शनिवार, 23 सितंबर 2017

मोदींना खेचणाऱ्या दाऊदचं व्यंगचित्र; राज ठाकरेंच्या फटकाऱ्यांचा पहिला फटका


फेसबुक पेज लॉन्च करताना दाऊद आणि मोदी सरकार यांच्यात ‘सेटिंग’ असल्याची घणाघाती टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. आता याच विषयावर व्यंगचित्र काढत राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. या व्यंगचित्रात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम मोदींना भारतात फरफटत आणत असल्याचे दिसत आहे. मात्र मोदी दाऊदला मीच पाकिस्तानातून फरफटत आणल्याचे सगळ्यांना सांगत आहेत. शनिवारी रात्री राज ठाकरेंनी हे व्यंगचित्र फेसबुक पेजवर प्रसिद्ध करताच त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.
राज ठाकरेंनी व्यंगचित्रात भारत आणि पाकिस्तानची सीमारेषा दाखवत त्याठिकाणी २०१९ या वर्षाचा उल्लेख केला आहे. ‘२०१९ मधील लोकसभा निवडणुकीआधी दाऊदला भारतात आणून मोदींकडून त्याचे भांडवल केले जाईल,’ असा आरोप राज ठाकरेंनी मागील आठवड्यात फेसबुक पेज लॉन्च करताना केला होता. याच आधारावर दाऊद पाकिस्तानातून भारतात येत असल्याचे व्यंगचित्र राज ठाकरेंनी काढले आहे. या व्यंगचित्रात दाऊद मोदींना फरफटत आणत असल्याचे दिसत आहे. तर मीच दाऊदला भारतात फरफटत आणल्याचे मोदी इतरांना सांगत आहेत.
राज ठाकरेंनी शनिवारी रात्री त्यांच्या फेसबुक पेजवर दाऊद आणि मोदींचे व्यंगचित्र प्रसिद्ध केले. हे व्यंगचित्र आतापर्यंत ३३ हजार लोकांनी लाईक केले आहे. राज ठाकरेंनी या व्यंगचित्राला ‘तर्कचित्र’ असे नाव दिले आहे. या व्यंगचित्रावर आतापर्यंत एक हजाराहून अधिक प्रतिक्रिया आल्या असून राज ठाकरेंच्या या फटकाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरेंची आठवण करुन दिली, अशा प्रतिक्रिया अनेकांनी हे व्यंगचित्र पाहून दिल्या आहेत. राज ठाकरेंचे हे व्यंगचित्र २ हजाराहून अधिक लोकांनी शेअर केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें