शनिवार, 14 अक्टूबर 2017

रस्त्यावर फिरू देऊ नकाः राज ठाकरे

मुंबई: शिवसेना-मनसे मध्ये पुन्हा रस्त्यावरचा संघर्ष सुरु होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यांना रस्त्यावर सहज फिरुन देऊ नका, असे आदेशच आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले असल्याचे समजते. या कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजीही केली.
मनसेच्या फुटलेल्या सहा नगरसेकांच्या प्रभागातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आज सकाळीच राज ठाकरे यांच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर धाव घेतली. राज ठाकरे यांनी स्वत: या कार्यकर्त्यांशी चर्चा करुन या फुटीबाबत तिव्र नाराजी व्यक्त केली असल्याचे समजते. त्यांनी जे केलं ते योग्य नाही. पण, त्यांची अवस्था शिवसेनेत वाईट होणार. घर का ना घाट का अशी अवस्था होईल. तुम्ही कामाला लागा, असे सांगत त्या पैकी एकालाही रस्त्यावर सहज फिरु देऊ नका, असे आदेशच राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले असल्याचे समजते.
मनसे स्थापन झाल्यावर दादर मध्येच शिवसेना आणि मनसे मध्ये पहिली दंगल झाली होती. त्यात अनेक जण जखमीही झाले होते. त्यानंतर लहान मोठे वाद होत होते. मात्र, या नगरसेवक फुटीनंतर हा संघर्ष रस्त्यावर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
नगरसेवकांना पोलिस संरक्षण
या फाटाफुटीमुळे होणाऱ्या संघर्षाचा धोका ओळखून सहाही नगरसेवकांना आणि त्यांच्या कुटूबियांना पोलिस संरक्षण देण्यात आल्याचे समजते. तर, दुसरीकडे मनसेच्या कार्यकर्त्यांनी सोशल मिडीयावरुन जोरदार हल्ला चढवण्यास सुरवात केली आहे. मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी सहाही नगरसेवकांना फेसबुक मधून अनफ्रेंड केले आहे.
शिवसेनेच्या आमदार नगरसेवकांनाही नव्हती माहिती
नगरसेवक शिवसेनेत येणार असल्याची माहिती शिवसेनेच्या अनेक जेष्ट नगरसेवकांसह आमदारांनाही नव्हती.शुक्रवारी दुपारी फुटीची चर्चा सुरु झाल्यावर शिवसेनेचे नगरसेवक आमदार मनसेच्या नेत्यांकडूनच माहिती कन्फर्म करत होते.
दुपार पर्यंत संपर्कात
वरळी येथील बंडखोर नगरसेवक दत्ताराम नरवणकर यांनी सकाळी 11 वाजल्याच्या सुमारास त्यांच्या शाखाअध्यक्षाला शिवसेनेत येण्याची ऑफर दिली. त्यानंतर हा प्रकार उघड झाला, ही माहिती काही मिनीटात कृष्णकुंजवर पोहचली. राज ठाकरे स्वत: बंडखोर दिलीप लांडे यांच्या संपर्कात होते. तसेच इतर नगरसेवकांनाही संपर्क साधला जात होता. डॉ.अर्चना भालेराव यांच्या पतीशी संपर्क साधला असता त्यांनी शिडीला जात असल्याचे सांगितले. परमेश्‍वर कदम यांनी बारामतीला असल्याचे सांगीतले. राज ठाकरे स्वत: लांडे यांच्याशी बोलत होते.10 मिनीटात पोहचतो. ट्राफिक मध्ये अडकलोय असा बहाना लांडे करत होते. अखेरीस त्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी नरवणकर यांच्यासह वरळी येथे एका जुन्या गाडीतून जाताना पाहिले. त्यानंतर सर्वांचाच संपर्क तुटला.

Youtube channel ला subscribe करा https://www.youtube.com/channel/UC9ZbmEr8JZWsUDMczLNTzGg

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें