शुक्रवार, 16 सितंबर 2011
मुंबई वार्तापत्र - मराठी मतांसाठी पुन्हा फिल्मी "राज'कारण
मुंबई वार्तापत्र - मराठी मतांसाठी पुन्हा फिल्मी "राज'कारण
मृणालिनी नानिवडेकर (सकाळ न्यूज नेटवर्क)
Saturday, September 17, 2011 AT 12:15 AM (IST)
मराठी मतांवर दावा सांगण्यासाठी राज ठाकरे पुढे आले आहेत. एका जाहिरातीत मराठी महिलेचा झालेला वापर म्हणूनच त्यांना खटकला की काय, अशी शंका येते. असे भावनिक राजकारण करून मतपेटी मजबूत होते का हे आता पाहायचे.
निवडणुका आल्या की कारभाराचे ऑडिट देण्यापासून खड्डे मोजण्यापर्यंतची सारी आन्हिके नव्या उत्साहात सुरू होतात. मराठीचा विषयही तसाच समोर आला आहे. जाहिरातीत मराठी माणसाला मिळणाऱ्या दुय्यम स्थानाचा विषय घेऊन राज ठाकरे महापालिकेच्या फडात उतरण्यास सज्ज झालेले दिसतात. कुणाचे मराठीपण अधिक प्रखर हे दाखवण्यासाठी जुन्या आणि नव्या सेनेतला सामना नेहमीप्रमाणे रंगत जाईल. यात मराठी माणसाच्या, मराठी अस्मितेच्या आणि महाराष्ट्राच्या प्रश्नांना खरोखरच न्याय मिळेल का? छोटे ठाकरे गुजरातेतून नुकतेच परतले आहेत. त्यामुळे या वेळचे मराठीपुराण क्रियाशीलतेवर भर देणारे असेल, अशी आशा बाळगायला हरकत नसावी.
मुंबई-पुणे-नाशिकचा सुवर्णत्रिकोण ओलांडू न शकलेली प्रगती, संपन्न म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील अर्धी जनता दारिद्य्ररेषेच्या खाली, नागरी भागातील झोपड्यांत होणारी वाढ, दाक्षिणात्य राज्यांनी औद्योगीकरणात मारलेली बाजी, मराठी भाषेची सातत्याने होत असलेली पीछेहाट, असे अनेक प्रश्न महाराष्ट्रासमोर आ वासून उभे आहेत. प्रत्यक्षात या प्रश्नांना हात घालण्याऐवजी प्रतीकात्मक मुद्द्यांनाच राज ठाकरे धरून बसणार का, या उत्तरात जनतेला रस आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष साटेलोटे करून आपल्याला लुटतात, अशी जनभावना आहे. त्यामुळेच राजकीय क्षितिजावर नव्यानेच उगवलेल्या मनसेकडे जनता फार अपेक्षेने पाहते. त्यातच गुजरातचा दौरा करून आपल्याला प्रगतीत रस आहे, असे चित्र निर्माण करण्यात राज ठाकरे यशस्वी झाले आहेत.
"ठाकरे ब्रॅंड'चे यश
मराठी माणसाच्या प्रश्नांना त्यांनी हात लावताच मध्यमवर्गीय उत्साहाने कान टवकारतात, तर आता नक्कीच काही तरी बदल होईल, ही वेडी आशा निम्नमध्यमवर्गींयात जागी होते. हे "ठाकरे ब्रॅंड'चे यश आहे. दशदिशांतून येणाऱ्या कुशल-अकुशल कामगारांच्या जोरावरच कुठलेही महानगर विकसित होत असते. प्रादेशिकतेची कुंपणे घालून प्रगती होत नसते हे सत्य. पण त्या त्या शहरातल्या मूळ रहिवाशांचे अस्तित्व या प्रक्रियेत हरवू लागले, की गोंधळ सुरू होतो. बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईतल्या मराठी माणसाला आवाज कुणाचा हे ठणकावून सांगण्याचे धैर्य दिले. दाक्षिणात्यांकडे गेलेल्या नोकऱ्या लोकाधिकाराने मराठी माणसाकडे परत पोचवल्या. त्यांचा शत्रूही हे वास्तव नाकारू शकणार नाही. पण जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रांत समोर येण्याचे परिश्रम करण्याची साहसी वृत्ती मराठी माणसांत निर्माण झाली नाही. दहा ते पाच काम करून घरी परतण्यात धन्यता मानणारा मराठी माणूस जीवनाच्या नवनव्या क्षेत्रांना कवटाळण्यासाठी फारसा उत्सुक नसतो, हा समज सर्वमान्य होत गेला. महाराष्ट्रातल्या मुंबईत बॉलिवूड वाढले; पण मराठी सिनेइंडस्ट्री मात्र कोल्हापुरातच रमली. अटकेपार झेंडे रोवणाऱ्या मराठी माणसाची पीछेहाट पानिपतच्या पराजयाने झाली की मनोवृत्तीने ते सांगता येणार नाही; पण आपण मर्यादित राहिलो हे मात्र खरे. पांडू हवालदार, गंगूबाई अशा स्वरूपात चित्रपटसृष्टी मराठी माणसाचे चित्र रेखाटू लागली. "सारांश'सारख्या अद्वितीय चित्रपटात सदाचाराचा आग्रह धरणारा निवृत्त मुख्याध्यापक मराठी दाखवला. पण अशी उदाहरणे विरळा. एका मोबाईल कंपनीच्या जाहिरातीत हॅंडसेट चोरणारी बाई मराठी दाखवल्याने राज ठाकरे संतापले आणि त्यांनी ही जाहिरात मागे घ्यायला लावली. यापुढे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी देऊन टाकला. "खळळ खटाक'च्या भीतीने या पुढे कुणीही अशी कृती करणार नाही. पण खरे प्रश्न पुढेच आहेत. मुळात अशी प्रतीकात्मक कृती निवडणुकीमुळे केली काय हा जनतेच्या मनात येणारा पहिला प्रश्न. येती महापालिका निवडणूक ठाकरे बंधूंमधील संघर्षाचा नवा सामना ठरणार आहे. भाऊबंदकीच्या कथा आपल्याला महाभारत काळापासून आवडत असल्याने चॅनेलवाले टीआरपीसाठी दोघांमधले कलगीतुरे रंगवण्यास प्राधान्य देतील. अंतर्गत वादामुळे मुंबई पालिकेतला प्रमुख विरोधी पक्ष कॉंग्रेस निवडणूक लढण्यापूर्वीच हरल्यात जमा आहे. आघाडी होईल काय याबाबतची धूसरता कायम आहे. पालिकेचा कारभार फारसा समाधानकारक नाही; मात्र त्याविरोधात औषधालाही कॉंग्रसने आवाज केलेला नाही. मुंबईची सत्ता मराठी माणसाच्या हातात राहावी, या उदात्त हेतूने कॉंग्रेसने नेहमीच शिवसेनेला मोकळीक दिल्याचे राजकीय अभ्यासक नमूद करतात. मात्र या मराठी मतांवर दावा सांगण्यासाठी राज ठाकरे पुढे आले आहेत. शिवसेनाप्रमुख ठाकरेंचे नेतृत्व, शिस्तबद्ध शाखांची उत्तम बांधणी, रिपब्लिकन मतांची संभाव्य बेरीज अशी रसद घेऊन उद्धव ठाकरे मैदानात उतरणार आहेत, तर प्रतिमा हे राज यांच्याजवळचे एकमेव भांडवल आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूकही अशीच झाली होती. मुंबईत नेमके काय घडेल याचा अंदाज यायला अद्याप वेळ आहे. मात्र मराठी माणसांचे प्रश्न केवळ मतांसाठी हाती घेतले जातील काय, हा प्रश्न मात्र आजच निर्माण झाला आहे. मासेमारीपासून तर कॉर्पोरेट पदापर्यंतचे सारे व्यवहार परप्रांतीयांच्या हाती आहेत.
मोदींनी गुजराती माणसातल्या उद्यमशीलतेला आवाहन करीत ते राज्य समोर आणले. बाळासाहेब आणि राज या दोघांचे राजकारणही त्याच पठडीतले आहे. संकुचित दृष्टिकोनाचा स्वीकार ठाकरेंनी केला; पण प्रगतीचा अजेंडा देण्याचे काय? १९९५ नंतर महाराष्ट्राची पीछेहाट का होत गेली, याची उत्तरे राज्यकर्त्यांना सेनेने विचारली नाहीत. आज राज ठाकरेंचे मराठीपणाचे कढ हे केवळ भावनिक राजकारण पेटवण्याचा प्रयत्न वाटतो आहे एवढेच
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें