शनिवार, 8 अक्तूबर 2016

मावळतो तो पुन्हा उगवतोही - राज ठाकरे

पुणे - ‘राज ठाकरे आता मावळला‘, असं काहींना वाटतं; पण जो मावळतो तो उगवतोही. हे, लक्षात ठेवा,‘‘ अशा नेमक्‍या शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कॉंग्रेसचे नेते नारायण राणे यांना उत्तर दिले. राज विझला, असं कोणी म्हंटल नाही. हे बरं झालं, अशी कोटीही त्यांनी या वेळी केली.

मुंबई, पुण्यात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर राणे यांनी ठाकरे यांच्यावर नुकतीच टीका केली होती. त्याला ठाकरे यांनी खास आपल्या शैलीत उत्तर तर दिलंच. शिवाय, राणे यांचं व्यंग्यचित्र रेखाटून त्यांचा स्वभावही त्यातून दाखवला.

ठाकरे म्हणाले, ‘राजकारण हा माझ्या जगण्याचा मुद्दा नाही. त्यावर अवलंबून नाही. खरंतर राजकारणाकडं मी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतो. हा माझ्या "पॅशन‘चा विषय आहे. जगभरात ज्या चांगल्या गोष्टी पाहतो, तशा आपल्याकडे होऊ शकतात, याचा सतत विचार करत असतो. ते करून दाखवण्याची तयारीही आहे.‘‘ नगरसेवक, आमदार कोणाच्या लक्षातही राहत नाहीत. नव्वद टक्के लोकांचा त्यांच्याशी कधी संबंधही येत नाही; पण हे लोक मतदार असतात. त्यांनी मत दिलेले असते. शहरात सुधारणा व्हावी, अशी त्यांची अपेक्षा असते. ती पूर्ण करणं ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. ती विसरता कामा नये. लोकप्रतिनिधींनी काम केले तर खरोखरच शहर बदलू शकते. त्यासाठी इच्छाशक्ती दाखवायला हवी,‘‘ असेही ते म्हणाले.