सकाळ वृत्तसेवा
Tuesday, December 15, 2009 AT 12:15 AM (IST)
संतोष भिंगार्डे : सकाळ वृत्तसेवा
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नेमकी कोणती बाजू किंवा आंदोलने "वर्ल्ड कप 2011'मध्ये दाखविली आहेत, हे आम्हाला माहीत नाही. त्यामुळे आम्हाला हा चित्रपट पाहायचा आहे. त्यामध्ये आमच्याविरोधात काही आढळले, तर आम्ही हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा मनसेच्या सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे.
रवी कपूरने दिग्दर्शित केलेला "वर्ल्ड कप 2011' हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट यांच्यावर रवी पुजारीने गोळीबार का केला, हे या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. त्यामुळे रवी पुजारीने अभिनेता व दिग्दर्शक रवी कपूरला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्याला पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. आता या चित्रपटाबाबत आणखी एक वाद उफाळून येण्याची दाट शक्यता आहे. या चित्रपटात मनसेची आंदोलने दाखविण्यात आली आहेत.
"महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आंदोलने प्रथमच रुपेरी पडद्यावर' अशा प्रकारची बातमी "सकाळ'ने याआधीच प्रसिद्ध केली आहे; मात्र ही आंदोलने कशा पद्धतीने किंवा कशासाठी दाखविण्यात आली आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी यावरून आता मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे. याबाबत मनसेच्या सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमेय खोपकर म्हणाले, ""हा चित्रपट आमच्याविरोधात आहे, असे आम्ही ऐकले आहे. टीव्हीवरील प्रोमोज, तसेच चित्रपटसृष्टीतील काही जाणकारांनी आम्हाला ही माहिती दिली आहे. त्यामुळे हा चित्रपट आम्हाला आता पाहायचा आहे. चित्रपटात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर काही भलतेसलते आरोप केलेले असतील किंवा आमच्या आंदोलनांबाबत काही वेगळेच भाष्य केलेले असेल, तर आम्ही त्याची गंभीर दखल घेणार आहोत. हा चित्रपट महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत प्रदर्शित होऊ देणार नाही.''
दिग्दर्शक रवी कपूर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, ""आम्ही त्यांना चित्रपट दाखविण्यास तयार आहोत. ते आमचे राजा आहेत आणि प्रजा कधीही राजाला दुखवीत नसते. त्यांना कुणी तरी चुकीची माहिती दिली आहे.''
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें