रविवार, 3 जुलाई 2011

राष्ट्रवादीची प्रकरणे बाहेर काढण्यासाठी अण्णांचा खांदा कशाला?

राष्ट्रवादीची प्रकरणे बाहेर काढण्यासाठी अण्णांचा खांदा कशाला?
सकाळ वृत्तसेवा
Monday, July 04, 2011 AT 03:45 AM (IST)
मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रकरणे बाहेर काढा. महाराष्ट्रात मनसेची ताकद पाठीशी उभी करेन, असे आवाहन राज ठाकरे यांनी अण्णा हजारे यांना केल्याने राष्ट्रवादी अचंबित झाली आहे. सरकारविरोधात माझे आमदार विधानसभा डोक्‍यावर घेतील, अशा राज ठाकरे यांनी राणा भीमदेवी थाटात केलेल्या घोषणेला राष्ट्रवादीने सडेतोड उत्तर दिले आहे. मनसेतील नेत्यांची, लोकप्रतिनिधींची ताकद घटली काय? राष्ट्रवादीच्या नेत्यांची प्रकरणे बाहेर काढण्यासाठी मनसेच्या नेत्यांचे हात बांधले आहेत काय, असा जोरदार प्रतिहल्ला करीत प्रकरणे बाहेर काढण्यासाठी अण्णा हजारे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवायची गरजच काय? राष्ट्रवादीला लक्ष्य करण्याची मनसेची ही नीती म्हणजे दोन्ही दगडांवर पाय ठेवण्याचा प्रकार आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीने आज केली.

शिवसेना व भाजप या विरोधी पक्षांवर टीका करताना राज यांची मनसे ही राज्यात विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत आहे, याचा राज ठाकरे यांना विसर पडला असावा. प्रमुख विरोधी पक्षांना विरोधकांची प्रभावी भूमिका पार पाडता येत नसेल तर राज ठाकरे यांचे प्रकरणे बाहेर काढण्यासाठी हात कुणी बांधलेत. त्यांनी विरोधी पक्षाची भूमिका प्रामाणिकपणे पार पाडावी. हिंमत असेल तर राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची प्रकरणे बाहेर काढावीत. अण्णा हजारे यांची वाट कशाला बघावी? असा टोला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.

राष्ट्रवादीच्या विरोधात अण्णांना पुढे करीत "हम कपडे संभालते हैं' अशी भूमिका घेतल्याने राज ठाकरे यांचा वैचारिक गोंधळ उडाल्याचे स्पष्ट होते. त्यांना दोन्ही दगडांवर पाय ठेवून राजकारण करायचे आहे काय, अशी शंका घेतल्यास वावगे ठरणार नाही, अशी टीका राष्ट्रवादीच्या वर्तुळात सुरू आहे.
राज्यात नवनिर्माणची हाक देत स्वत:चा पक्ष स्थापन करणाऱ्या राज ठाकरे यांना अजूनही आपण सराकारच्या विरोधात आहोत की शिवसेना-भाजपच्या विरोधात आहोत ही भूमिका ठरविता आलेली नाही, याबद्दल राष्ट्रवादीचे नेते आश्‍चर्य व्यक्‍त करीत आहेत.

राज यांच्याकडे राज्यातील कार्यकर्त्यांची फळी आहे. विधानसभेत त्यांचे आमदार आहेत. एवढेच नव्हे, तर माहितीच्या अधिकाराचा कायदा वापरण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यांनी या सर्व आयुधांचा वापर करून राष्ट्रवादीला आव्हान द्यावे, पण अण्णांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वत:चे हसू करून घेऊ नये. अण्णांनी काय करावे, हे सांगण्यापेक्षा राज ठाकरे राष्ट्रवादीच्या विरोधात काय करू शकतात ते स्पष्ट करावे. अण्णांना पुढे करून त्यांनी अण्णांची टिंगल करण्याचा प्रयत्न करू नये, असा टोला आमदार आव्हाड यांनी लगावला आहे; तर विरोधी पक्षाला पोकळ ढगांची उपमा देणाऱ्या राज यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आरोप करताना ढगात गोळ्या मारू नयेत, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्‍ते मदन बाफना यांनी केली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें