बुधवार, 20 दिसंबर 2017

'यशराज'ची मुजोरी चालणार नाही; मराठी चित्रपटांना थिएटर द्याच! : मनसे



मुंबई : 'देवा' या मराठी चित्रपटाचे प्रदर्शन 22 डिसेंबर रोजी होणार आहे. मात्र, या चित्रपटाला थिएटर स्क्रीन मिळत नसल्याने मनसेने यामध्ये उडी घेतली आहे. ''मराठी चित्रपटाला अन्याय झाला तर चित्रपट सेना गप्प राहणार नाही. 22 तारखेला देवा चित्रपट प्रदर्शित झाला नाही तर मनसे आंदोलन करणार आहे. मात्र, 22 डिसेंबरला देवा प्रदर्शित होणारच असे महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सांगितले. तसेच मराठी सिनेमांसाठी भीक मागावी लागते हे दुर्दैव असल्याचेही ते म्हणाले.
'देवा' चित्रपटाची टीम आणि खोपकर यांची संयुक्त पत्रकार परिषद मुंबईत झाली. यावेळी खोपकर बोलत होते. खोपकर म्हणाले, देवा चित्रपटाला स्क्रीन न देणाऱ्या चित्रपटगृहांचे परवाने रद्द करावे. तसेच त्यांनी यशराज फिल्मस् ला इशारा दिला. ते म्हणाले, यशराज फिल्मस् चे सध्या 'मी जे सांगेल ते' असे झाले आहे, मात्र, आम्ही त्यांचा मुजोरीपणा खपवून घेणार नाही. मराठी चित्रपटाला अन्याय झाला तर चित्रपट सेना गप्प राहणार नाही.
महाराष्ट्रात मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाला प्राधान्य द्यावे, अशी तरतूद आहे. मात्र, अनेक चित्रपटगृह याचे पालन करत नाही. अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चित्रपटगृहावर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, मनसेच्या या इशाऱ्यामुळे देवा 22 तारखेला प्रदर्शित होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें