पाणीप्रश्नावर "मनसे'तर्फे जोरदार निदर्शने
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, May 04, 2010 AT 01:17 AM (IST)
औरंगाबाद - शहरातील पाणीप्रश्न मांडणारे वृत्त "सकाळ'ने सोमवारी (ता. तीन) प्रसिद्ध केले. त्याचे पडसाद उमटले. पाणीपुरवठ्यात तत्काळ सुधारणा करण्याची मागणी करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिका मुख्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.
गेल्या काही महिन्यांपासून पाणीटंचाई वाढत चालली आहे. दुसरीकडे महापालिकेच्या स्तरावर केवळ कागदोपत्री घोषणाच होत आहेत. त्यामुळे पाणीपुरवठ्याचा प्रश्न नेमका काय आहे, त्यातील महत्त्वाच्या त्रुटी कोणत्या, त्यावर काय उपाययोजना करता येतील, याची अचूक माहिती देणारे "धरण उशाशी, शहर उपाशी' वृत्त "सकाळ'ने प्रसिद्ध केले. त्याचे तीव्र पडसाद उमटले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी महापालिका मुख्यालयासमोर सुमारे तासभर जोरदार निदर्शने केली. "सकाळ'चे अंकही त्यांनी फडकावले.
"महापालिका हाय हाय', "झोपलेल्या महापालिकेचे करायचे काय, खाली डोके-वर पाय', "नागरिकांना संकटात टाकणाऱ्या महापालिकेचा निषेध असो' आदी घोषणा देत त्यांनी परिसर दणाणून टाकला. त्यानंतर आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना त्यांनी निवेदन दिले. त्यात "सकाळ'ने मांडलेल्या विषयाची गांभीर्याने दखल घ्यावी, असे नमूद केले. कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेले जलकुंभ का भरले जात नाहीत, याचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ अभियंत्यांची समिती नेमावी, नादुरुस्त व्हॉल्व्हची दुरुस्ती करावी, लाइमनवर देखरेखीसाठी विशेष पथक नेमावे, पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळले जावे, वेळापत्रक न पाळणाऱ्या लाइनमनवर कारवाई करावी, हर्सूल तलावातील गाळ काढावा, तलावाच्या भिंतीची उंची वाढवावी, 117 विहिरींचे पाणी उपलब्ध करून द्यावे, "नहर-ए-अंबरी'चे पाणी चोरणाऱ्यांवर कारवाई करावी, या पाण्याचे नागरिकांपर्यंत वितरण करावे. नहरींच्या संवर्धनासाठी पथक नेमावे, पाणी वापरासंदर्भात नागरिकांत जनजागृती करावी, जेवढे दिवस पाणी तेवढीच पाणीपट्टी वसूल करावी, बीअर-मीनरल वॉटर कारखान्यांचे पाणी शहराकडे वळवावे आदी मागण्यांचा निवेदनात समावेश होता.
गणेश मगर यांच्या नेतृत्वात झालेल्या निदर्शनात कल्पना राजपूत, रूपाली पवार, संजय सोनवणे, अरुण औताडे, विजय रणभरे, रवी त्रिभुवन, संतोष कुटे, धनंजय कजबेकर, चेतन दाभाडे, धम्मपाल हिवराळे, नवनाथ गायकवाड, शैलेश उदावंत, योगेश कदम, बंडू भिंगारदेव, किरण पवार, गौतम इंगोले, राहुल जगताप, रवी जमधडे यांच्यासह अनेकांचा समावेश होता.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें