आधी बांगलादेशी घुसखोरांना हाकला- राज ठाकरे
- सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, August 21, 2012 AT 04:30 PM (IST)
राज ठाकरे यांचे सरकारला आवाहन; गृहमंत्री, पोलिस आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी मुंबई- आझाद मैदानावरील 11 ऑगस्टच्या हिंसाचारात बांगलादेशी मुस्लिमांचा सहभाग होता. हिंसाचाराच्या ठिकाणी सापडलेला बांगलादेशी पासपोर्ट हा त्याचा धडधडीत पुरावा आहे. तो पासपोर्ट दाखवितानाच, "आधी या बांगलादेशी घुसखोरांना हाकला,' असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज (मंगळवारी) राज्य सरकारला केले.
आसाम आणि म्यानमारमधील मुस्लिम समाजावर अन्याय झाल्याच्या निषेधार्थ मुंबईत 11 ऑगस्ट रोजी आझाद मैदानात झालेल्या मुस्लिम संघटनांच्या हिंसक निदर्शनांना राज ठाकरे यांनी गिरगाव ते आझाद मैदान असा निषेध मोर्चा काढून जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यानंतर जाहीर सभेत, बांगलादेशी भारतात येऊन दंगली घडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करताना उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमधून मुंबईत येणारे मुस्लिम समाजातील काही समाजकंटक महाराष्ट्रात अशा प्रकारच्या हिंसक घटना घडवून आणण्यात पुढाकार घेत असल्याचा संशय राज यांनी व्यक्त केला.
"कोणत्याही घटनेचा निषेध करण्याची एक सीमा असते. रझा अकादमीच्या निदर्शनात सर्व सीमा ओलांडून महिला पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचे धाडस निदर्शकांनी केले. पोलिस अधिकाऱ्यांवर हल्ला केला, प्रसारमाध्यमांना लक्ष्य केले. यापुढे महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना चालणार नाहीत. महाराष्ट्र हा माझा धर्म असून, या महाराष्ट्रात पोलिस आणि प्रसारमाध्यमांवर हल्ले करण्याचे धाडस यापुढे कुणी केल्यास याद राखा,' असा खणखणीत इशारा राज ठाकरे यांनी या सभेत दिला.
या वेळी राज यांनी राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील, मुंबईचे पोलिस आयुक्त अरूप पटनायक यांच्यावरही टीकेची तोफ डागली. पाटील, पटनायक यांना थोडीशी जरी लाज असेल; तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करताना समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आणि रझा अकादमीवर राज यांनी हल्लाबोल केला. तीन वर्षांपूर्वी भिवंडी दंगलीत दोन पोलिसांना ठार मारण्यात आल्याचा दाखला देत राज ठाकरे यांनी आझमी आणि रझा अकादमी यांना टीकेचे लक्ष्य केले. भिवंडीमध्ये आमदार आझमी यांनी भडकाऊ भाषणे केल्यानेच ही दंगल घडल्याचा आरोप राज यांनी केला. महाराष्ट्रात अशा प्रकारच्या हिंसक घटना वारंवार घडवून आणल्या जात असतानाही रझा अकादमीच्या मोर्चाला परवानगी मिळतेच कशी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दलित नेत्यांना कानपिचक्या
मुंबईतील हिंसाचाराचे पडसाद लखनौमध्ये उमटले. त्या मोर्चात सहभागी झालेल्या समाजकंटकांनी गौतम बुद्धांच्या प्रतिमेची विटंबना केली. त्यावर मायावती, प्रकाश आंबेडकर, गवई, रामदास आठवले यांनी चकार शब्द काढला नाही. त्या वेळी या नेत्यांचे दलितप्रेम कुठे गेले होते, असा सवाल करीत, केवळ इंदू मिल, इंदू मिल करीत हे नेते ओरडतात, असा टोला राज यांनी लगावला.
राज म्हणाले...
- भारतात येऊन दंगली घडविण्याचा बांगलादेशींचा प्रयत्न.
- काही परप्रांतीय समाजकंटकांचाही हिंसक घटनांत पुढाकार.
- महाराष्ट्र हा माझा धर्म. पोलिस, प्रसारमाध्यमांवर हल्ले केल्यास याद राखा.
- रझा अकादमीच्या मोर्चाला परवानगी मिळतेच कशी?
-------------------------------------------------------------
राजीनाम्याचा प्रश्नच नाही
आमदार हर्षवर्धन जाधव यांनी चार पोलिसांना मारहाण केली होती. त्यात दोन महिला पोलिस जखमी झाल्या होत्या. त्या वेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ राज ठाकरे यांनी औरंगाबादला सभा घेतली होती. या सभेत पोलिसांना मारहाण करणाऱ्या मनसे आमदाराचे त्यांनी समर्थन केले होते. त्यामुळे राज ठाकरे यांनी काढलेला आजचा मोर्चा हे निव्वळ राजकीय भांडवल करण्यासाठीचा आहे. त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही.
11 ऑगस्टला काढलेल्या मोर्चात हिंसाचार करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई सुरू आहे. राज यांचा मोर्चा अडविता आला असता. मात्र, मुंबईत शांतता राहावी, यासाठी त्यांना पोलिसांनी अडविले नाही.
- आर. आर. पाटील, गृहमंत्री
-------------------------------------------------------------
राज ठाकरेंनी ज्या पद्धतीने हा उपक्रम हाती घेतला; ते मला आवडले. कोणी तरी हे करायला हवे होते. समाजविघातक प्रवृत्तींनी सीमा ओलांडली होती.
- प्रीतिश नंदी
-------------------------------------------------------------
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विकासाचे राजकारण जमत नाही. त्यामुळे राज यांनी मनसेचा झेंडा गुंडाळून ठेवून पुन्हा शिवसेनेचा भगवा खांद्यावर घ्यावा.
- माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष कॉंग्रेस
-------------------------------------------------------------
मुंबई पोलिसांच्या अब्रूची लक्तरे काढली जात आहेत... हा अन्याय पचविणे अशक्य आहे. राजकारण बाजूला ठेवू. राज यांचा मुद्दा अतिशय योग्य आहे.
- निखिल भिर्डीकर (वाचक)
-------------------------------------------------------------
कॉन्स्टेबलकडून राजना गुलाबपुष्प
मनसेने आज आझाद मैदानात काढलेल्या मोर्चाला पोलिसांचाही मूक पाठिंबा असल्याचे चित्र दिसले. पोलिसांचे मनोधैर्य वाढविणे, हाही मोर्चाचा हेतू असल्याचे जाहीर करण्यात आले. जाहीर सभेनंतर पोलिस कॉन्स्टेबल प्रमोद तावडे यांनी व्यासपीठावर जाऊन मनसेप्रमुख राज ठाकरे यांना गुलाबपुष्प दिले. दंगलखोरांनी विनयभंग केलेल्या पोलिसदलातील माता-भगिनी आणि मारहाण झालेल्या सहकाऱ्यांच्या वतीने आल्याचेही तावडे यांनी माध्यमांना सांगितले.
"जे होईल, त्याची पर्वा नाही'
""यापुढे आपले काहीही झाले तरी पर्वा नाही'' असे वक्तव्य तावडे यांनी केले. ""सीआयएसएफच्या जवानांशी झालेल्या हाणामारीचे प्रकरण सहा महिन्यांपासून प्रलंबित आहे. त्यावर पोलिस आयुक्त पटनायक यांनी कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. एवढेच नव्हे, तर आयुक्तांनी "तू जास्त शहाणा आहेस' असे म्हणत माझा अपमान केला,'' असे गाऱ्हाणे तावडे यांनी मांडले. त्यानंतर त्यांना आझाद मैदान पोलिसांनी ताब्यात घेतले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें