रविवार, 21 फ़रवरी 2010

राज आणि उद्धव यांच्यात 'सुरक्षित अंतर'

राज आणि उद्धव यांच्यात 'सुरक्षित अंतर'
सकाळ वृत्तसेवा
Monday, February 22, 2010 AT 12:15 AM (IST)


मुंबई - शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आज प्रथमच एकत्र आले. कारण होते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मधुकर सरपोतदार यांच्या अंत्यदर्शनाचे; मात्र दोन्ही भावांनी "सुरक्षित अंतर ठेवत' एकमेकांच्या आसपासही जाण्याचे टाळले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळच्या नेत्यांपैकी एक असणाऱ्या मधुकर सरपोतदार यांचे पुत्र अतुल सरपोतदार आणि त्यांची पत्नी शिल्पा सरपोतदार यांनी मनसेची कास धरली. दोघेही राज यांच्या जवळचे समजले जातात. सरपोतदार यांच्या घरामध्ये शिवसेना आणि मनसे असे दोन्ही पक्ष एकत्र नांदत होते. त्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्काराला राज ठाकरे यांच्यासह मनसेचे प्रमुख पदाधिकारी आणि उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या सर्व नेत्यांचा फौजफाटा उपस्थित होता. राज यांच्यानंतर उद्धव अंत्यदर्शनाला आले. अंत्यदर्शनानंतर दोन्ही नेत्यांनी आपापल्या फौजफाट्यासह वेगवेगळे गट करून उभे राहणे पसंत केले. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते अंत्यसंस्काराच्या तयारीत गुंतले होते; मात्र त्यांचाही एकमेकांशी संवाद होत नव्हता. उद्धव यांच्याबरोबर आमदार रामदास कदम, खासदार संजय राऊत, चंद्रकांत खैरे, सुभाष देसाई, अनंत गीते आदी नेते उपस्थित होते. प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते हुसेन दलवाई, आमदार भाई जगताप, माजी खासदार रामदास आठवले अंत्यदर्शनावेळी एकाच ठिकाणी बसले. त्यांच्यात संवाद सुरू होता; मात्र राज आपल्या पक्षाच्या आमदार व कार्यकर्त्यांसह दूरवर शांतपणे उभे होते.

उद्धव आणि राज यांनी एकमेकांच्या समोर येण्याचे मोठ्या चतुराईने टाळले. अंत्ययात्रा सुरू झाल्यानंतरही दोन्ही पक्षाचे गट वेगवेगळे चालले होते. उद्धव पुढे तर, राज त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गराड्यात मागून चालले होते. अंत्ययात्रेत दोन्ही गटांच्या मधूनच चालणाऱ्या पोलिसांच्या गाडीमुळे दोन्ही गटांतील अंतर अधिकच वाढले होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें