अण्णा, लोकपाल राहू दे; महाराष्ट्राकडे पाहा - राज
सकाळ वृत्तसेवा
Sunday, July 03, 2011 AT 01:15 AM (IST)
नाशिक - ""उत्तर प्रदेशने देशाला अनेक पंतप्रधान दिले. मग तेथील लोकांना इतर राज्यांत का जावे लागते? महाराष्ट्रात उत्तर भारतीयांना घरे द्या, अशी मागणी मायावतींनी केली होती. येथे मराठी माणसाला घर मिळत नाही, तेथे त्यांना घरे मागण्याची त्यांच्यात हिंमत कोठून येते? महाराष्ट्र कोणाच्या बापाचा नाही. विरोधकांचे ढग बरसत नसल्यामुळेच सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र विकायला काढलाय. त्यामुळे भ्रष्ट राजकारण्यांच्या विरोधात अण्णा, बाबा पुढे येत आहेत,'' अशी खरमरीत टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली, तर "अण्णा, लोकपाल राहू दे; महाराष्ट्राकडे लक्ष द्या. महाराष्ट्रातील भ्रष्ट राजकारण्यांच्या फायली बाहेर काढा. असे केले तर मनसे तुमच्या पाठीशी उभी करतो,' असेही ते म्हणाले.
येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात आज झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात श्री. ठाकरे बोलत होते. या वेळी आमदार वसंतराव गिते, प्रदेश सरचिटणीस अतुल चांडक, आमदार उत्तमराव ढिकले, नितीन भोसले, शिशिर शिंदे, हेमंत गोडसे, मंगेश सांगळे, सुधाकर चव्हाण, विनय येडेकर, रीटा गुप्ता, शिरीष पारकर, अविनाश अभ्यंकर, जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे, नगरसेवक रमेश धोंगडे, सुजाता डेरे, यतीन वाघ, अशोक मुर्तडक, शीला भागवत, रंजना जोशी आदी उपस्थित होते.
श्री. ठाकरे म्हणाले, ""बाहेरून येणाऱ्यांचे लोंढे वाढत आहेत. त्यामुळे आता मुंबईनंतर पुणे आणि नाशिकला बकालपणा यायला लागला आहे. त्यातच भ्रष्ट नेत्यांमुळे आणि सुस्त विरोधकांमुळे शहराचे नियोजन कोलमडले आहे. बाहेरून आलेल्यांबद्दल बोलतो, मराठीच बोला म्हणतो, म्हणजे भावनेला हात घालतो, अशी टीका माझ्यावर केली जाते. पण येणाऱ्या लोंढ्यांमुळे शहरांचा वाढलेला बकालपणा व मराठीचा मुद्दा हा भावनेचा मुद्दा नाही, तर आता अस्तित्वाचा मुद्दा झाला आहे. शहरात उभ्या राहणाऱ्या टाउनशिप कोणत्याही नियोजनाशिवाय उभ्या राहत असतील व तेथे फ्लॅट घेणाऱ्याला पाणी मिळाले नाही, तर हा भावनेचा मुद्दा होतो का?, याचा विचार महापालिकेने, नगरसेवकांनी करायला नको का?''
""शहरांना सुविधा पुरविताना ग्रामीण भागाकडे झालेल्या दुर्लक्षामुळे तेथील शेतकरी आत्महत्या करतो. त्यांच्या मुलांना शहरात नोकऱ्या मिळत नाहीत, याकडे कोण लक्ष देणार? धरणे कशासाठी बांधली जातात? पाण्याचे वाटप आणि नियोजन करताना आपण कशाला प्राधान्य देतो, याचा विचार कोण करणार? शहरांचा विस्तार कसाही वाढतो आहे. त्याच्या पिण्याच्या पाण्याची गरज वाढत असताना नवीन धरणांचा विचार होतो का? शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी उद्योग आणि पिण्याच्या पाण्याकडे वळाल्यावर शेतकऱ्याने काय करायचे, याचा विचार आता व्हायला हवा. धरणाच्या अवतीभवती उभ्या राहत असलेल्या टाउनशिप कोणाची स्वप्ननगरी असेल, पण धरणात अतिक्रमण करण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? देशाच्या व राज्याच्या संपत्तीचे सुरू असलेले खासगीकरण धोकादायक असून, आपल्या मराठी माणसाच्या जमिनीवर तो उपरा होत आहे,'' असे ते म्हणाले
भ्रष्टाचाराचे कुरण झालेल्या "पीडब्ल्यूडी'मधील ठेके कोणाला द्यायचे हे आधीच ठरलेले असते. त्यामुळे कामचुकार आणि भ्रष्ट कंत्राटदारांना मनसेच्या भाषेतच रट्टे दिले पाहिजेत, तरच ते जाग्यावर येतील, असे श्री. ठाकरे म्हणाले. ""मराठी माणूसच हिंदी बोलत असेल तर हिंदी भाषिकाला महाराष्ट्र त्याचाच वाटणार. त्यामुळे आपण मराठीत बोलले पाहिजे. भाषेच्या मुद्याची भिंत उभारली तरच परराज्यातील लोंढे थांबतील,'' असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
मेळाव्याचे प्रास्ताविक करताना नितीन भोसले यांनी, भ्रष्टाचाराने बरबटलेल्या महापालिकेतील युतीची सत्ता उलथून लावण्याचे आवाहन केले. मेळावा यशस्वितेसाठी प्रकाश दायमा, समीर शेटे, अनिल वाघ, मोहन मोरे, संजय गायकवाड आदींनी प्रयत्न केले. प्रकाश दायमा यांनी सूत्रसंचालन केले.
नव्या संघर्षाची "ठिणगी'
"राजकारण्यांनी संपत्ती कमवावी, पण मराठी माणसाला ओरबाडून नको. राज्य विकायला काढले असले, तरी ते आम्ही विकू देणार नाही. आताच हात उचलला नाही तर नंतर काही खरे नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी हाकेच्या प्रतीक्षेत राहावे. हाक मारल्यावर रस्त्यारस्त्यांवर मनसेचे मोहोळ दिसले पाहिजे. पुन्हा संघर्षाची तयारी ठेवा, तर महाराष्ट्र वाचविता येईल,' असे सांगताना राज ठाकरे यांच्या देहबोलीने नव्या संघर्षाची ठिणगी टाकली. मेळाव्यानंतर आता राज ठाकरे कोणता मुद्दा घेऊन "मनसेचे मोहोळ' उठविणार आहेत याविषयी कार्यकर्त्यांत चर्चा आणि उत्सुकता होती, तर हे मोहोळ पुन्हा एकदा महाराष्ट्र ढवळून काढणार, अशा चर्चेचे मोहोळ सभागृहात उठले होते.
पालिका जिंकायचीच!
हा मेळावा फक्त मेळावा नाही, तर जिल्हा परिषद, पंचायत समित्या व आगामी पालिका निवडणुकांची तयारी असल्याचे राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितल्यावर कार्यकर्त्यांत उत्साह संचारला. आगामी निवडणुकांत "मनसे'चाच झेंडा पालिकेवर दिसला पाहिजे, असा निर्धारच मेळाव्यात कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आला. नाशिक महापालिका काबीज करण्याचा निश्चय आमदार वसंतराव गिते यांनी व्यक्त केला. इतर सर्व आमदारांच्या भाषणातही पालिका निवडणुका व पालिकेतील भ्रष्टाचारावर भर होता. पालिका नव्हे, तर ग्रामपंचायत निवडणुकांच्या माध्यमातून मनसे तळागाळापर्यंत जाईल व यश मिळवील, अशी प्रतिक्रिया कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
"मनसे'त भेसळ नाही : आमदार शिंदे
मनसेच्या यशात कुठलीही भेसळ नाही. राज ठाकरे यांचे विचार व कार्यकर्त्यांच्या खणखणीत नाण्यावर गेल्या पाच वर्षांत मनसेने यश मिळविले आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मनसेने झेंड्यात रंग भरलेले नाहीत. मनसेचा रंग कायमचा आहे. इतर पक्षांप्रमाणे "इथ जमलं नाही म्हणून तिथं जायचं,' असे प्रकार करणारे आता भगव्याजवळ निळा झेंडा घेऊन गेलेत. पण मनसेत निळा रंग कायमचा आहे; निवडणुकांपुरता नाही, असा टोला आमदार शिशिर शिंदे यांनी लगावला.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें