बुधवार, 10 जून 2015

महाराष्ट्राच्या मातीशी जुळवून घ्या : राज ठाकरे

पुणे- "मी काय देश तोडायला आलो नाही. महाराष्ट्रात आहात, तर येथील मातीशी जुळवून घ्या. शीख बांधव जसे एकरूप झाले, तसे एकरूप व्हा. तुम्ही मान द्या, आम्ही मान देऊ,‘ अशा शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी आपली भूमिका मांडली.

निमित्त होते, सरहद संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमाचे. त्या वेळी ठाकरे बोलत होते. संत नामदेव देशभर भागवत धर्माचा प्रचार करीत फिरले. त्याच बरोबरच त्यांनी एक धागा जोडण्याचेही काम केले. धागा जोडण्याचे काम एक शिंपीच चांगल्याप्रकारे करू शकतो, असे सांगून ठाकरे म्हणाले, ""शीख बांधव आले, ते मातीशी एकरूप झाले. स्वत:चा मतदारसंघ काढण्याच्या भानगडीत ते कधी पडले नाहीत. इतरांनीही तेच करावे, एवढीच माझी इच्छा आहे. जनसंघ आणि अकाली दलाची जेव्हा युती झाली होती. त्या वेळी पंजाबमध्ये हिंदीला विरोध झाला. पंजाबी हीच आमची भाषा राहील, असे सरकारने जाहीर केले. त्या वेळी जनसंघाने पाठिंबा काढून घेतला, हा इतिहास आहे. प्रत्येकाला आपल्या भाषेचा अभिमान असला पाहिजे.‘‘

------------------------------------------------------------------------
भाषणाच्या सुरवातीलाच ठाकरे म्हणाले, "काय योगायोग आहे. पावसाळ्याच्या तोडांवरच महाराष्ट्रात "बादल‘ आले. त्यामुळे महाराष्ट्रातील दुष्काळ आता तरी संपेल, एवढीच इच्छा व्यक्‍त करतो.‘‘ ठाकरे यांच्या कोटीला प्रेक्षकांनीही टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. बादल यांचे कौतुक करताना ठाकरे म्हणाले, "राजकारणात आज इतकी ज्येष्ठ आणि आदरणीय व्यक्ती राहिली नाही. त्यांची भेट होताच मी त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यांच्यासोबत व्यासपीठावर बसण्याची मला संधी मिळाली, ही गोष्ट अभिमानास्पद आहे.‘‘
------------------------------------------------------------------------

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें