मराठमोळ्या सुगरणीसाठी मनसेची शोधमोहीम
सकाळ वृत्तसेवा
Sunday, April 18, 2010 AT 12:00 AM (IST)
मुंबई - मराठी संस्कृतीचे संवर्धन आणि महाराष्ट्रातील भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावरील संघर्षाचा नारा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता 11 कोटी लोकांच्या जिव्हेवर राज्य करणाऱ्या महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृतीच्या संवर्धनाचा आणि तिच्या प्रचार-प्रसाराचा वसा घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मनसेच्या महिला सेनेने मराठमोळ्या सुगरणीच्या शोधाची मोहीम हाती घेतली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या वतीने मुंबईतील 36 विभागांत येत्या 20, 21 व 22 एप्रिल रोजी महिलांसाठी पाक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. मनसेच्या उपाध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले, की मनसेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृतीचा प्रसार करण्याचे ठरविले आहे. याचाच एक भाग म्हणून सर्वोत्कृष्ट मराठमोळ्या सुगरणीचा शोध घेतला जात आहे. सर्वसामान्य महिला तसेच गृहिणींच्या पाकगुणांना वाव मिळावा असाही हेतू यामागे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या सुगरणींनी तयार केलेल्या पाककृतींची चव नामवंत शेफ चाखून बघतील. त्यानंतरच विजेत्यांची निवड होणार आहे. प्रत्येक विभागातून सर्वोत्कृष्ट पाककृती बनविणाऱ्या पाच महिलांना पारितोषिक देण्यात येईल. प्रत्येक विभागात प्रथम पारितोषिक मिळविणाऱ्या महिलांचा समावेश पाक स्पर्धेच्या अंतिम फेरीत करण्यात येईल, अशी माहिती मनसेच्या उपाध्यक्षा रिटा गुप्ता यांनी दिली.
अंतिम फेरीतील विजेत्या महिलांना शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते सीडी, गृहोपयोगी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे व रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सुनेत्रा जाधव यांच्याशी 9769350302 किंवा 24333799 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Marathi Mansala Hava Hota Ek Swabhimani Neta, Jo Tuzai Rupat Bhetla. Vel Prasangi 'DELHI' Sar Karnari Manse Zopali Hoti, Kartap-gari Visarli Hoti, Tuzai Rupat Purusharth Janmala Aala Aani Ahmala Purusharthat Jagayala Shikaviles.
जवाब देंहटाएं