गुरुवार, 21 मार्च 2013

आमदार राम कदम आणि क्षितिज ठाकूर यांना अटक

आमदार राम कदम आणि क्षितिज ठाकूर यांना अटक

-
Thursday, March 21, 2013 AT 11:20 AM (IST)

मुंबई - विधिमंडळात एसीपी सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई झालेले आमदार राम कदम आणि क्षितिज ठाकूर हे दोघेही आज (गुरुवार) पोलिसांसमोर शरण आले. मुंबई क्राईम ब्रॅंचसमोर हे दोघेही आज हजर झाले. या दोघांनाही थोड्यावेळात न्यायालयामध्ये हजर केले जाईल.

पोलिस निरीक्षकाला विधानभवनात मारहाण करणाऱ्या पाच आमदारांना 31 डिसेंबर 2013 पर्यंत निलंबित करण्याचा निर्णय आज विधानसभेत घेण्यात आला. यामध्ये बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर, मनसेचे आमदार राम कदम, शिवसेना आमदार राजन साळवी, भाजप आमदार जयकुमार रावळ आणि अपक्ष आमदार प्रदीप जयस्वाल यांचा समावेश आहे.

या पाचही आमदारांना 31 डिसेंबर 2013 पर्यंत मुंबई आणि नागपूर येथील विधानभवनाच्या आवारातदेखील येण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यांच्या निलंबनाची कारवाई करू नये यासाठी सर्वपक्षीय आमदारांनी सरकारवर दबाव आणला होता. मात्र, या दबावाला झुगारून सरकारने विधानसभेत आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर करत निलंबनावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले.

या आमदारांनी पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना मंगळवारी (ता. 19) विधानभवनात मारहाण केली होती. या निंदनीय प्रकाराचे तीव्र पडसाद देशभरात उमटले. विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातल्या जनतेची जाहीर माफी मागत या प्रकाराचा खेद व्यक्‍त केला. या आमदारांवर मारहाणीबाबत गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. त्यामुळे सरकारने त्यांचे निलंबन करू नये, असा दबाव सर्वपक्षीय आमदारांनी सरकारवर टाकला होता. मात्र, सरकारने हा दबाव झुगारला आणि विधानसभेत विधिमंडळ कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी निलंबनाचा प्रस्ताव मांडला.

काल दुपारी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी निलंबनाचा प्रस्ताव मांडला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें