बुधवार, 14 सितंबर 2016

...तर राज यांनी निवडणूक लढवावी:आशीष देशमुख

नागपूर - मुंबईतील प्रेस क्‍लबमध्ये विदर्भवाद्यांच्या पत्रकार परिषदेत धुडगूस घालणारे मनसेचे कार्यकर्ते लोकशाहीचे विरोधक आहेत. वेगळ्या विदर्भाला सामान्य लोकांचा विरोध आहे, असा त्यांचा ग्रह असल्यास मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी माझ्या काटोल मतदारसंघातून निवडणूक लढवावी व निवडून यावे, असे आव्हान काटोलचे भाजप आमदार आशीष देशमुख यांनी दिले आहे. ही निवडणूक राज ठाकरेंना लढविता यावी यासाठी आपण काटोलच्या आमदारकीचा राजीनामा देण्यास व स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर त्यांच्याविरोधात निवडणूक लढवण्यास तयार आहोत, अशी घोषणाही त्यांनी केली आहे.

आज मुंबईत घडलेल्या घटनेवर देशमुखांनी तीव्र आक्षेप घेतला. लोकशाहीत आपले मत मांडण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. वेगळ्या विदर्भाच्या मागणीचे विरोधक नागपुरात किंवा विदर्भात अन्यत्र येऊन वक्तव्ये करतात. त्यांचे अभिव्यक्तीचे व मताचे स्वातंत्र्य आम्ही मान्य करतो. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमांमध्ये असले प्रकार घडत नाहीत. तोच सभ्यपणा मनसेने मुंबईत दाखवायला हवा. धुडगूस घालणे हे सर्वांत सोपे काम आहे. त्यात कोणताही पराक्रम नाही. पराक्रम गाजवायचाच असेल, तर लोकशाही मार्गाचा अवलंब करून आपले मत मांडावे. गुंडगिरी करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. मनसे आणि अन्य विदर्भविरोधकांकडून अखंड महाराष्ट्रासाठी दिले जाणारे तर्क निराधार आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा किंवा त्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्यांचा विदर्भाच्या मागणीशी काहीही संबंध नाही. विदर्भ जबरीने महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात आला, हेच ऐतिहासिक वास्तव आहे. नव्या पिढीला हे वास्तव कळून चुकले आहे. त्यामुळे अखंड महाराष्ट्राच्या नावाखाली सुरू असलेला भूलभुलैया यापुढे खपणार नाही, असे मतही आशीष देशमुख यांनी नोंदविले आहे.

विधानसभेत केवळ एक आमदार असलेला मनसे. विदर्भात कुठेही विशेष अस्तित्व नाही. आता यांना कामे नाहीत. त्यामुळे हे बावरलेत. समोर आणखी वाईट दिवस आहेत त्यांच्या नशिबी. म्हणून राडा करून चमकोगिरी करत आहेत. स्वतः संयुक्त कुटुंबात राहिले नाहीत. बाळासाहेब ठाकरे या आपल्या नेत्याला दुःख देऊन स्वतः का वेगळा पक्ष काढला, याचे उत्तर आधी द्यावे. बाता करतात संयुक्त महाराष्ट्राच्या?
- नितीन रोंघे, संयोजक, महाविदर्भ जनजागरण

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें