राजच्या स्वागतासाठी नजरांच्या पायघड्या
उत्तर भारतीयांना मारहाणप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यासंदर्भात मनसेप्रमुख राज ठाकरे सोमवारी सकाळी कल्याणच्या रेल्वे न्यायालयात आले होते. या वेळी त्यांना पाहण्यासाठी मनसे समर्थकांनी केलेली गर्दी. (छायाचित्र - ऋषिकेश चौधरी)
कल्याण - कल्याण रेल्वेस्थानकातील उत्तर भारतीयांना मारहाणप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारी सकाळी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कल्याण रेल्वे न्यायालयात हजर झाले. यावेळी मनसे समर्थकांनी रेल्वे न्यायालय परिसरात एकच गर्दी केली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठेवलेल्या पोलिस बंदोबस्तामुळे कल्याण रेल्वे न्यायालय परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
आज सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी राज ठाकरे कल्याण रेल्वे न्यायालयात हजर झाले. ठाकरे यांच्या संदर्भात रेल्वे न्यायालयात काय निर्णय होतो याचे वृत्तांकन करण्यासाठी प्रसारमाध्यमांनी एकच गर्दी केली होती. सकाळी आठ वाजल्यापासून कल्याण रेल्वे स्थानकासमोर विविध न्यूज चॅनल्सच्या ओबी व्हॅन लागल्या होत्या. राज ठाकरे दादरहून कल्याणकडे सकाळी 9.30 वाजता रवाना झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी प्रक्षेपित करताच कल्याण परिसरात मनसे समर्थकांची एकच गर्दी झाली. कल्याण रेल्वे न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी कृपेश मोरे यांच्यासमोर राज ठाकरे हजर झाले. त्यानंतर कागदपत्रांचे वाचन करण्यात आले. ठाकरे यांच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांचा ताबा कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यास दिला. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पुन्हा एक वाजता न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. 11 वाजून 22 मिनिटांनी ठाकरे यांना कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे.
कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात कागदपत्रांची पूर्तता करून पुन्हा ठाकरे यांना एक वाजता हजर करण्यात आले. राज ठाकरे न्यायालयाच्या बाहेर येताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी 'राज ठाकरे' आणि 'मनसे जिंदाबाद'च्या घोषणा दिल्या. मनसेचे नेते नितीन सरदेसाई, ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, राजन राजे, सतीश प्रधान, शिरीष पारकर, राजन गावंड, विनय भोईटे, अवधूत वाघ, वैशाली दरेकर, शिल्पा सरपोतदार आदी या वेळी उपस्थित होते.
--सकाळ वृत्तसेवा
Monday, June 29th, 2009 AT 10:06 PM
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें