रविवार, 5 मई 2013

राज ठाकरे आले अन्‌ छावणी पाहून गेले!

फुलंब्री- फर्शी फाटा येथे मनसेतर्फे उभारण्यात आलेल्या जनावरांच्या छावणीस राज ठाकरे यांनी रविवारी (ता. 5) भेट दिली. राज ठाकरे येणार असल्याने सर्व स्तरांतील लोक मोठ्या संख्येने जमा झाले होते.

राज ठाकरे नेहमीच्या स्टाईलने वाहनातून उतरले. चारा छावणीपासून 15 ते 20 फूट अंतरावर उभे राहून त्यांनी जनावरांची पाहणी केली. ते येथे जवळपास 15 मिनिटे थांबले. राज यांच्यासाठी छावणी हा नवा विषय होता. त्यामुळे प्रसारमाध्यमांचे बरेच प्रतिनिधी होते; मात्र कोणतेही आवाहन न करता अथवा छावणीबाबत काहीही न सांगता राज निघून गेले.

पुरणपोळी थाळीतच!
राज ठाकरे भेट देण्यासाठी येणार म्हणून छावणीच्या प्रथम रांगेत गाय-वासरू व दुभत्या गाई बांधल्या होत्या. या जनावरांना राज यांच्या हाताने पुरणपोळी भरवायची होती म्हणून दोन-तीन कार्यकर्ते थाळीमध्ये पुरणपोळी घेऊन उभे होते.
त्यांच्याकडे लक्ष गेल्यानंतर राज म्हणाले, "हे काय आहे?' तेव्हा कार्यकर्त्यांनी पुरणपोळी आपल्या हाताने गोमातांना भरवायची आहे, असे सांगितले. तेव्हा राज म्हणाले, "तूच खा आणि बाजूला हो.' लगेच पुरणपोळीवाले बाजूला सरकले. राज निघून गेले. पुरणपोळी थाळीतच राहिली. नंतर इतर कार्यकर्त्यांनी पुरणपोळ्या जनावरांना भरविल्या.


OTHER VIDEO

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें