मंगलवार, 28 अक्टूबर 2014

देवेंद्र फडणवीस असणार राज्याचे नवे मुख्यमंत्री

मुंबई- भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर आज (मंगळवार) शिक्कामोर्तब झाले. फडणवीस हे राज्यातील सर्वांत कमी वयाचे दुसरे मुख्यमंत्री असणार आहेत.

देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदावर निवड व्हावी यासाठी मांडलेल्या प्रस्तावात एकनाथ खडसे हे सूचक तर सुधीर मुनगंटीवर व पंकजा मुंडे यांनी अनुमोदन दिले. फडणवीस हे राज्यपाल विद्यासागर राव यांची आज सांयकाळी सहा वाजता भेट घेऊन, सत्ता स्थापन करण्यासाठी दावा करणार आहेत.

भाजपच्या विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यासाठी आज मुंबईत दुपारी चार वाजता बैठक झाली. भाजपचे निरीक्षक केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आणि राज्याचे प्रभारी सरचिटणीस जे. पी. नड्डा, माजी प्रभारी राजीव प्रताप रूडी आणि ओमप्रकाश माथूर आदी बैठकीला उपस्थित होते.

तत्पूर्वी, विधिमंडळ पक्षनेता आणि भावी मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांचे नाव आघाडीवर होते. याबरोबरच एकनाथ खडसे, पंकजा मुंडे-पालवे यांचीही नावे चर्चेत होती. पण, फडणवीस यांचे नाव जवळपास निश्‍चित मानले जात होते.

महाराष्ट्रात बहुमतासाठी भाजपला 23 जागांची गरज असून, पुन्हा शिवसेना व भाजप हे दोन्हीही पक्ष एकत्र येऊ शकतात, असे बोलले जात आहे. मात्र, सत्तेत वाटा मिळण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिवसेनेच्या सूचनांवर सावध पवित्रा घेताना भाजपने "विनाशर्त पाठिंब्याची मागणी केली आहे. प्रसंगी अल्पमताचे सरकारही बनविले जाऊ शकते, असेही भाजपच्या गोटातून सांगितले जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने नव्या सरकारच्या विश्‍वासदर्शक ठरावावरील मतदानादरम्यान अनुपस्थित राहण्याची हमी दिल्यामुळे सत्तेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बाहेरून पाठिंबा घ्यावा की जुना मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे सहकार्य घ्यावे, यावर भाजपने ‘थांबा आणि वाट पाहा‘चे धोरण स्वीकारले आहे. पक्षाचे केंद्रातील नेते उघडपणे यावर काहीही बोलण्यास तयार नाहीत. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना‘मधून पाठिंब्याबाबत स्पष्टपणे संकेत देण्यात आले आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें