सोमवार, 2 अगस्त 2010

वांद्य्राच्या भूखंडावर कोण बिल्डर येतो ते पाहूच - राज

वांद्य्राच्या भूखंडावर कोण बिल्डर येतो ते पाहूच - राज
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, August 03, 2010 AT 12:45 AM (IST)
 

मुंबई - अनधिकृत झोपड्यांमध्ये राहणाऱ्यांना सरकार अधिकृतपणे घरे बांधून देते; पण वर्षानुवर्षे सरकारी वसाहतीत राहणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले जात आहे. वांद्य्राचा भूखंड कोणा तरी बिल्डरला देऊन टाकला आहे; पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकाही सरकारी कर्मचाऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही. मग त्या भूखंडावर कोण बिल्डर येतो ते मी पाहतोच, असा सज्जड इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिला.

शिवडी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात विचार मांडताना राज ठाकरे म्हणाले, की सरकारी कर्मचारी इमानेइतबारे सरकारी सेवा करतात; पण निवृत्त झाल्यावर हेच सरकार त्यांना घराबाहेर काढते, अनधिकृत झोपडीवाल्यांना "एसआरए'च्या योजनेत पक्की घरे देते, वांद्रे येथील सरकारी कर्मचाऱ्यांनी स्वतःहून तेथे घरे विकत घेण्याची तयारी दर्शविली असतानाच सरकारला त्यांची फिकीर नाही. कारण- राज्यकर्ते व मराठी पुढारी बिल्डरांच्या मागे ठामपणे उभे राहत असल्याची टीकेची झोडही त्यांनी उठविली.

मराठीचा मुद्दा आम्ही महाराष्ट्रात उठविला, तर आम्ही संकुचित, असे स्पष्ट करतानाच त्यांनी सांगितले, की हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे नरेंद्र मोदी यांच्या तोंडातून आता हिंदुत्वाचा हिं तरी निघतो का? मोदी यांनी गुजरातमध्ये गुजराती अस्मिता काढली की ते चालते कर्नाटकात त्यांच्या भाषेची अस्मिता चालते; मग महाराष्ट्रातच फक्त मराठीची अस्मिता का नको, असा सवालही त्यांनी केला.

उत्तर प्रदेशात निवडणूक लढविणारे पंडित जवाहरलाल नेहरू हे तेथून विजयी झाल्यानंतर विजयी झाले. ते जवळजवळ 15 ते 17 वर्षे पंतप्रधान होते. त्यानंतर उत्तर प्रदेशातून विजयी झालेल्या इंदिरा गांधी यासुद्धा 14 ते 15 वर्षे पंतप्रधान होत्या. त्यानंतर संजय गांधी, राहुल गांधी, सोनिया गांधी सर्वच जण उत्तर प्रदेशातून विजयी झाले; मग इतक्‍या वर्षांत त्यांनी उत्तर प्रदेशाचे भले का नाही केले, असा सवाल करतानाच उत्तर प्रदेशातील परप्रांतातील लोक आजही महाराष्ट्रात का येतात? 1991 ते 2001 च्या जनगणनेनुसार सुमारे 20 ते 22 लाख उत्तर प्रदेशातील लोक महाराष्ट्रात आले आहेत. यंदाच्या जनगणनेत हा आकडा आणखीन वाढेल, असेही त्यांनी या वेळी नमूद केले.

या प्रसंगी शिवडीचे आमदार बाळा नांदगावकर यांनी, आपण आजारपणामुळे गेले काही महिने तुम्हाला वेळ न दिल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. आता मी माझा वेळ तुमच्यासाठी देणार आहे. त्यामुळे तुमच्या मनातील किंतु-परंतु काढून टाका, असेही नांदगावकर यांनी नमूद केले.

Raj thakre 9.7.10 part 2

रविवार, 1 अगस्त 2010

लोंढ्यामुळेच मुंबईत मलेरियाची साथ

लोंढ्यामुळेच मुंबईत मलेरियाची साथ
सकाळ वृत्तसेवा
Monday, August 02, 2010 AT 12:30 AM (IST)
  i

राज ठाकरेंची टीका; "मनविसे'चा चौथा वर्धापनदिन उत्साहात
मुंबई  - मुंबईत मोठ्या प्रमाणात लोढ्यांचे आक्रमण होत आहे. या लोढ्यांच्या गलिच्छ वस्त्यांमुळेच मलेरियासारखे आजार झपाट्याने पसरत चालले आहेत. मुंबईतील हॉस्पिटल्सही या लोंढ्यांनी भरली आहेत. येथील मराठी माणसांना उपचाराकरिता आता जागा नाही. या लोंढ्यामुळेच मुंबईचा सत्यानाश होताय अशी सडेतोड टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केली.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. मुंबईत यापूर्वीही साथीचे रोग आले होते, पण आताची परिस्थिती वेगळी आहे. बाहेरचे लोंढे मुंबईत खुशाल येतात. येथेच अनधिकृत झोपड्या बांधतात व अस्वच्छता करतात, त्यांच्या या गलिच्छपणामुळेच मुंबईत आजार पसरत आहेत. या प्रकरणी महापालिका सरकारवर जबाबदारी ढकलते तर, सरकार पालिकेवर ढकलाढकली करत आहे, अशी टीकेची झोडही ठाकरे यांनी उठविली.

शिक्षणक्षेत्रातही परप्रांतियांनी ऍडमिशनसाठी गर्दी केली आहे; असे सांगतानाच ते म्हणाले, की महाराष्ट्रात अल्पसंख्याकांसाठी कॉलेज उघडली जात आहेत. मराठी मुलाला या कॉलेजमध्ये ऍडमिशन हवे असेल तर पैसे मागितले जातात व पैसे नसतील तर, मराठी मुलाला येथे ऍडमिशन मिळत नाही.

तमिळनाडूत नुकतेच तमिळ भाषिकांचे भव्य संमेलन झाल्याचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले, की या संमेलनात विद्यार्थ्यांचे इंजिनीअरिंगपर्यंतचे शिक्षण तमिळ भाषेतून करण्याचा निर्णय झाला. पण महाराष्ट्रात दहावीपर्यंत संपूर्ण मराठी करण्यासाठी येथील राज्यकर्त्यांसमोर धडपड करावी लागते. सरकारच्या या बोटचेप्या धोरणामुळेच शिक्षणाची वाट लागली आहे.

हॉटेल चायनीज पण, भाषा स्वीस
युरोपियन संमेलनाच्या निमित्ताने आपण नुकतेच स्वित्झर्लंड येथे गेलो होतो. तेथील लोक भाषेसाठी किती कडवट असतात याचा किस्सा सांगताना ते म्हणाले, ""आम्ही हॉटेल शोधत होतो, तेवढ्यात एक चायनीज रेस्टॉरन्ट मिळाले. तेथे गेलो व मेन्यू कार्ड मागविले तर, त्यातील भाषा ना इंग्रजीतून होती ना अन्य दुसऱ्या भाषेतून. त्यामध्ये स्वीस भाषा होती. म्हणजे स्वित्झर्लंडमध्ये चायनीज हॉटेल असले तरी, तेथील भाषा मात्र त्यांचीच स्वीस भाषा. याला म्हणतात भाषेचा अभिमान. पण आपण मात्र भाषेचा अभिमान धरत नाही.''

याप्रसंगी "शिक्षण 2020' या विषयावर मान्यवरांचा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यामध्ये प्राचार्या मीनाक्षी वाळके, प्राध्यापक विजय तापस, पराग माहुलीकर, प्राचार्य अजित नाईक, "सकाळ मुंबई'चे कार्यकारी संपादक पद्मभूषण देशपांडे, राजेश देव आदींनी आपली भूमिका मांडली.