सोमवार, 1 नवंबर 2010

त्रिशंकू"राज'

त्रिशंकू"राज'
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, November 02, 2010 AT 01:00 AM (IST)
 
डोंबिवली - शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वादाने राज्यभरात गाजलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीतील मतदारांचा कौल आज स्पष्ट झाला. या निवडणुकीत मनसेच्या "इंजिना'ने युती आणि आघाडीला "धडक' देत तब्बल 26 जागांवर विजय मिळविला. मतदारांनी संमिश्र कौल दिल्याने महापालिकेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली असून सत्तेच्या चाव्या मनसेच्या हाती आल्या आहेत.

आघाडी किंवा युती कोणालाही सत्ता मिळवायची असेल, मनसेची मदत घेण्यावाचून पर्याय नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे मनसे कोणाला पाठिंबा देणार, याबाबत अनेक मतप्रवाह आहेत किंवा महापौर मनसेचा आणि अन्य पदे मदत करणाऱ्या पक्षांना अशीही समीकरणे जुळू शकतात, ही चर्चाही रंगली आहे. सत्तेच्या सारीपाटावर मनसे कोणती चाल खेळणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र कॉंग्रेस-राष्ट्रवादीने अद्याप आपले पत्ते खुले न केल्याने त्यांची भूमिका गुलदस्त्यात आहे. सत्तेबाबत राज ठाकरे यांनीच पुढाकार घ्यावा म्हणून आघाडीचे नेते तूर्त गप्प आहेत; तर शिवसेनेने सत्तेसाठी, महापौरपदासाठी समविचारी नगरसेवकांसोबत जाण्याचे संकेत दिल्याने राजकीय चित्र नेमके कसे असेल, याबाबत उत्सुकता आहे.

कल्याण-डोंबिवली पालिकेच्या 107 पैकी 40 जागा सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीला मिळाल्या आहेत. शिवसेनेने 31, तर भाजपने अवघ्या 9 जागांवर विजय मिळविला आहे. या निवडणुकीत भाजपला लढविलेल्या जागांपैकी 10 टक्केच प्रतिसाद मिळाला आहे. डोंबिवली हा संघाचा बालेकिल्ला समजला जातो; मात्र डोंबिवलीतील पांढरपेशा मतदाराने भाजपला सपशेल नाकारले आहे. शिवाय शिवसेनेच्या बंडखोरीचा फटकाही भाजपला बसला आहे. मनसेच्या "इंजिना'ने सर्वच पक्षांना मोठी "धडक' दिल्याचा ठाम दावा मनसेच्या नेत्यांनी केला आहे. शिवसेनेला गेल्या निवडणुकीपेक्षा दोन जागा जास्त मिळाल्या आहेत. शिवसेनेने आपल्याकडील बहुतांश प्रभाग राखले आहेत. मात्र भाजपला मिळालेल्या कमी जागांमुळे शिवसेनेची चिंता वाढली आहे. निवडून आलेल्या अपक्षांपैकी पाच जण आम्ही पुरस्कृत केलेले आहेत, असा दावा शिवसेनेने केला आहे. त्यांचा पाठिंबा गृहीत धरता युतीचे संख्याबळ 45 पर्यंत जाते. मात्र शिवसेना-भाजप युतीने उमेदवारी नाकारलेल्या; तरीही निवडून आलेल्यांपैकी किती अपक्ष सत्तेसाठी पुन्हा युतीच्या छताखाली येतील, याबाबत राजकीय वर्तुळात शंका आहे.

दरम्यान, "मनसे फॅक्‍टर'चा फटका आघाडीलाही बसला आहे. आघाडीतील कॉंग्रेस व राष्ट्रवादीने प्रत्येकी 15 जागांवर विजय मिळविला आहे; तर 11 अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. कल्याण-डोंबिवली विकास आघाडीचे 12 बंडखोर रिंगणात होते. त्यापैकी एकच निवडून आला आहे. या बंडखोरांनी कॉंग्रेसविरोधात उघडलेल्या विकास आघाडीचा फार फटका बसलेला नाही, तर आघाडीला "मनसे फॅक्‍टर' मारक ठरला. मनसेमुळे आघाडीची पीछेहाट झाली, असे निकालांवरुन दिसते.
निवडणुकीच्या प्रचारात मनसे विरुद्ध शिवसेना असा "ठाकरी' प्रचार रंगला होता. "मनसेला मत म्हणजे कॉंग्रेसला मत' अशी टीका शिवसेनेकडून होत असल्याने मनसे आघाडीसोबत जाणार का किंवा आपल्या महापौरपदासाठी आघाडीचा पाठिंबा घेणार का, असा प्रश्‍न कार्यकर्त्यांत चर्चिला जात आहे. त्याचवेळी मनसे शिवसेनेबरोबर जाणार नाही. कॉंग्रेस आघाडीला समर्थन देईल, असे दावे आघाडीच्या नेतेमंडळींकडून सुरू आहेत.

पक्षीय बलाबल
शिवसेना -31
भाजप -09
मनसे -26
कॉंग्रेस -15
राष्ट्रवादी -15
अपक्ष व इतर -11
एकूण -107

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें