गुरुवार, 31 मार्च 2011

बेस्टमध्ये मनसेने जागा पटकावली

बेस्टमध्ये मनसेने जागा पटकावली
सकाळ वृत्तसेवा
Thursday, March 31, 2011 AT 12:45 AM (IST)
 
मुंबई - मुंबई महापालिकेत समाजवादी पक्षा (सप)चे आणि मनसेचे प्रत्येकी सात सदस्य असल्याने या दोन्ही पक्षांपैकी बेस्ट समितीवर नियुक्त करायच्या एका सदस्यासाठी मंगळवारी (ता.29) पालिका सभागृहात मतदान घ्यावे लागले. ऐन वेळी समाजवादी पक्षाचा सदस्य गैरहजर राहिल्यामुळे मनसेच्या सदस्याला निवडण्याशिवाय शिवसेनेपुढे पर्याय राहिला नाही. भाजपने समाजवादी पक्षाऐवजी मनसेला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्यामुळे शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली. अखेर मनसेचे प्रकाश पाटणकर यांनी "बेस्ट'मध्ये जागा मिळवलीच.

पालिकेच्या स्थायी, सुधार, शिक्षण आणि बेस्ट समित्यांच्या सदस्यांची मुदत संपल्याने मंगळवारी पालिकेच्या सभागृहात या समित्यांच्या सदस्यांच्या नव्या नियुक्‍त्या जाहीर करण्यात आल्या. पालिकेत सप आणि मनसे यांचे संख्याबळ समान आहे. स्थायी आणि सुधार समितीतील संख्याबळामुळे या दोन्ही पक्षांचा प्रत्येकी एकेक सदस्य आहे; मात्र बेस्टमध्ये त्यांचा सदस्य नसल्याने या समितीच्या सदस्यत्वासाठी दोन्ही पक्षांनी जोरदार प्रयत्न चालविले होते. एखाद्या सदस्याच्या निवडीसाठी राजकीय पक्षांनी गट केल्यामुळे त्याच्यासाठी निवडणूक अपरिहार्य ठरते. त्यामुळे ही निवडणूक घ्यावी लागली.

मनसेने प्रकाश पाटणकर आणि "सप'ने शेख नझीमुल्ला यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. निवडणुकीच्या वेळी साजिया आझमी या गैरहजर होत्या. त्यामुळे सपची सदस्यसंख्या सहा झाली, तर मनसेचे सर्व सातही सदस्य हजर असल्याने पाटणकर यांचा एका मताने विजय झाला.
बेस्टमध्ये मनसेला एन्ट्री मिळू नये यासाठी शिवसेनेने जोरदार प्रयत्न चालविले होते. महापौर श्रद्धा जाधव आणि सभागृहनेते सुनील प्रभू यांनी भाजपचे मन वळविण्याचा प्रयत्न केला होता; मात्र भाजपने सपला सहकार्य न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिवसेना संकटात सापडली. भाजपने मनसेला मतदान केले, तर शिवसेना सपच्या पाठीशी राहिली. मनसेने या निवडणुकीत बाजी मारल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

नवनियुक्त सदस्यस्थायी समिती - शिवसेना - शुभदा गुडेकर, कॉंग्रेस - सूर्यवंश ठाकूर, रघुनाथ थवई, भाजप - विद्या ठाकूर.
सुधार समिती - भाजप - भालचंद्र शिरसाट, शिवसेना - दिलीप शिंदे, शिवकुमार झा, राष्ट्रवादी कॉंग्रेस - चारू चंदन शर्मा.
शिक्षण समिती - कॉंग्रेस - भोमसिंह राठोड, भाजप - विनोद घेडिया, उज्ज्वला मोडक, राष्ट्रवादी कॉंग्रेस - सारिका ग्रेसेस.
बेस्ट समिती - मनसे - प्रकाश पाटणकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस - शरद शिवकुमार पवार.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें