l
मुंबई, ३० ऑक्टोबर / प्रतिनिधी
राज ठाकरे यांच्या मनसेच्या बाजूने बहुतांश मुंबईकर मराठी जनता उभी राहण्यामागे समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांचा उद्दामपणा कारणीभूत ठरला होता. उत्तर भारतीयांच्या रक्षणासाठी आम्ही लाठय़ा वाटू, अशी आव्हानयुक्त भाषा आझमी यांनी वापरल्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून उत्तर भारतीय टॅक्सीचालकांवर हल्लाबोल केला होता.
या साऱ्या घटना अद्याप मराठीजनांच्या विस्मृतीत गेलेल्या नसतानाच आता भिवंडी व मानखूर्द-शिवाजीनगर या दोन ठिकाणाहून निवडून आलेले सपाचे आमदार अबू आसीम आझमी यांनी विधिमंडळ कामकाज पत्रिका हिंदीतून मिळावी अशी मागणी विधिमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे यांच्याकडे केली आहे. अबू आझमी यांच्या मागणीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडाडून टीका केली असून अबूने उत्तर प्रदेशात चालते व्हावे, असा इशारा राज यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिला.
महाराष्ट्रात केवळ मराठीच चालणार, असे ठणकावून सांगताना राज म्हणाले की, एवढाच जर हिंदीचा पुळका आला असेल तर अबूने उत्तर प्रदेशात चालते व्हावे. इथे महाराष्ट्रात ही नाटके चालणार नाहीत आणि मनसे हे खपवून घेणार नाही!
हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याने विधानसभा सदस्यत्वाची शपथही आपण हिंदीतूनच घेणार असून विधिमंडळ कामकाजाची माहितीही आपल्याला हिंदी भाषेतून मिळणे हा आपला अधिकार असल्याचे आझमी यांचे म्हणणे आहे. आझमी यांनी पत्रात म्हटले आहे की, आपले संपूर्ण शिक्षण उत्तर प्रदेशात झाले असल्याने आपल्याला केवळ हिंदी व उर्दू या दोनच भाषा अवगत आहेत. मराठी भाषेचा मी सन्मान करतो. मराठी ही राज्यभाषा असल्याने मी मराठी शिकण्याचा प्रयत्न करीत आहे. कामकाजाची माहिती मराठीतून देण्याची परंपरा आहे, मात्र हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याने इंग्रजीच्या ऐवजी हिंदी भाषेत कामकाजाची माहिती दिली जाणे स्वतंत्र भारतात अपेक्षित आहे, असे आझमी यांचे म्हणणे आहे. दरम्यान, मनसेचे नेते आमदार बाळा नांदगावकर यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, या देशातील राज्यांची भाषावार प्रांतरचना झाली आहे. आम्हाला सर्व भाषांविषयी आदर आहे. अबू आझमी यांनी हिंदीतून कामकाज पत्रिका मागण्याची जी नवी नौटंकी सुरू केली आहे त्याला आमचा विरोध आहे. ही विषवल्ली वेळीच ठेचून काढली पाहिजे. महाराष्ट्राच्या विधानसभेतील कामकाज मराठीतूनच झाले पाहिजे. अबू आझमी यांना हवे असल्यास त्यांनी उत्तर प्रदेश वा बिहारमधून निवडून यावे व तेथील विधिमंडळात हिंदीतून कारभार करावा. महाराष्ट्राच्या विधिमंडळात असली थेरं आम्ही चालू देणार नाही
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें