सोमवार, 24 अप्रैल 2017

मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी 'ठाकरे' हवेच !

राजकारणात फार रोखठोक भूमिका घेऊन चालत नाही. थोडा थंडा करके खाओ ! असे बोलले जाते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे स्पष्ट आणि रोखठोक विचार मांडण्यासाठी प्रसिद्ध होते. 'पोटात एक आणि ओठात ऐक' हे त्यांना आयुष्यभर जमले नाही. जे नाही पटत ते बोलून मोकळे होत असत. परिणामाची चिंता ते कधी करीत बसले नाहीत. त्यांच्या ज्वलंत विचाराने राज्यात एक पिढी भारावून गेली. ते आज आपल्यात नसले तरी त्यांचे विचार कदापि पुसले जाणार नाहीत. प्र. के. अत्रे काय किंवा बाळासाहेब ठाकरे काय, त्यांची या ना त्या कारणाने आठवण होत असते. त्यांच्या लेखणीने आणि वाणीने अनेकांना घायाळ केले.
मराठी माणूस हा शिवसेनेचा आत्मा आहे हे बाळासाहेब अखेरपर्यंत सांगत राहिले. मराठी माणसाच्या मुद्यावर त्यांनी कदापी तडजोड केली नाही. हिंदुत्व वैगेरे नंतर आले. मराठी माणूस हीच शिवसेनेची ताकद होती आणि आज माहीत नाही. 
बाळासाहेबांच्या रोखठोकपणाची आज अचानक आठवण आली ती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामुळे. महापालिका निवडणुकीत मनसेने सपाटून मार खाल्यानंतर या पक्षाने मुंबईत चिंतन बैठक घेतली. या बैठकीत थोडी गरमागरम चर्चा झाल्याची वार्ता कानोकानी पसरली. पराजयाचे खापर नेत्यांनी राज यांच्यावर फोडल्याचे तर माझा विचार लोकांपर्यंत पोचविण्यात नेते अपुरे पडल्याचे राज यांचे म्हणणे होते. पराजयानंतर टीकेचे धनी प्रत्येक पक्षाला आणि नेत्याला व्हावे लागते. त्यामध्ये तसे काही नवीन नाही.
राजकारणाच्या रणांगणात उतरल्यानंतर कोणी एक जिंकणार आणि कोणी तरी पराभूत होणार हे आलेच. पराभव झाला म्हणून कोणी संपत नाही. तो फिनिक्‍स पक्षाप्रमाणे उसळी घेऊ शकतो. आपण इंदिरा गांधीचे नेहमीच याबाबतीत उदाहरण देत असतो. आणीबाणीत धूळदाण उडूनही त्या पुन्हा सत्तेवर आल्या. या रणरागिनीच्या मनात जिद्द आणि पराजय पचविण्याची हिंमत होती. इंदिरा गांधींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पराजय पचविण्याची हिम्मत प्रत्येक नेत्याने ठेवली पाहिजे. 
देशात आज मोदींची लाट आहे. या लाटेविरोधात दोन हात पुढे करण्याची हिंमतही विरोधकांनी दाखवायला हवी. नुसतीच टीका करण्यापेक्षा जो नेता रस्त्यावर उतरेल. जो लढेल तोच हिरो होईल. मोदींविरोधात वातावरण निर्मिती करण्याची तयारी ठेवा. मात्र त्यासाठी आपण आणि आपले चारित्र्य स्वच्छ असायला हवे. सरकारने तुम्हाला ईडीची भीती दाखवता कामा नये. 'कर नाही तर डर कशाला' असे म्हणणारे नेते हवेत. मला वाटते ती हिम्मत पृथ्वीराज चव्हाण, राजू शेट्टी, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे यांच्यात नक्कीच आहे. स्पष्ट आणि स्वच्छ विचार न डगमगता मांडायला हवेत. भाजप काय पुढील शंभरवर्षे सत्तेवर राहण्यासाठी जन्माला आला आहे का ? याचा विचार करायला हवा. 
अंतर्गत राजकारण काही असो. त्यांच्यातील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. नेते नाराज आहेत. पक्षाचे काय करायचे आणि कोणती भूमिका घ्यायची याचा निर्णय तो पक्ष घेईल.
राजगडावरील बैठकीत राज ठाकरे यांना त्यांच्या नेत्यांनी मराठीचा मुद्दा बाजूला ठेवून सर्वांनाच बरोबर घेण्याविषयी सांगितले. त्यावर राज यांनी मराठीचा मुद्दा अजिबात सोडणार नाही. लोकांनी मला मते दिली नाहीत तरी चालेल असे स्पष्टपणे सांगितले ही स्वागतार्ह बाब आहे. शेवटी कुठेतरी पक्षाची ध्येयधोरणे असतातच ना! मराठीचा मुद्दा घेऊन जो पक्ष जन्माला आला त्या मुद्यालाच तिलांजली कशी देऊन चालेल! मताच्या लाचारीसाठी तडजोड करण्याचे कारणच काय हा प्रश्‍न उतरतोच. आज जागतिकीकरणात मराठीचा मुद्दा चालणार नाही असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.
मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी ज्या शिवसेनेचा जन्म झाला ती हिंदूत्वाकडे वळली. एकाचवेळी मराठी आणि हिंदूही अशी भूमिका घेऊन ती पुढे चालली आहे. पण मुंबई पालिकेच्या निवडणुकीत मराठी माणसं सोडली तर इतर प्रांतातील किती हिंदूंनी शिवसेनेला मते दिली हा ही संशोधनाचा भाग आहे. आज आपण काही म्हटले तरी अर्धीच मुंबई मराठी माणसाची आणि अर्धी परप्रांतीयांची आहे हे मान्य करावेच लागेल. मराठीचा मुद्दा सोडायचा नाही ही राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका योग्यच आहे. मराठी माणसाला कोणी तरी वाली हवाच. महाराष्ट्रात मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी 'ठाकरे' हवेच अशी प्रत्येक मराठी माणसाची भूमिका असायला हवी. मग तो पक्ष मनसे असेल की शिवसेना?