गुरुवार, 18 मार्च 2010

मान्यताप्राप्त पक्ष म्हणून मनसेवर शिक्कामोर्तब

मान्यताप्राप्त पक्ष म्हणून मनसेवर शिक्कामोर्तब
सकाळ वृत्तसेवा
Friday, March 19, 2010 AT 12:15 AM (IST)

मुंबई - लोकसभा निवडणुकीत लाखभर मते मिळविल्यानंतर विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच 13 आमदार निवडून आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर निवडणूक आयोगाने मान्यताप्राप्त राजकीय पक्ष म्हणून आज शिक्कामोर्तब केले. त्यामुळे मनसेकडून आता सर्व निवडणुका इंजिन या निवडणूक चिन्हावरून लढविल्या जाणार आहेत.

विधानसभेत 13 आमदार निवडून आल्यानंतर मनसेने मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या नोंदणीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला होता. त्यानंतर आयोगाने मनसेला मान्यताप्राप्त राजकीय पक्ष म्हणून मंजुरी दिली होती; परंतु या संदर्भात मनसेला लेखी मंजुरी मिळालेली नव्हती. त्यामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या नवी मुंबई व औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुका या मनसेच्या उमेदवारांना मुक्त चिन्ह घेऊन लढवाव्या लागणार होत्या. या प्रकरणी मनसेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर उद्या (ता. 19) सुनावणी होणार होती; पण आज रात्रीच मनसेला लेखी मंजुरीचे पत्र मुख्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाल्याची माहिती मनसेचे आमदार नितीन सरदेसाई यांनी दिली. या लेखी परवानगीमुळे आगामी निवडणुका मनसे आपल्या इंजिन या अधिकृत चिन्हावर लढविण्यास मोकळी झाल्याचे आमदार सरदेसाई यांनी सांगितले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें