पुणे
: ‘शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांच्याशी झालेली भेट ही स्मृतिदिनाशी संबंधित
होती, त्याचा राजकीय संबंध कोणी लावू नये,‘ अशा शब्दांत महाराष्ट्र
नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी आज शिवसेना- मनसे मनोमिलनाच्या
बातम्यांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. ‘राजकीय चर्चा करावयाची असेल, तर
अशा ठिकाणी होऊ शकते का? कार्यकर्त्यांच्या भावना चांगल्या आहेत; परंतु
पटकन अशा गोष्टी घडतात असे नाही,‘ असेही ठाकरे या वेळी म्हणाले.
शिवसेनाप्रमुख
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवतीर्थ मैदानावर उद्धव ठाकरे
आणि राज ठाकरे यांची सोमवारी एकत्रित भेट झाली. त्यावरून दोन्ही भाऊ एकत्र
येण्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. आज पुण्यात आल्यानंतर ठाकरे यांनी
पत्रकारांशी संवाद साधला.
ते
म्हणाले, ‘‘गेल्या स्मृतिदिनी मी गेलो नव्हतो. का गेलो नव्हतो, त्याच्या
खोलात मी जात नाही. तेथे दर्शनासाठी गेलो असताना उद्धव ठाकरे होते. त्यांना
मी भेटलो, त्यात काय गैर आहे? अशा वेळेसच आपण भेटतो. त्या भेटीचा काही
अर्थ काढू नका. मध्यंतरी माझ्या मुलीचा अपघात झाला त्या वेळी उद्धव तिला
भेटण्यासाठी रुग्णालयात आला होता, त्याचाही तुम्ही राजकीय अर्थ काढणार का?
अशा वेळेस राजकीय चर्चा होऊ शकते का? आणि करायची असेल, तर अशाच ठिकाणी ती
होऊ शकते का?‘‘ दोन भावांनी एकत्र यावे, या भावनांवर बोलताना राज ठाकरे
म्हणाले, ‘चांगल्या भावनांची कदर केली पाहिजे; परंतु अशा गोष्टी लगेच घडतात
असे नाही.‘
विश्वासदर्शक
ठरावावेळी सभागृहात जो प्रकार घडला, त्याबद्दल बोलताना ठाकरे म्हणाले,
‘‘सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण, हे कळेनासे झाले आहे. महाराष्ट्राच्या
इतिहासात कधी असा प्रकार घडला नाही. त्या दिवशी नेमके काय झाले हे कोणालाच
कळले नाही. बहुमत सिद्ध करण्याची ही पद्धत होऊ शकत नाही. आवाजी मतदान ही
कसली पद्धत आहे? पक्षाच्या चिन्हावर निवडून येतात. कोणत्या पक्षाचे किती
उमेदवार निवडून आले आहेत, हे सर्वांना माहिती आहे. मग ठरावावेळी मत
दाखविण्यास काय हरकत आहे? मतदान घेतले असते, तर अधिक स्पष्टता आली असती.
कधी गुप्त मतदान तर कधी हात वर करून, त्यातूनच हे घोडेबाजार घडतात. त्याला
प्रोत्साहन देणारेही हेच आहेत, त्यामुळे या सर्वांनी मिळून ठरवूनच हे केले
आहे का, अशी शंका येते.‘‘
सत्तेत
सहभागी करून घेण्यासाठी भाजप शिवसेनेला ताणत असल्याबद्दल बोलताना ठाकरे
म्हणाले, ‘‘भाजप त्यांचे राजकारण करणारच; परंतु किती ताणू द्यावयाचे हे
शिवसेनेने ठरविले पाहिजे होते. त्यांनी पटकन निर्णय घेतला असता, तर ही वेळ
आली नसती.‘‘
पक्ष संघटनेत बदल करणार
प्रत्येक
मतदारसंघात जाऊन तेथील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा निर्णय ठाकरे
यांनी घेतला आहे. आज त्यांनी कसबा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी
संवाद साधला. त्याबद्दल माहिती देताना ठाकरे म्हणाले, ‘‘संवाद साधण्याची
कार्यकर्त्यांची मागणी होती. असे सर्वच मतदारसंघात आणि त्यानंतर
जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. कार्यकर्त्यांनी केलेल्या
सूचना मी लिहून घेत आहे. त्यानंतर संघटनेत बदल करणार आहे.‘‘
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें