे. हे लक्षात घेता आता वेगवेगळ्या सामाजिक संघटनांनीही पाणी बचतीसाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे, असे आवाहनही राज यांनी यावेळी केले. सध्या जलवाहिन्या फोडून पाणी चोरीचे प्रकार मोठय़ा प्रमाणावर वाढीस लागले आहेत. शहरांमध्ये मोठय़ा प्रमाणावर अनधिकृत झोपडय़ा उभ्या राहू लागल्या आहेत. मध्यंतरी मुंबईतील कन्नमवार नगर येथे मोठय़ा प्रमाणावर झोपडय़ा उभ्या राहू लागल्याने आपण तेथील विभाग अधिकाऱ्यांना दूरध्वनी केला. त्या विभाग अधिकाऱ्याने मला जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यास सांगितले. जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडे बोट दाखविले. अशा प्रकारे स्वतच्या जबाबदाऱ्या दुसऱ्यावर ढकलण्यात प्रशासन गुंतले असून यामुळे अनधिकृत झोपडय़ांचे अक्षरश पेव फुटू लागले आहे, अशी टीकाही राज यांनी केली.