शुक्रवार, 26 फ़रवरी 2010

महाराष्ट्र म्हणजे मराठी भाषाच - राज ठाकरे

महाराष्ट्र म्हणजे मराठी भाषाच - राज ठाकरे
सकाळ वृत्तसेवा
Saturday, February 27, 2010 AT 12:40 AM (IST)


मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाचा दुसरा टप्पा हा मराठी भाषेच्या आग्रहाचा असणार आहे. महाराष्ट्र म्हणजे मराठी भाषाच हे समीकरण मनसे करून दाखविणार आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील प्रत्येक ठिकाणी आम्ही मराठीचा आग्रह धरणार असून आम्ही आमच्या पद्धतीने मराठीकरण करून घेऊ, असा संदेश मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त दिला आहे.


महाराष्ट्रातील भाषिक व्यवहार; मग तो तोंडी असो वा लेखी, तो फक्त मराठीच असेल, याबाबत प्रत्येक मराठी माणसाने अतिशय कडवे, आग्रही असायला हवे, अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी आपल्या चार पानी निवेदनात व्यक्त केली आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनानंतर महाराष्ट्रात, मुंबईत मराठी माणसाला, मराठी भाषेला सन्मानाचे, प्रतिष्ठेचे स्थान मिळेल, असे वाटले होते; पण अमेठी-रायबरेलीच्या माध्यमातून महाराष्ट्राचे जे शोषण आझमगड-जौनपूर करीत आहे ते पाहता आता पुन्हा मराठी भाषेसाठी मोठं यज्ञकुंड धगधगवण्याची वेळ आली आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
अनेक अमराठी लोक येथे महाराष्ट्रात वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या राहत आहेत, मराठी भाषेचा आदर राखत आहेत, मराठी संस्कृती जपत आहेत, मराठी सण साजरे करीत आहेत. त्यांना आपण मराठीच मानतो, अशी स्पष्ट भूमिका मांडताना ते म्हणाले की, वर्षानुवर्षे येथे राहून मराठी भाषेबद्दल आस्था नसणारे व भाषा बोलता न येणारे; तसेच आपापल्या समाजातील लोकांची लोकसंख्या वाढवून आपला मतदारसंघ निर्माण करणारे व त्यातून महाराष्ट्राला ओरबडण्याची स्वप्ने पाहणारे; तसेच कसेही करून मराठी माणसाला सर्व स्तरातून हाकलून द्यायची इच्छा बाळगणाऱ्यांच्या विरोधात माझे आंदोलन सुरूच राहणार, असा इशाराही त्यांनी दिला.

सोमवार, 22 फ़रवरी 2010

अयोध्याप्रश्‍नी गोंधळ का घातला - राज ठाकरे

अयोध्याप्रश्‍नी गोंधळ का घातला - राज ठाकरे
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, February 23, 2010 AT 12:15 AM (IST)

जळगाव - अयोध्येतील वादग्रस्त जागेवरील दावा सोडवा. आम्ही जवळच मोठी मशीद बांधून देऊ, अशी वक्तव्ये करणाऱ्यांना अशीच भूमिका घ्यावयाची होती, तर एवढा गोंधळ का घातला? असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज चोपडा येथे सांगितले. चोपडा येथे झालेल्या पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.

मुस्लिमांनी हिंदूंच्या भावनांबाबत उदार दृष्टिकोन बाळगत अयोध्येतील वादग्रस्त जागेवरील दावा सोडावा, आम्ही जवळच मोठी मशीद बांधून देऊ, असे वक्तव्य पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन गडकरी यांनी इंदूर येथे नुकत्याच झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात केले होते. त्याचा खरपूस समाचार घेत "मनसे'चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट नितीन गडकरींवर तोफ डागली. ते म्हणाले, की भाजपची हीच जर भूमिका होती, तर एवढा हंगामा कशाला केला? भाजपने त्याच वेळी जर मशीद बांधून दिली असती, तर एवढ्या दंगली कशाला पेटल्या असत्या?, असा टोलाही त्यांनी लगावला.

मराठी दिनानिमित्त "मनसे'ने राज ठाकरे यांचा संदेश असलेली पुस्तिका तयार केली आहे. ती 27 फेब्रुवारीला महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचविली जाईल, तसेच एक पत्रकही माझ्या स्वाक्षरीचे दिले जाणार आहे. पुस्तिकेत "मनसे'तर्फे मराठी अस्मिता जपण्यासाठी काय कार्यक्रम घेतले जातील, त्याबाबतची माहिती दिली आहे. पत्रकात मराठी माणसाला त्याची जाण करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

श्री. ठाकरे म्हणाले, की मराठी माणसे राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करीत आहेत, ही चांगली बाब असली, तरी महाराष्ट्रात कुठलाच राष्ट्रीय पक्ष मराठी अस्मितेसाठी काम करीत नसल्याची खंत आहे. प्रत्येक राज्यात आपल्या राज्याची अस्मिता जपण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, महाराष्ट्रात तसे घडत नसल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण बेरोजगारीचे प्रश्‍न मिटविणे, हेच माझे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

श्री. ठाकरे यांनी काही बाबींबर थेट उत्तर न देता "करू', "बघा' या कोड्यात माहिती दिली. महागाईसंदर्भात ते म्हणाले, की केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना ज्योतिषी मिळाला आहे. यामुळे निश्‍चितच अन्नधान्याचे भाव कमी होतील. सुमारे 25 मिनिटे त्यांनी पत्रकारांशी चर्चा केली. त्यानंतर ते दुपारी तीनपर्यंत कार्यकर्त्यांशी बोलत राहिले.

रविवार, 21 फ़रवरी 2010

राज आणि उद्धव यांच्यात 'सुरक्षित अंतर'

राज आणि उद्धव यांच्यात 'सुरक्षित अंतर'
सकाळ वृत्तसेवा
Monday, February 22, 2010 AT 12:15 AM (IST)


मुंबई - शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आज प्रथमच एकत्र आले. कारण होते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मधुकर सरपोतदार यांच्या अंत्यदर्शनाचे; मात्र दोन्ही भावांनी "सुरक्षित अंतर ठेवत' एकमेकांच्या आसपासही जाण्याचे टाळले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळच्या नेत्यांपैकी एक असणाऱ्या मधुकर सरपोतदार यांचे पुत्र अतुल सरपोतदार आणि त्यांची पत्नी शिल्पा सरपोतदार यांनी मनसेची कास धरली. दोघेही राज यांच्या जवळचे समजले जातात. सरपोतदार यांच्या घरामध्ये शिवसेना आणि मनसे असे दोन्ही पक्ष एकत्र नांदत होते. त्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्काराला राज ठाकरे यांच्यासह मनसेचे प्रमुख पदाधिकारी आणि उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या सर्व नेत्यांचा फौजफाटा उपस्थित होता. राज यांच्यानंतर उद्धव अंत्यदर्शनाला आले. अंत्यदर्शनानंतर दोन्ही नेत्यांनी आपापल्या फौजफाट्यासह वेगवेगळे गट करून उभे राहणे पसंत केले. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते अंत्यसंस्काराच्या तयारीत गुंतले होते; मात्र त्यांचाही एकमेकांशी संवाद होत नव्हता. उद्धव यांच्याबरोबर आमदार रामदास कदम, खासदार संजय राऊत, चंद्रकांत खैरे, सुभाष देसाई, अनंत गीते आदी नेते उपस्थित होते. प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते हुसेन दलवाई, आमदार भाई जगताप, माजी खासदार रामदास आठवले अंत्यदर्शनावेळी एकाच ठिकाणी बसले. त्यांच्यात संवाद सुरू होता; मात्र राज आपल्या पक्षाच्या आमदार व कार्यकर्त्यांसह दूरवर शांतपणे उभे होते.

उद्धव आणि राज यांनी एकमेकांच्या समोर येण्याचे मोठ्या चतुराईने टाळले. अंत्ययात्रा सुरू झाल्यानंतरही दोन्ही पक्षाचे गट वेगवेगळे चालले होते. उद्धव पुढे तर, राज त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गराड्यात मागून चालले होते. अंत्ययात्रेत दोन्ही गटांच्या मधूनच चालणाऱ्या पोलिसांच्या गाडीमुळे दोन्ही गटांतील अंतर अधिकच वाढले होते.