मनसेचा कोणताही आमदार युरोप दौऱ्यात नाही
- सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, May 05, 2012 AT 03:45 AM (IST)
मुंबई - युरोप दौऱ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कोणताही आमदार जाणार नाही, असे पक्षाचे विधिमंडळ व्हिप आमदार नितीन सरदेसाई यांनी आज स्पष्ट केले. विधिमंडळ प्रतोद म्हणून आपण विधान मंडळ सचिवालयाच्या प्रधान सचिवांना याआधीच तसे पत्र दिल्याचे ते म्हणाले. राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने हा दौरा होणार आहे.
"सकाळ'मध्ये या संदर्भात "मनसेचाही आमदार युरोप दौऱ्यात' या मथळ्याखालील वृत्त प्रसिद्ध झाले होते. यावर स्पष्टीकरण देताना सरदेसाई यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केले. ते म्हणाले, की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी या दौऱ्यासाठी पक्षाचे आमदार नितीन भोसले यांचे नाव सुचविले होते; मात्र त्यानंतर कोणत्याही आमदाराला पाठविण्यात येणार नसल्याचे पक्षाने स्पष्ट केल्याची माहिती सरदेसाई यांनी दिली.
सरदेसाई यांच्या वतीने महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयाच्या प्रधान सचिवांना पाठविलेले पत्र या विभागाच्या लिपिकांनी स्वीकारल्याची तारीख 2 मे आहे. या पत्रात मे व जून 2012 मध्ये राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेच्या वतीने युरोपीय देशाचा परदेश दौरा होणार आहे. या दौऱ्याकरिता मनसे पक्षाच्या सदस्याचे नाव कळविण्याबाबतचे पत्र प्राप्त झाले आहे. परंतु या दौऱ्यासाठी मनसेकडून कोणताही सदस्य पाठविण्यात येणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. राज ठाकरे यांनी "आधी केले, मग सांगितले" या भावनेने प्रथम आपल्या आमदारांना परदेश दौऱ्यावर न जाण्याचा आदेश दिला व नंतर इतरांना सल्ला दिला असल्याचे सरदेसाई यांनी सांगितले
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें