राज ठाकरे यांचा मोटरमनना इशारा
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, May 04, 2010 AT 12:00 AM (IST)
मुंबई- मोटरमनने पुकारलेला संप अत्यंत चुकीचा असून, त्यांनी संध्याकाळपर्यंत संप मागे घेतला नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोटरमनच्या विरोधात आंदोलनास उभा राहील. असा सज्जड इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (मंगळवार) दिला. मोटरमनच्या मागण्या कितीही रास्त असल्या, तरी आंदोलनाची ही पद्धत चुकीची आहे, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
या विषयावर बोलण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. मोटरमन यांच्या संपाव्यतिरिक्त कोणत्याही अन्य विषयावर बोलणे त्यांनी या वेळी टाळले.
ठाकरे म्हणाले, मोटरमनच्या मागण्यांविषयी आम्हालाही सहानुभुती आहे. पण, आपल्या मागण्या मांडण्यासाठी प्रवाशांना वेठीस धरणे योग्य नाही. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत मोटरमननी आपला संप मागे घ्यावा. अन्यथा मोटरमनच्या विरुद्ध मनसे आंदोलनाला उभा राहील. सरकारनेदेखील कठोर पावले उचलून रेल्वे सेवा सुरळित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. ताब्यात घेतलेल्या १७० मोटरमनना संध्याकाळपर्यंत कामावर हजर राहण्यासाठी सोडून दिले पाहिजे.
मोटरमननी एक महिन्यापूर्वी रेल्वे प्रशासनाला नोटीस दिली होती. मात्र, त्याकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही, याबाबत विचारता ठाकरे यांनी सरकारला त्यांच्या जबाबदारीची आठवण करून दिली. सरकारने वेळीच लक्ष घातले असते, तर आजची परिस्थिती उद्भवली नसती, असे मत त्यांनी व्यक्त केले. मात्र, अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांनीदेखील याचा विचार केला पाहिजे. त्यांच्यावर सरकारने चाप लावला पाहिजे, जेणेकरून अशाप्रकारची अडवणूक थांबेल, असे ते म्हणाले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें