मनसेचे 'सूरक्षेत्र' जुळले
Friday, September 07, 2012 AT 01:45 AM (IST)
याआधी कार्यक्रम करूनच दाखवा, मनसे "खळ्ळ खट्याक्' करेल, अशी गर्जना करणाऱ्या मनसेने अचानक आंदोलनाची तलवार म्यान केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यात शिवसेनेने मात्र आपला पाकिस्तानी कलाकारांविरोधातील पवित्रा कायम ठेवला आहे. शिवसैनिक आर्कुट आणि फेसबुकवरून आपला विरोध व्यक्त करणार आहेत.
पाकिस्तानी कलाकारांना येथे काम करू देणार नाही, अशा प्रकारची धमकी शिवसेना आणि मनसेच्या नेतृत्वाने दिली होती. असे असतानाही आज कित्येक पाकिस्तानी कलाकार व गायक इंडस्ट्रीत काम करीत आहेत. पाकिस्तानी गायकांचे एकापाठोपाठ एक अल्बम येथे येत आहेत. काही गाण्यांचे रेकॉर्डिंगही होत आहे. त्यातच आता "कलर्स' आणि "सहारा' या वाहिन्यांवर "सूरक्षेत्र' हा कार्यक्रम येणार असल्याचे आणि त्यात पाकिस्तानी गायक असल्याचे समजताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट शाखेने याला कडाडून विरोध केला होता. "कलर्स' व "सहारा' या दोन्ही वाहिन्यांना मनसेने धमकीचे पत्र दिले होते. या पत्रात अशा प्रकारचा शो आम्ही होऊ देणार नाही. तरीही तो प्रसारित झाल्यास आमच्या स्टाईलने आंदोलन करू, असे म्हटले होते.
राज ठाकरे यांनी या शोचे चित्रीकरण दुबईत झाले असले तरी त्यांची कार्यालये येथे आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा सज्जड दम भरला होता. त्यामुळे "कलर्स' व "सहारा' या वाहिन्यांच्या कार्यालयांबाहेर पोलिस बंदोबस्त वाढविला होता. मात्र आज सकाळी "सहारा'चे संचालक बोनी कपूर, "कलर्स'चे सीईओ राज नायक हे राज यांना भेटायला "कृष्णकुंज'वर गेले. त्यांच्यात या कार्यक्रमाबाबत चर्चा झाली आणि त्यानंतर राज यांनी या कार्यक्रमाला परवानगी दिली.
यापुढे पाकिस्तानी कलाकारांना संधी नाही
भविष्यात पाकिस्तानी कलाकारांना घेऊन आम्ही कोणताही कार्यक्रम करणार नाही, असे आश्वासन बोनी कपूर व राज नायक यांनी दिल्यानंतर प्रसारणाची परवानगी दिली. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर म्हणाले, की पाकिस्तानी कलाकारांना यापुढे घेणार नाही, असे आश्वासन बोनी कपूर व राज नायक यांनी आम्हाला दिले. त्यामुळेच ही परवानगी दिली. तशी खबरदारी बोनी हे घेतील, असे त्यांनी आम्हाला कळविले आहे. या कार्यक्रमाचे चित्रीकरण झाले आहे. त्यामुळे आम्हाला मोठे नुकसान सोसावे लागेल, असे म्हणणे बोनी कपूर यांनी राज यांच्यासमोर मांडले.
शिवसेनेची फेसबुकगिरी
शिवसेनेचा पाकिस्तानी कलाकारांना विरोध आहे आणि तो कायम राहील, असे भारतीय चित्रपट सेनेचे अध्यक्ष अभिजीत पानसे यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, की आम्ही अजिबात शेपूट घालणार नाही. देशबांधवांच्या भावनांची आम्ही आदर करतो. पाकिस्तानी कलाकारांना येथे पाय ठेवू देणार नाही. हा सगळा खेळ टीआरपीसाठी चाललेला आहे. त्यामुळे आम्ही आर्कुट व फेसबुकवर कम्युनिटी तयार करणार आहोत. सगळ्यांना हा कार्यक्रम पाहू नका आणि टीआरपी वाढवू नका, असे आवाहन करणार आहोत.
सचिनबाबतची भूमिकाही स्पष्ट करावी- आशा भोसले
प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना "अतिथी देवो भव की पैसे देव भव!' असे सुनावणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी "कलर्स' व "सहारा' या वाहिन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या एका भेटीतच "मिले सूर मेरा तुम्हारा' असे सूर जुळविण्याचा प्रयत्न केला आहे. राज यांच्या आरोपाला आशाताई यांनी "लोगों का काम है कहना' असा टोला लगावला. आशाताईंवर आरोप करणाऱ्या राज यांनी लगेच आपली भूमिका का बदलावी, असा प्रश्न विचारला जात आहे. राज यांच्या टीकेला आशाताईंनी आजवर उत्तर दिले नव्हते.
गुरुवारी त्यांना विचारले असता एका वाहिनीशी बोलताना त्या म्हणाल्या, ""कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना...'' या गाण्याच्या ओळी सुरेल आवाजात गाऊन प्रत्युत्तर दिले. त्या पुढे म्हणाल्या, ""आपण पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करू नये, असा सल्ला देणाऱ्या राज यांनी सचिन तेंडुलकर पाकिस्तानी खेळाडूंसोबत खेळल्यास मनसेची भूमिका काय असेल, तेही स्पष्ट करावे.'' पाकिस्तानी कलाकारांना घेतल्याबद्दल वाहिन्यांना धमकाविणाऱ्या राज ठाकरे यांनी वाहिन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुरात सूर मिसळावा याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. या भेटीत चर्चा झाली की "अर्थ'पूर्ण सेटलमेंट झाली, अशी चर्चा सगळीकडे रंगली आहे
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें