मंगलवार, 15 फ़रवरी 2011

मनसे म्हणजे "झंडू बाम'

मनसे म्हणजे "झंडू बाम'
वृत्तसंस्था
Wednesday, February 16, 2011 AT 12:15 AM (IST)
 
मुंबई - मुंबई महापालिकेत सत्ता मिळविण्यासाठी शिवसेना-भाजप युतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा समावेश करण्याची कल्पना मांडणारे भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना शिवसेनेने आज झटका दिला. मनसे म्हणजे "झंडू बाम' असून ही बाटली तुमच्याच खिशात ठेवा, असा खरमरीत इशारा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी "सामना'च्या अग्रलेखातून दिला.

मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजपला सत्ता मिळवायाची असेल, तर शिवसेना-भाजप यांच्याबरोबर मनसेला सोबत घ्या, असा आग्रह मुंडे यांच्याकडून गेल्या आठवडाभरापासून सुरू होता. शिवसेनेने मात्र मुंडे यांच्या कल्पनेतील त्रिपक्षीय युतीबाबत कुठेही भाष्य केले नव्हते. त्यामुळे शिवसेना गप्प असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती; पण आज शिवसेनेच्या मुखपत्रातून शिवसेनाप्रमुखांनी मुंडे यांच्या कल्पनेतील स्वप्नांना थेट सुरुंग लावला. मनसे हा झंडू बाम असून त्यांच्यासमवेत युतीचा प्रश्‍नच उद्भवत नाही, असे या अग्रलेखात स्पष्टपणे सांगितले आहे; पण ज्यांना मनसे या "झंडू बाम'बरोबर युती हवी आहे, त्यांनी त्या बामची बाटली खिशातच ठेवावी, अशी उपरोधिक टीका शिवसेनाप्रमुखांनी अप्रत्यक्षरीत्या केली आहे.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर गेल्या 22 वर्षांपासून झालेली ही युती म्हणजे "आदर्श घोटाळा' नसून राष्ट्रीय विचारांची उसळलेली लाटच आहे, असे स्पष्ट करतानाच ठाकरे यांनी, महाराष्ट्रातील युतीकडे सगळ्यांचे लक्ष असते. त्यामुळे या युतीचा पाया मजबुत राहणार नसेल, तर लोक कळसही चोरून नेतील, असा उपरोधिक टोलाही मुंडे यांना मारला आहे.

मुंडे कोण बोलणारे?
शिवसेना-भाजप युतीमध्ये अन्य कुठला पक्ष पाहिजे वा नको, हे ठरविणारे व बोलणारे गोपीनाथ मुंडे कोण? असा रोखठोक सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. युती ही एकट्या मुंडे यांची नाही, तर शिवसेना-भाजपची आहे. त्यामुळे युतीमध्ये कोण असावे व नसावे, याचा निर्णय शिवसेनाप्रमुख व उद्धव ठाकरे घेण्यास समर्थ आहेत. राजकारणात अशक्‍य असे शक्‍य करण्याची भाषा बोलणारे मुंडे हेही कधीतरी शिवेसेनेत येण्यास अतिशय उत्सुक होते, असा गौप्यस्फोटही खासदार राऊत यांनी केला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें