मंगलवार, 20 मई 2014

स्वप्नांची पूर्ती हीच आपली जबाबदारी - मोदी

नवी दिल्ली - भारतीय लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसदेमधील ऐतिहासिक सेंट्रल हॉल येथे आज (मंगळवार) नव्याने निवडून आलेल्या सर्व भाजप खासदारांना ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी व भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांचे विशेष आभार मानत पक्षाचे संसदीय नेते नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. माजी पंतप्रधान व ज्येष्ठ भाजप नेते अटलबिहारी वाजपेयी यांचीही आठवण काढत मोदी यांनी संवेदनशील भूमिका मांडली. यावेळी अटलजी यावेळी येथे असते; तर सोन्याहून पिवळे झाले असते, अशी भावना मोदी यांनी व्यक्त केली.

'मोदी यांना भाजपवर कृपा केली, असा शब्दप्रयोग ज्येष्ठ भाजप नेते अडवानींनी केला. मात्र त्यांनी असा शब्दप्रयोग करु नये, अशी माझी त्यांना विनंती आहे. माझ्या आईप्रमाणेच भाजप हीदेखील माझी आईच आहे. मुलगा आईवर कृपा करत नसतो; तर आईची समर्पित भावनेने केवळ सेवा करत असतो. ही पक्षाचीच कृपा आहे; की मला पक्षाची सेवा करण्याची संधी दिली आहे,' अशी भावना अश्रु अनावर होत असताना मोदी यांनी व्यक्त केली.

मोदी उवाच -

- देशातील सर्व घटकांचा विचार करणारे व त्यांच्यासाठीच जगणारे सरकार आवश्‍यक असून ही प्रचंड जबाबदारी पार पाडण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन. आज आपण लोकशाहीच्या या मंदिरामध्ये सव्वाशे कोटी देशवासीयांच्या आशा आकांक्षाचे प्रतिनिधित्व करतो आहोत. ही प्रचंड जबाबदारी पार पाडण्यासाठी आपणांस स्वत:ला पूर्णत: समर्पित करावे लागेल.

- पंतप्रधान पदाच्या उमेदवारीच्या सोपविण्यात आलेल्या जबाबदारीनंतर मी एका कार्यकर्त्याच्या भावनेमधून काम करण्यास सुरुवात केली. 15 सप्टेंबर रोजी मी हा परिश्रम यज्ञ सुरु केला व 10 मेला निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर भाजप अध्यक्षांची भेट घेऊन त्यांना एका सैनिकाच्या भूमिकेमधून पूर्ण अहवाल सादर केला! मी केवळ एका कार्यकर्त्याच्या भूमिकेमधून जगलो.

- गुजरातचा मुख्यमंत्री झाल्यानंतरच मी मुख्यमंत्री कार्यालय पाहिले व विधानसभा पाहिली. आजही असेच झाले आहे! कदाचित माझ्या आयुष्यात असेच लिहिले असेल...

- देशास स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या व त्यासाठी अविरत झटलेल्या सर्व महापुरुषांना मी प्रणाम करतो. मी भारताच्या संविधानकर्त्यांना प्रणाम करतो. त्यांच्यामुळेच आज येथे लोकशाहीचा विजय झाला आहे. एका गरीब कुटूंबामधून आलेली व्यक्ती आज या स्थानी उभी आहे, हेच भारतीय लोकशाही व संविधानाचे खरे यश आहे.

- या निवडणुकीमध्ये कोणाचा जय वा पराजय झाला, ही बाब आता गौण आहे. भारताच्या सामान्य नागरिकामध्येही एका नव्या आत्मविश्‍वासाचा संचार या निवडणुकीमध्ये झाला आहे; हेच या निवडणुकीचे खरे यश आहे. हे नवे सरकार गरीबांना, देशामधील कोट्यवधी तरुणांना, देशातील माता भगिनींना समर्पित आहे. देशाच्या प्रत्येक घटकास हे सरकार समर्पित आहे. माझ्या प्रचारादरम्यान मी एका नव्या भारतास पाहिले आहे. अंगावर एकच वस्त्र असलेल्या परंतु तरीही खांद्यावर भाजपचा झेंडा असलेल्या गरीबास मी पाहिले आहे. यामुळे भारतीयांच्या स्वप्नांची पूर्ती हीच आपली जबाबदारी आहे, हे भान ठेवून आचरण हवे.

- भूतकाळातील सरकारांनी काहीच चांगले काम केले नाही, असे मी मानत नाही. गतकाळातील सरकारांनी केलेली चांगली कामे पुढे नेणे आवश्‍यक आहे.

- भाजपला संपूर्ण बहुमत देण्याचा अर्थ म्हणजे देशाच्या आशा व आकांक्षांस मत असा आहे. आता जबाबदरीचा कालखंड सुरु झाला आहे.

- हा देश स्वतंत्र झाल्यानंतर आम्ही जन्माला आलो. देशासाठी झुंजून वीरमरण पत्करण्याची संधी आम्हाला मिळाली नसेल; मात्र देशासाठी जगण्याचे अहोभाग्य आम्हाला जरुर मिळाले आहे!

- निराशा नको! 2001च्या विनाशकारी भूकंपानंतर उध्वस्त झालेला गुजरात पुन्हा एकदा नव्या जोमाने चालवायास लागला. निराशा सोडून नवी मार्गक्रमणा करावयास हवी. देशातील सव्वाशे कोटी भारतीयांनी केवळ एक पाऊल चालले तरी देश सव्वाशे कोटी पाऊले प्रगती करेल! आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमाविणाऱ्या भारतीयांना केवळ एका संधीची आवश्‍यकता. या नव्या सरकारला अशा संधी पुरवायच्या आहेत.

- देशातील सगळ्यांचा विकास हवा; मात्र सगळ्यांचे योगदानही हवे.

- माझ्या सहकाऱ्यांच्या साथीने व ज्येष्ठ भाजप नेत्यांच्या आशीर्वादाने हा देश पुढे नेऊ

- परिश्रमांची पराकाष्ठा करु व देश पुढे नेऊ. पुढील दोन वर्षांमध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे शताब्दीवर्ष आहे. 'आचार परमो धर्म' या उपाध्याय यांच्या जीवनमूल्याचा विकास अधिकाधिक कसा होईल,याचा विचार होणे आवश्‍यक आहे. भारताच्या दरिद्रिनारायणाची सेवा हेच या मूल्यांचे उद्दिष्ट आहे.

- देशातील कोट्यवधी जनतेने एका व्यक्तीस वा एका पक्षास जिंकून दिले नाही; तर भारताचे स्थान जगामध्ये एका वेगळ्या उंचीवर नेण्याची संधी प्राप्त करुन दिली आहे.

- ज्येष्ठ भाजप नेत्यांच्या खांद्यांवर बसल्यानेच मी मोठा दिसतो आहे. पक्षामध्ये पाच पिढ्या अविरत खपल्यानंतर आज हे दिवस दिसले आहेत. या सर्वांना माझे नमन आहे. या तपस्येमुळेच आज आपण सर्व येथे आहोत. संघटन हीच भाजपची ताकद आहे. आपल्या सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन.

मोदी संसदेच्या पायऱ्यांवर झाले नतमस्तक!

नवी दिल्ली - संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये प्रथमच प्रवेश करत असलेले भावी पंतप्रधान संसदेच्या पायऱ्यांवर नतमस्तक होऊन सभागृहात आले.

लोकसभा निवडणुकीत बडोदा आणि वाराणसीमधून निवडून आल्यानंतर मोदी प्रथमच संसदेत पोचले आहेत. तसेच त्यांची भाजपकडून भावी पंतप्रधान म्हणून घोषणा करण्यात आल्याने ते संसदेत पहिल्यांदाच थेट पंतप्रधान म्हणून प्रवेश करत आहेत. यापूर्वी त्यांनी गुजरात विधानसभेत थेट मुख्यमंत्री म्हणूनच प्रवेश केला होता. 

आज सकाळी गुजरात भवनामधून संसदेत पोहचलेले मोदी गाडीतून उतरताच पहिल्यांदा सभागृहाच्या पायऱ्यांवर नतमस्तक झाले. त्यानंतर त्यांनी नमस्कार करून संसदेत प्रवेश केला. संसदेत त्यांचे सर्व निवडून आलेल्या खासदारांनी स्वागत केले व संसदीय नेतेपदी त्यांची निवड करण्यात आली. 

Shree Narendra Modi gets Emotional crying