अयोध्याप्रश्नी गोंधळ का घातला - राज ठाकरे
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, February 23, 2010 AT 12:15 AM (IST)
जळगाव - अयोध्येतील वादग्रस्त जागेवरील दावा सोडवा. आम्ही जवळच मोठी मशीद बांधून देऊ, अशी वक्तव्ये करणाऱ्यांना अशीच भूमिका घ्यावयाची होती, तर एवढा गोंधळ का घातला? असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज चोपडा येथे सांगितले. चोपडा येथे झालेल्या पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
मुस्लिमांनी हिंदूंच्या भावनांबाबत उदार दृष्टिकोन बाळगत अयोध्येतील वादग्रस्त जागेवरील दावा सोडावा, आम्ही जवळच मोठी मशीद बांधून देऊ, असे वक्तव्य पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन गडकरी यांनी इंदूर येथे नुकत्याच झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात केले होते. त्याचा खरपूस समाचार घेत "मनसे'चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट नितीन गडकरींवर तोफ डागली. ते म्हणाले, की भाजपची हीच जर भूमिका होती, तर एवढा हंगामा कशाला केला? भाजपने त्याच वेळी जर मशीद बांधून दिली असती, तर एवढ्या दंगली कशाला पेटल्या असत्या?, असा टोलाही त्यांनी लगावला.
मराठी दिनानिमित्त "मनसे'ने राज ठाकरे यांचा संदेश असलेली पुस्तिका तयार केली आहे. ती 27 फेब्रुवारीला महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचविली जाईल, तसेच एक पत्रकही माझ्या स्वाक्षरीचे दिले जाणार आहे. पुस्तिकेत "मनसे'तर्फे मराठी अस्मिता जपण्यासाठी काय कार्यक्रम घेतले जातील, त्याबाबतची माहिती दिली आहे. पत्रकात मराठी माणसाला त्याची जाण करून देण्याचा प्रयत्न केला आहे.
श्री. ठाकरे म्हणाले, की मराठी माणसे राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करीत आहेत, ही चांगली बाब असली, तरी महाराष्ट्रात कुठलाच राष्ट्रीय पक्ष मराठी अस्मितेसाठी काम करीत नसल्याची खंत आहे. प्रत्येक राज्यात आपल्या राज्याची अस्मिता जपण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, महाराष्ट्रात तसे घडत नसल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण बेरोजगारीचे प्रश्न मिटविणे, हेच माझे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
श्री. ठाकरे यांनी काही बाबींबर थेट उत्तर न देता "करू', "बघा' या कोड्यात माहिती दिली. महागाईसंदर्भात ते म्हणाले, की केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना ज्योतिषी मिळाला आहे. यामुळे निश्चितच अन्नधान्याचे भाव कमी होतील. सुमारे 25 मिनिटे त्यांनी पत्रकारांशी चर्चा केली. त्यानंतर ते दुपारी तीनपर्यंत कार्यकर्त्यांशी बोलत राहिले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें