नाशिक - महापालिका निवडणुकीत विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार असल्याचे दाखवीत नाशिककरांकडून मतांचा जोगवा मागणारे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सत्ता येऊन दीड वर्ष उलटल्याने आतातरी ब्ल्यू प्रिंट खुली करावी, अशी अपेक्षा नाशिककर श्री. ठाकरे यांच्या दोन दिवसांच्या निमित्ताने करीत आहेत.
ठाकरे यांच्या दौऱ्यात प्रथमच विकासकामांच्या उद्घाटनाचा धडाका राहणार असला तरी नाशिकसाठी ठोस असे काहीतरी काम दिसावे, अशी अपेक्षा आहे.
महापालिका निवडणुकीत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी विकासाच्या नावावर नाशिककरांकडे मते मागितली होती. नाशिककरांनी मनसेच्या पदरात भरभरून मते टाकलीही, परंतु गेल्या दीड वर्षात महापालिकेचा कारभार पाहता अपेक्षाभंग झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. राज ठाकरे महिन्या-दोन महिन्यांनी नाशिक दौऱ्यावर येतात, महापालिका आयुक्तांची भेट घेऊन लवाजम्यासह परततात. नाशिककर मात्र आज, उद्या राज ठाकरे आपल्या पदरात काहीतरी पाडतील, या भोळ्याभाबड्या अपेक्षेने पाहतात, हा आजवरचा अनुभव आहे. परंतु आता ठोस कामे दाखवावी, अशी मागणी होऊ लागली आहे. ठाकरे यांच्या दौऱ्यात त्यांच्याच पक्षातील नगरसेवकांच्या विकासकामांचे उद्घाटन होणार आहे. परंतु नाशिकसाठी काहीतरी ठोस असे काम दिसले पाहिजे, अशी अपेक्षा आहे.
नाशिकचे प्रथम महापौर (स्व.) शांतारामबापू वावरे यांनी तरण तलाव व पालिका मुख्यालयाची इमारत उभारली, (स्व.) पंडितराव खैरे महापौर असताना गंगापूर धरणातून थेट पाइपलाइन योजना मंजूर झाली. माजी महापौर प्रकाश मते यांच्या कार्यकाळात घंटागाडीचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात आला. डॉ. शोभा बच्छाव यांच्या कार्यकाळात दादासाहेब फाळके स्मारकाची उभारणी करण्यात आली. दशरथ पाटील यांच्या कार्यकाळात गोदाघाट प्रकल्पाला प्रारंभ झाला. त्यांच्याच कार्यकाळात सिंहस्थाचे व्यवस्थित नियोजन होऊन विकासकामे झाली. बाळासाहेब सानप यांच्या कार्यकाळात स्मारकांचा विकास झाला. विनायक पांडे महापौर असताना साडेतीन हजार कोटी रुपयांची नेहरू पुनरुत्थान योजना अमलात आली. सत्तेवर असलेल्या प्रत्येक महापौरांकडून शहरासाठी ठोस असे काम केले आहे. परंतु मनसेकडून आतापर्यंत अपेक्षाभंगच झाल्याचा नाशिककरांचा अनुभव आहे. राज ठाकरे यांनी निवडणुकीत विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार असल्याचे आश्वासन दिले होते. दीड वर्ष झाले तरी ती प्रिंट अजून उघडलेलीच नाही. आताच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात ठाकरे काहीतरी घोषणा करतील, या आशेवर नाशिककर आहेत.
या समस्यांचे काय?
-शहरात कचऱ्याची समस्या बिकट झाली आहे. घंटागाडीचा ठेका देऊनही नियमित गाड्या येत नाहीत. शहराची नियमित साफसफाई होत नाही. महापौर ठोस निर्णय घेत नाहीत. सत्ताधारी पक्षापेक्षा विरोधकच अधिक प्रबळ दिसतात. भूसंपादनाच्या प्रक्रियेत बिल्डरांना दिले जाणारे झुकते माप, रस्त्यांची झालेली चाळण, गोदावरी प्रदूषण, मनसेच्या नगरसेवकांमधील बेबनावामुळे विकासावर झालेला परिणाम, सदस्यांची होत नसलेली कामे, वाढती अतिक्रमणे, महापालिकेत वाढत्या ठेकेदारीतून होणारे वाद.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें