रविवार, 23 अक्टूबर 2016

राज ठाकरेंची खंडणी आम्हाला नको: लष्कर

नवी दिल्ली - पाकिस्तानी कलाकारांना चित्रपटात संधी देणाऱ्या भारतीय चित्रपट निर्मात्यांना सैनिक कल्याण निधीस पाच कोटी रुपये देण्यासंदर्भात करण्यात आलेल्या बळजबरीबाबत भारतीय लष्कराकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

भारतामध्ये होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने फवाद खान या पाकिस्तानी कलाकाराचा समावेश असलेल्या "ए दिल हैं मुश्‍किल‘ या दिग्दर्शक करण जोहर याच्या चित्रपटाच्या प्रदर्शनावर तीव्र आक्षेप घेतला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी "काही अटी‘ घालत या चित्रपटाच्या प्रदर्शनास असलेला विरोध मागे घेत असल्याचे जाहीर केले. या अटींमध्ये सैनिक कल्याण निधीस पाच कोटी रुपये देण्यासंदर्भातील अटीचाही समावेश होता. या प्रकारासंदर्भात भारतीय लष्कराकडून तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली आहे. याआधीच उरी येथे दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर लष्कराकडून करण्यात आलेल्या "सर्जिकल स्ट्राईक्‍स‘चे राजकारण झाल्याने लष्कराकडून नाराजी व्यक्‍त करण्यात आली होती. या पार्श्‍वभूमीवरच, हा नवा प्रकार घडला आहे.
"लष्कराबरोबर राजकारण करु नका. भारतीय लष्करास अत्यंत शिस्तबद्ध, बिगर राजकीय व धर्मनिरपेक्ष पार्श्‍वभूमी लाभली आहे. तेव्हा अशा खालच्या स्तरावरील राजकीय चिखलफेकीमध्ये ओढले जावे, अशी लष्कराची इच्छा नाही,‘‘ असे संतप्त मत एका ज्येष्ठ लष्करी अधिकाऱ्याने व्यक्‍त केले आहे. ""सैनिक कल्याण निधीसाठी देण्यात येणारी रक्कम ही स्वेच्छेने देण्यात आली असल्यासच स्वीकारली जाते. खंडणी वा बळजबरी करुन देण्यास भाग पाडलेला निधी हा सैनिक कल्याण निधीसाठी स्वीकारला जात नाही,‘‘ अशी भावना अन्य एका अधिकाऱ्यानेही व्यक्त केली.
अनेक महिन्यांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर लष्कराने अंतिमत: स्वतंत्ररित्या निधी स्वीकारण्याचे मान्य केले असून यासाठीच सैनिक कल्याण निधीची (आर्मी वेलफेअर फंड बॅटल कॅज्युअल्टीज) स्थापना करण्यात आली आहे. मात्र राजकीय दबाव आणून निधी देण्यास भाग पाडले जाणे सर्वथा चुकीचे असल्याचे प्रातिनिधीक मत लष्करामधून व्यक्त करण्यात आले आहे. "सैनिक कल्याण निधीसाठी दिल्या जाणाऱ्या रकमेमागील भारतीय नागरिकांच्या भावनेबद्दल लष्कराच्या मनात जराही शंका नाही; मात्र ही रक्कम राज ठाकरेंच्या खंडणीचा भाग असू शकत नाही,‘ अशी तीव्र प्रतिक्रिया एअर व्हाईस मार्शल मनमोहन बहादूर (निवृत्त) यांनी व्यक्त केली आहे. 

राज ठाकरे यांच्या अटी 
ए दिल... चित्रपटाच्या सुरवातीला हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहणारा संदेश दाखवावा, भविष्यात पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यास बंदी घालावी, ज्या निर्मात्यांनी पाकिस्तानी कलाकारांना चित्रपटात अभिनयाची संधी दिली आहे, त्यांनी प्रायश्‍चित म्हणून पाच कोटी रुपये सैनिक कल्याण निधीत जमा करावेत, अशा अटी बैठकीत राज ठाकरे यांनी घातल्या.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें