मुंबई : तीन वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पडझड अलीकडेच झालेल्या महापालिका निवडणुकीतही कायम राहिल्याने पक्षाच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात येते.
2014 मध्ये झालेल्या लोकसभा आणि नंतरच्या विधानसभा निवडणुकीत मनसेची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. राज्यात अलीकडेच झालेल्या महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीतही मनसेची धुळदाण उडाली. या संदर्भात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'कृष्णकुंज' निवासस्थानी गुरुवारी (ता.20) झालेल्या बैठकीत राज यांच्याच कार्यद्धतीवर दुसऱ्या फळीतील नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे.
पक्ष संघटना वाढवण्यासाठी राज घरातून बाहेर पडत नाहीत. पदाधिकाऱ्यांना कोणताही कार्यक्रम दिला जात नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी सत्तेतील शिवसेनेने राज्य सरकारला घाम फोडला असताना मनसेची भूमिका स्पष्ट करण्यात नेतृत्वाला अपयश आले, असे आरोप या नेत्यांनी केल्याची चर्चा आहे.
या संदर्भात माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी आज ट्विट केले असून त्यांना पक्षातील अन्य नेते आणि पदाधिकाऱ्यांनी समर्थन दिल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. देशपांडे यांनी यापूर्वीही राज यांच्याकडे त्यांच्या कार्यपद्धीबाबत नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात येते.
मध्यंतरी शिवाजी पार्कवरील सेल्फी पॉईंटचा विषय गाजला होता. त्यामागे राज यांच्या वादग्रस्त कार्यपद्धतीची पार्श्वभूमी असल्याचे समजते. पक्षासाठी आपण काम करणार नसाल तर मीही करणार नाही, अशा शब्दांत नाराजी व्यक्त करून देशपांडे यांनी सेल्फी पॉईंट रद्द केला होता. त्यानंतर तो सुरू करण्यासाठी भाजपसह शिवसेनेतही चढाओढ सुरू होती.
मनसेने केलेली नाशिकमधील विकासकामे, तसेच अन्य ठिकाणच्या कामांना भेट देण्यासाठी राज ठाकरे मराठी फिल्म इंडस्ट्रीतील मान्यवरांना सोबत घेऊन फिरत असल्याची बाबही मनसे नेत्यांना खटकली असल्याची चर्चा दुसऱ्या फळीत सुरू असल्याचे सांगण्यात येते.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें