गुरुवार, 13 जनवरी 2011

मौका सभी को मिलता हैं


मौका सभी को मिलता हैं
Print



राज ठाकरे यांचा ‘दादा’-‘आबा’ यांना इशारा
औरंगाबाद, १२ जानेवारी/खास प्रतिनिधी

‘‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना माज आला आहे. बीड येथे शिक्षकाला झालेली मारहाण, शिवनेरी किल्ल्याजवळील हेलिकॉप्टरवर केलेली दगडफेक, ‘लोकसत्ता’चे संपादक कुमार केतकर यांच्या घरावर झालेला भीषण हल्ला, दादोजी कोंडदेव प्रकरण, जैतापूर आणि वसई येथील नागरिकांवर पोलिसांनी केलेला लाठीमार या सर्व प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांचीच चिथावणी होती,’’ असा सनसनाटी आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज विराट सभेत केला. कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज सायंकाळी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या सभेमध्ये त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर हल्ला चढविला. ‘‘महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे का?’’, असा सवाल करून ते म्हणाले, ‘‘भिवंडी येथील दोन पोलिसांना दगडाने ठेचून मारले, त्या वेळी सरकारकडून हर्षवर्धन जाधवला दिलेल्या वागणुकीसारखे वर्तन करण्यात आले होते का? कारण त्या ठिकाणी त्यांची मते जातात. राष्ट्रवादीच्या लोकांना माज आला आहे. बीड येथील औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातील प्रचारसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारणाऱ्या शिक्षकाला फोडून काढण्यात आले, बडविण्यात आले. हे कायद्याचे राज्य आहे का? कोणी यांना प्रश्न विचारायचे नाही का?’’
शिवनेरी किल्ल्याजवळ संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हेलिकॅप्टर आणि सभेत दगडफेक केली. त्या वेळी हेलिकॅप्टरमध्ये विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील होते. दगडफेक करणाऱ्या त्या कार्यकर्त्यांवर केवळ गुन्हे दाखल केले. त्यांना फोडून काढण्याची हिंमत या राज्य सरकारच्या पोलिसांकडे नव्हती. ‘लोकसत्ता’चे संपादक कुमार केतकर यांच्या घरावर हल्ला करणाऱ्यांमध्ये शिवसंग्रामचे कार्यकर्ते होते. या भीषण हल्ल्यातून केतकर वाचले. या शिवसंग्रामचे विनायक मेटे यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. उलट त्यांना आमदारकी भेट देण्यात आली, अशी टीका करून राज म्हणाले, ‘‘निळूभाऊ खाडीलकर यांच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला. यांना पोसले जात आहे. जाती-पातीचे विष पेरून राजकारण केले जात आहे. जातीपातीच्या चिखलातच महाराष्ट्राला राहू दिले जात आहे. दादोजी कोंडदेव प्रकरणात इतिहास बदलला जाणार आहे का? इतिहासात दोष असतील तर ते चर्चेने सोडवा.’’ ‘जास्त अंगावर येऊ नका,’ असा इशाराही आर. आर. आणि अजितदादांना देताना राज म्हणाले, ‘‘ पोलीस दलाच्या आडून लढू नका. हिंमत असेल तर होऊन जाऊ द्या.’’ आर. आर. पाटील यांनी मुंबई हल्ल्यानंतर ‘बडे बडे शहरमें छोटी छोटी बातें होती हैं’ असा डायलॉग लगावला होता. याला ‘मौका सभी को मिलता हैं’ हा ‘सत्या’ चित्रपटातील संवाद त्यांनी सांगितला. हर्षवर्धनचे आई-वडील काँग्रेसच्या राजवटीतील त्यांच्याच पक्षाचे आमदार होते. त्यांचा मुलगा मनसेकडे का आला, म्हणूनच त्याला बडविण्यात आले आणि याला चिथावणी आर. आर. आबा आणि अजित पवार यांचीच आहे. कायदा हातात घेणाऱ्या लोकप्रतिनिधींचे काय हाल होतात, असे अजित पवार जालन्याच्या सभेत म्हणाले होते. आर. आर. आणि अजित पवार यांचे आदेश असल्यामुळेच ही मारझोड करण्यात आली, असा आरोप राज ठाकरे यांनी केला.

1 टिप्पणी: