मंगलवार, 30 सितंबर 2014

विदर्भातील नेत्यांनीच विदर्भाकडे दुर्लक्ष केले-राज

अमरावती- विदर्भातील नेत्यानींच विदर्भाच्या विकासाकडे दुर्लक्ष केले आहे. स्थानिक जमिनींचा वाळवंट केला आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (मंगळवार) केला.

अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथे मनसेची दुसरी प्रचारसभा झाली. यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले, ‘विदर्भाचा विकास न करण्यामागे येथील नेतेच जबाबदार आहेत. विदर्भात पर्यटनाला चांगला वाव आहे, मात्र दुर्दैवाने राज्यात पर्यटन खाते म्हणजे सर्वांत खालचे खाते समजले जाते. राजकीय नेत्यांनी कसदार जमिनींचे अक्षरशः वाळवंट केले आहे. महाराष्ट्रातील युवकांना मी रोजगार मिळवून देणार आहे. परप्रांतातील युवक महाराष्ट्रात येऊन पैसे मिळवताना दिसतात. पण, स्थानिक युवकांना रोजगार मिळत नाही. सरकार दुसऱ्याच्या मुलाला जवळ करत असून, आपल्या मुलाला मारतो आहे. पोलिस भरतीवेळी युवकांना जीव गमवावा लागला आहे, सरकारला याचे काहीही वाटत नाही. माझ्या हातात सरकार द्या सगळी परिस्थिती बदलून दाखवतो.‘

‘महाराष्ट्रामध्ये फक्त इच्छाशक्तीची कमतरता आहे. जनतेने सर्व राजकीय पक्षांना गाडून मनसेला संधी द्यावी. महाराष्ट्रातील शेतकरी पाण्याविना मरताना दिसत आहे. पण, राज्याचे उपमुख्यमंत्री बेजबाबदार विधान करत आहेत. गेल्या साठ वर्षात महिलांना शौचालय बांधून देऊ शकलो नाही हे मोठे दुर्दैवच आहे. मुख्यमंत्री कामच करत नाही, म्हणूनच त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे,‘ असेही ठाकरे म्हणाले.

गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावरही ठाकरे यांनी टीका केली. तामिळनाडूमधील नेते जयललिता यांच्या समर्थनार्थ येतात, पण आपल्याकडे तसे चित्र दिसत नसल्याचेही ते म्हणाले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें