शनिवार, 12 फ़रवरी 2011

मनसेची 'कोकणी जोडा' मोहीम

मनसेची 'कोकणी जोडा' मोहीम
-
Saturday, February 12, 2011 AT 12:30 AM (IST)

मुंबई - कोकणातील मुंबईकर "चाकरमान्या'चे कार्ड शिवसेनेने मुंबई व कोकणातील गावात आजवर यशस्वीपणे वापरले आहे. हा फॉर्म्युला आता मनसेदेखील अजमावणार आहे. यासाठी मनसेने "कोकणी जोडा' मोहीम हाती घेतली आहे. कोकणात सध्या ऐरणीवर असलेल्या विविध विषयांवर आक्रमक आंदोलन करून कोकणवासीयांची मने जिंकण्याची व मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत त्याचे ऍडव्हान्टेज पदरात पाडून घेण्याच्या दृष्टीने मनसेने रणनीती आखली आहे.

मनसेतर्फे गुरुवारी परळ येथील शिरोडकर सभागृहात रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चाकरमान्यांचा मेळावा झाला. मनसेचे नेते आमदार बाळा नांदगावकर, आमदार प्रवीण दरेकर, आमदार शिरीष सावंत, सरचिटणीस व प्रवक्ते शिरीष पारकर, आमदार मंगेश सांगळे, शिल्पा सरपोतदार आदींसह कोकण व मुंबईतील प्रमुख कार्यकर्ते मेळाव्याला उपस्थित होते. "मनसे'च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन कार्यकर्त्यांच्या कुटुंबातील महिलांचे अनोळखी व्यक्तींनी खून केले. त्या प्रकरणांचा तपास करण्यात पोलिस अपयशी ठरल्याने या प्रकरणांची सखोल चौकशी व्हावी, या मागणीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार "मनसे'च्या वतीने 17 फेब्रुवारीला ओरस येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या निमित्ताने "मनसे' कोकणात शक्तिप्रदर्शन करणार आहे. राज यांच्या आदेशावरून होणारा हा मोर्चा साजेसाच झाला पाहिजे, अशा सूचना नांदगावकर यांनी मेळाव्यात कार्यकर्त्यांना दिल्या. कोकणातील माती भुसभुशीत असताना मनसेला अद्याप तिथे जास्त शिरकाव करता आला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. लोकांना अन्य पक्ष नको आहेत. त्यांना मनसे हवी आहे; पण आपले कार्यकर्ते पक्ष वाढवायचा सोडून स्वत: मोठे होण्यात गुंतले आहेत, अशा शब्दांत नांदगावकर यांनी कार्यकर्त्यांना कानपिचक्‍या दिल्या; तर गावातल्या प्रश्‍नांवर आंदोलन उभे करून पक्षाचा डोलारा कार्यकर्त्यांनी उभा केला पाहिजे, असे दरेकर यांनी सांगितले.
मुंबईत स्थायिक असलेल्या कोकणवासीयांनी गावात संपर्क वाढवला पाहिजे. कोकणातील स्थानिक प्रश्‍नावर, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रश्‍नावर कार्यकर्त्यांनी लढा देऊन कोकणी जनतेच्या मनात मनसेबद्दल विश्‍वास निर्माण केल्यास कोकणात मनसेला जम बसवता येईल, असे मत मनसेच्या नेत्यांनी या वेळी व्यक्त केले. मनसेचा 2014 मध्ये कोकणात आमदार निवडून येईल, या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू असल्याचे मनसेचे कोकणातील संपर्कप्रमुख शिरीष सावंत यांनी स्पष्ट केले.

कोकणी माणसाच्या मनाचा ठाव घेण्यात मनसे यशस्वी झाल्यास शिवसेनेप्रमाणे मनसेलाही मुंबई महापालिका निवडणुकीत फायदा होऊ शकतो, असा मनसेच्या धुरिणांचा कयास आहे. यासाठी मनसेने "मिशन कोकण' सुरू केले आहे

मंगलवार, 8 फ़रवरी 2011

रेल्वेतील मराठी टक्‍क्‍यांसाठी नवी "राज'नीती

रेल्वेतील मराठी टक्‍क्‍यांसाठी नवी "राज'नीती
पंकज जोशी - सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, February 09, 2011 AT 05:15 AM (IST)
 
पुणे - पदार्पणातच रेल्वेमधील मराठी "टक्‍क्‍या'बाबत आक्रमक भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता हा मराठी टक्का वाढवण्यासाठी विधायकतेची कास धरत राज्यातील तरुणांकडून रेल्वे परीक्षेचे फॉर्म भरून घेण्याची नवी "राज'नीती आखली आहे. पुढील वर्षात होणाऱ्या चार महापालिकांच्या निवडणुकांना सामोरे जाताना आपला फॉर्म टिकवण्यासाठी "मनसे'ने ही "फॉर्मनीती' आखल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

रेल्वेमध्ये लवकरच स्पर्धापरीक्षेद्वारा दहा हजार कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. त्यात "मराठी टक्का' वाढविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विधायक राजकारणाचा नवा फंडा मनसेने शोधला आहे. तरुणांकडून रेल्वेपरीक्षेचे फॉर्म भरून घेण्यासाठी सध्या राबवल्या जाणाऱ्या अभियानाचा भाग म्हणून पुणे, मुंबईसारख्या महानगरांपासून ते थेट सासवड, खेडसारख्या तालुक्‍यांच्या गावापर्यंत मनसेतर्फे केंद्र उघडण्यात आले आहे. तिथे परीक्षाफॉर्म उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात मनसेच्या कार्यालयांव्यतिरिक्त रेल्वे व बस स्थानकांवर ता. 6 ते 8 फेब्रुवारी या कालावधीत सुरू असलेल्या या केंद्रांवर फॉर्म भरण्यासाठी इच्छुक तरुणांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. एकट्या पुणे जिल्ह्यात एक लाख फॉर्मचे वाटप झाले, तर पहिल्याच दिवशी 27 हजार तरुणांचे भरलेले परीक्षाफॉर्म प्राप्त झाले. तरुणांचा प्रतिसाद पाहता, येत्या दहा तारखेपर्यंत फॉर्म भरून घेण्याचे काम सुरू राहणार आहे.
प्रत्येक केंद्रावर फॉर्म कसा भरावा, यासाठी एक माहीतगार व्यक्ती उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय पुण्यात आणि मुंबईत फॉर्मसंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच, स्पर्धापरीक्षांच्या फॉर्ममध्ये त्रुटी राहून ते बाद होऊ नयेत यासाठी मनसेने 120 तज्ज्ञांच्या खास पथकाची नेमणूक केली आहे. राज्यातील सर्व फॉर्म भरून झाल्यानंतर त्यांपैकी बिनचूक फॉर्म एकत्र करून "राजगड' या मुंबईतील मनसेच्या मुख्य कार्यालयात पाठविण्यात येतील. तेथे पुन्हा तज्ज्ञांकडून त्या फॉर्मची छाननी होईल आणि मगच ते रेल्वे भरती बोर्डाकडे पाठविण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त मराठी तरुणांची परीक्षेसाठी निवड व्हावी, या उद्देशाने मनसेतर्फे अशी विविध बाजूंनी काळजी घेण्यात येत आहे. विशेष म्हणजे पूर्वी महाराष्ट्रात रेल्वेची परीक्षा द्यायला येणाऱ्या परप्रांतीयांविरोधात मनसेने यापूर्वी आक्रमक भूमिका घेतली होती. रेल्वे परीक्षेतील भाषिक मुद्‌द्‌याचा प्रश्‍नही त्यांनी लावून धरला होता. त्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी रेल्वेची परीक्षा सर्व प्रादेशिक भाषांमध्ये घेण्याचे आश्‍वासन दिले होते.
पूर्वी रेल्वेभरतीत केवळ शे-दोनशे मराठी तरुणांची निवड व्हायची. यंदा हा आकडा पाच हजारांपेक्षाही जास्त होणार असल्याचा अंदाज मनसेचे पदाधिकारी व्यक्त करत आहेत. या संदर्भात मनसेचे राज्य सरचिटणीस अनिल शिदोरे म्हणाले, ""आम्ही मराठी बांधवांच्या हितासाठी चांगली कामे करत राहणार आहोत. रेल्वे, विमा, यांसारख्या केंद्रीय नोकऱ्यांमध्ये मराठी माणसाच्या जागा वाढविण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. त्याला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. येत्या 9 मार्चला मनसेच्या स्थापनेला पाच वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर असे विधायक उपक्रम राबविल्याने संघटनात्मक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण व्हायला मदत होत आहे.''
रेल्वेच्या दहा हजार जागांपैकी जास्तीत जास्त जागांवर जर मराठी तरुणांची निवड झाली, तर त्याचा मनसेच्या संघटनात्मक पातळीवर सकारात्मक परिणाम होण्याची शक्‍यता मनसेला वाटते आहे. आगामी काळात मुंबई, पुण्यासह चार महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. मनसेच्या या उपक्रमामुळे या निवडणुकांमध्ये मनसेला राजकीय फायदा होणार का, याबाबत राजकीय निरीक्षकांमध्ये मात्र तर्कवितर्क लढविले जात आहेत.

औरंगाबादमध्ये राज ठाकरेंना जामीन मंजूर

औरंगाबादमध्ये राज ठाकरेंना जामीन मंजूर
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, February 08, 2011 AT 03:00 AM (IST)
 
औरंगाबाद - एसटी महामंडळाच्या बसवर झालेल्या दगडफेक प्रकरणी आज (मंगळवार) झालेल्या सुनावणीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आठ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.
 
आज दुपारी दोन वाजता राज ठाकरे यांना औरंगाबाद न्यायालयासमोर हजर झाले असता त्यांची जामीनावर मुक्तता करण्यात आली. परप्रांतीयांच्याविरुद्ध आंदोलन प्रकरणात राज ठाकरे यांना अटक झाल्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. औरंगाबादमध्ये सुद्धा एसटी महामंडळाच्या बसवर दगडफेक झाली होती. त्यामध्ये बसचे चालक फिर्यादी नानासाहेब भुसारे यांच्या फिर्यादीवरून छावणी पोलिस ठाण्यात राज ठाकरे यांच्यासह सात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दगडफेकीत बसचे एकूण दहा हजार रुपयांचे नुकसान झाले होते.

मुंडे यांनी उचलली की सुपारी!

मुंडे यांनी उचलली की सुपारी!
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, February 08, 2011 AT 12:15 AM (IST)
 
मनसेला युतीमध्ये आणण्याची सुपारी गोपीनाथरावांनी उचलली असली, तरी अशी समीकरणे परिस्थितीतून येतात, हेही त्यांना नागपूरच्या चिंतन शिबिरात सांगितले जाईल.

गोपीनाथ मुंडे यांना जेव्हा मोठ्या आत्मविश्‍वासाने बोलायचे असते, तेव्हा ते केसांवर कंगवा तर फिरवतातच; पण चक्क इंग्रजीतून बोलायला लागतात. रविवारी औरंगाबादमध्ये पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत समारोपाचे भाषण करताना ते इंग्रजीत म्हणाले, "पॉलिटिक्‍समध्ये नथिंग इज इम्पॉसिबल आणि इम्पॉसिबलला पॉसिबल करण्यासाठी गोपीनाथ मुंडेच पाहिजे असतील, तर त्याला कोण काय करणार?' अर्थात हे मुंडे यांचे इंग्रजी आहे आणि ते राष्ट्रीय पातळीवर पोहोचल्यानंतर जरा जास्तच वाढले आहे. मराठी माणसाचे राजकारण करण्यासाठी ते इंग्रजीत आत्मविश्‍वासाने बोलले ते "मनसे'संदर्भात. देश पातळीवर राहूनही त्यांनी महाराष्ट्राचा अभ्यास केला, तेव्हा त्यांच्या लक्षात आले, की मनसेमुळे युतीचा पराभव झाला. यापुढे तो टाळायचा असेल, तर मनसेला भाजप- शिवसेना युतीबरोबर घ्यायला पाहिजे. आता सर्वांच्याच दृष्टीने ही गोष्ट तूर्त तरी "इम्पॉसिबल' आहे. ठाकरे घराण्यातील मोठ्या पातीचे आणि धाकट्या पातीचे जुळणार काय, हा मुख्य प्रश्‍न आहे. राज ठाकरे नुसते भाजपच्या कार्यालयात गेले, तरी मोठ्या पात्याने किती थयथयाट केला होता! आता मनसे जर युतीतच येणार म्हटल्यावर काय होईल? राजकारणात अशक्‍य काहीच असत नाही, हे जसे खरे तसे बऱ्याच वेळेला शक्‍यही असत नाही, हेही खरे आहे. भाजप राजकीय अस्पृश्‍यता पाळत नाही, असे अनेकदा सांगितले जाते; पण भाजपबाबतची अस्पृश्‍यता पाळणारे काही कमी नाहीत हेही खरे. गोपीनाथांना हे सारेच माहीत आहे; पण पक्षांतर्गत खुंटी बळकट करण्यासाठी ते अचाट शक्तीचे प्रयोग करायला तयार होतात. १९९६ मध्ये भाजपचे सरकार केंद्रात तेरा दिवसांसाठी सत्तेवर होते. बहुमताची प्रचंड अडचण होती. त्या वेळी गोपीनाथांचे राजकीय गुरू असलेले प्रमोद महाजन म्हणाले होते, की थैल्या खोलल्यावर पाठिंब्यासाठी लाइन लागेल. महाजन यांच्या निर्धाराला पाठिंबा देणारे गोपीनाथ तेव्हा उपमुख्यमंत्री होते. प्रत्यक्षात पाठिंब्यासाठी लाइन लागलीच नाही आणि शेवटी सरकार पडले. इम्पॉसिबलचे इम्पॉसिबलच राहिले. मनसेने युतीच्या मांडवात बॅंड लावूनच काय; पण गुपचूप येणे सहजशक्‍य नाही. भाजपने जरी ठरवले तरी उत्तर भारतात हिंदी मतांचे काय करायचे? मूठभर मतांसाठी सूपभर मते गमवायची काय, असा प्रश्‍न निर्माण झाला, तर स्वाभाविकच भाजप सुपाकडेच धाव घेईल. युतीच्या मंडपात जाण्यासाठी मनसे आपली स्वतःची भूमिका सोडून देण्याची शक्‍यता नाही. समजा अशक्‍याचे शक्‍य झाले आणि मनसेचे इंजिन भाजपच्या तंबूत शिट्टी वाजवत घुसलेच, तर धनुष्यबाणाचे काय होईल? हे सारे माहीत असूनही गोपीनाथांनी स्वतःच जाहीर करून सुपारी उचलली. त्यामागे उद्धव ठाकरे यांना अस्वस्थ करण्याचा हेतूही असतो, राजकीय गणितही असू शकते. कदाचित भाजपनेही त्यास मौनात जाऊन मान्यता दिली असेल.

गोपीनाथांना पक्षीय खेळात फार मोठे मैदान सध्या तरी उरलेले नाही. म्हणून की काय सचिनला कॅप्टन करू नका; पण टीममध्ये तरी घ्या, असे ते कधी वळणाने, तर कधी आडवळणाने सांगत आहेत. आपण सचिन आहोतच, हेही ते रेटून नेत आहेत. पण, राजकारणात कधी कधी धावा न काढणारी मंडळीही विजय मिळवून देत असतात. हेही गोपीनाथांना माहीत आहेच, तरीही ते मोठी आव्हाने स्वीकारायला तयार होत आहेत. युतीमध्ये इंजिनाला वाट करून देणे, हे त्यापैकी एक. मनसेचे आमदार निलंबित झाले तेव्हा नाथांचा म्हणजे गोपीनाथांचा धर्म कुठे होता, असा प्रश्‍न मनसेवाल्यांनी चटकन विचारून टाकला, तर अशक्‍य शक्‍य करण्यासाठी गोपीनाथांनीच आमच्या पक्षात यावे, असे शिवसेनावाले म्हणून गेले. राजकारणातील शक्‍य- अशक्‍यतेमधील अंतर बऱ्याच वेळा कोणा एका व्यक्तीची शक्ती नव्हे, तर त्या-त्या वेळची परिस्थिती कमी करत असते. जसे की, कॉंग्रेसने डाव्यांचा पाठिंबा घेऊन सरकार चालवणे, कर्नाटकात भाजप आणि देवेगौडा यांनी एकत्र येणे किंवा केंद्रात भाजपने बावीस पक्षांची मोट बांधणे किंवा महाराष्ट्रातील "पुलोद'चा प्रयोग. आता असेही सांगितले जाईल, की गोपीनाथ इतके महाशक्तिशाली आहेत, की तेच परिस्थिती निर्माण करतील आणि बुद्धिबळाच्या पटावर स्वतःला हवी तशी सोंगटी मांडतील. या अशा पटावर प्यादेही राजाला मारू शकते, हेही त्यांना कळते, तरीही अशक्‍याचे रूपांतर शक्‍यतेमध्ये करण्यासाठी आपल्याशिवाय कोण आहे, असा एक चकवा प्रश्‍न त्यांनी विचारला आहे. कुणी सांगावे शक्‍य- अशक्‍यतेच्या या भानगडीवरच नागपूरच्या शाळेत भाजप एखादे चिंतन शिबिर भरवेल. हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवायला सांगून त्यांना ते ऐकवले जाईल.

रविवार, 6 फ़रवरी 2011

"मनसे'शी युतीचे गोपीनाथ मुंडे यांचे संकेत

"मनसे'शी युतीचे गोपीनाथ मुंडे यांचे संकेत
सकाळ वृत्तसेवा
Monday, February 07, 2011 AT 12:44 AM (IST)
 

औरंगाबाद -  "महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला युतीत आणणे अवघड असले, तरी राजकारणात अशक्‍य काहीच नसते. अशक्‍य ते शक्‍य करण्यासाठीच गोपीनाथ मुंडे लागतो,'' अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, खासदार गोपीनाथ मुंडे यांनी आज येथे आगामी राजनीतीचे संकेत दिले.

भाजपच्या राज्य कार्यकारिणी बैठकीचा समारोप श्री. मुंडे यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी बोलताना मुंडे म्हणाले, की खरे तर मागील निवडणुकीतच जनतेने युतीच्या बाजूने कौल दिला होता. लोकांना कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसची भ्रष्ट सत्ता नको होती. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लढविलेल्या 53 जागांवर त्यांना व युतीला मिळालेली मते विजयी उमेदवारांच्या मतांपेक्षा अधिक होती. 13 जागांवर "मनसे'चे उमेदवार विजयी झाले. याचाच अर्थ आपण 110 वर पोचलो असतो. त्यामुळे येत्या काळात समविचारी पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवावी लागेल. यापुढे महाराष्ट्रात कोणत्याही एका पक्षाला सत्तेत येणे शक्‍य नाही.''

श्री. मुंडे यांनी तासाभराच्या भाषणात राज्य व केंद्र सरकारमधील भ्रष्टाचारावर जोरदार टीका केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांबाबत अवमानकारक विधान केल्याबद्दल त्यांचा निषेध केला. त्यांनी पत्रकारांची बिनशर्त माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.

ते म्हणाले, की राज्यात माफियांचे राज्य आहे. आघाडीची सत्ता उलथवून टाकण्याचा संकल्प करूया. संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीचे सरकार आले, तेव्हा सर्वत्र सोनिया गांधी यांच्या त्यागाची चर्चा होती. त्या वेळी राष्ट्रपतींनी केलेल्या अभिभाषणात शंभर दिवसांत महागाई कमी करू, विदेशातील बॅंकांत असलेला भारतीयांचा पैसा परत आणू व स्वच्छ, प्रामाणिक, पारदर्शी सरकार देऊ, या घोषणा केल्या होत्या. त्यापैकी एकही पूर्ण झालेली नाही.
केंद्रात झालेल्या टेलिकॉम घोटाळ्यामागे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग व सोनिया गांधी यांचाही हात असल्याचा आरोप श्री. मुंडे यांनी केला.

सुधीर मुनगंटीवार यांनी अध्यक्षीय समारोप केला. ते म्हणाले, की 14 मार्च रोजी भाजपच्या वतीने मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय झाला आहे. आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडण्याचा संकल्प करा. गावागावांत हा संदेश पोचवा. माफियाराज हटाओचा नारा घेऊन सर्व शक्तीने तयारीला लागा. प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे, पांडुरंग फुंडकर, खासदार रावसाहेब दानवे, प्रकाश जावडेकर, किरीट सोमय्या, विनोद तावडे, माजी मंत्री हरिभाऊ बागडे, श्रीकांत जोशी, रमापती त्रिपाठी, जिल्हाध्यक्ष सुरेश बनकर, शहराध्यक्ष बसवराज मंगरूळे, रघुनाथ कुलकर्णी, व्ही. सतीश आदी उपस्थित होते.

अशोक चव्हाण यांची आघाडी
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पन्नास आमदारांसह विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार नाकर्ते, नादान आहे. त्यामुळे आता आपल्याला कधी नव्हती एवढी अनुकूलता आहे. त्याचा फायदा घेऊया. सत्तेतून संपत्ती मिळविणाऱ्यांसोबत आपली असमान लढाई आहे. त्यासाठी तयारीला लागा, असा संदेशही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.

मुंडेंचे वक्तव्य सत्तेसाठी - पारकर मुंबई - मराठी माणसांच्या हितासाठी उभे राहण्याऐवजी केवळ सत्तेचे राजकारण करण्यासाठी व सत्ता मिळविण्याच्या हेतूनेच भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी वक्तव्य केले असावे, असे मत "महाराष्ट्र नवनिर्माण सेने'चे सरचिटणीस शिरीष पारकर यांनी व्यक्त केले.

मराठीच्या मुद्द्यावर मनसेच्या हजारो कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या लाठ्या-काठ्या खाल्ल्या. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर लोकशाहीच्या विरोधात भाषणबंदी घालण्यात आली, तसेच जेव्हा मनसेच्या चार आमदारांचे निलंबन झाले तेव्हा मुंडे कुठे होते? तेव्हा मात्र त्यांनी कुठलीही भूमिका मांडली नव्हती, मग आजच त्यांना मनसेची आठवण कशी झाली, असा सवालही पारकर यांनी केला.

मनसे हा स्वतंत्र पक्ष आहे, या पक्षाला आपले विचार व धोरण आहे. गेल्या चार वर्षांत राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने प्रगती केली आहे, त्यामुळे मनसेने कोणाबरोबर जावे व मनसेने कुणाशी युती करावी, याचे भाष्य मुंडे यांनी करू नये. तो सर्वाधिकार आमचे अध्यक्ष राज ठाकरे यांचाच आहे, असेही पारकर यांनी स्पष्ट केले.

..तर मुंडेही शिवसेनेत येऊ शकतात - राऊत
मुंबई - "राजकारणात अशक्‍य काहीच नसते', असे वक्तव्य करून शिवसेना व भाजपच्या युतीमध्ये मनसेचाही समावेश होऊ शकतो, असे संकेत देणाऱ्या मुंडे यांना आज शिवसेनेनेही ठाकरी भाषेत उत्तर दिले. "जर राजकारणात अशक्‍य काहीच नसते, तर मुंडेही शिवसेनेत येऊ शकतात,' असे भाकीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज केले.

ते म्हणाले, ""शिवसेना व भाजपची युती गेल्या दोन दशकांची आहे व शिवसेना कोणाबरोबर युती करणार व कोणासोबत जाणार याचा निर्णय मुंडे नव्हे, तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हेच घेत असतात, हे बहुधा ते विसरले असावेत.''

राजकारणात काहीही अशक्‍य नसते व कधीही काहीही घडू शकते, हे आम्हालाही माहीत आहे, त्यामुळे संभाव्य राजकीय समीकरणाबद्दल विधाने करणारे मुंडे हे कधीही शिवसेनेत येऊ शकतात.