मंगलवार, 1 अप्रैल 2014

मनसे खेळतेय 'डेंजर झोन'मध्ये!

पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा; मात्र भाजपविरोधात मनसेचा उमेदवार ही राज ठाकरे यांची खेळी मतदारांच्या आकलनाच्या पलीकडची आहे. राज यांच्यापुढेही हा गोंधळ असावा. तार्किकदृष्ट्या योग्य न वाटणारे निर्णय जनतेच्या मनात उतरविण्यात राज यशस्वी होतील का? त्यांचे म्हणणे वरकरणी तर्कदृष्ट्या योग्य वाटत नसल्याने ते कोणाच्या तरी हातातील बाहुले झाल्याचे मतदारांचा समज झाल्यास त्याचा दोष मतदारांवर कसा टाकता येईल? राज यांच्या मनसुब्यांमुळे मनसे "डेंजर झोन'मध्ये आहे.

एक कार दिल्लीला चालली आहे. या कारमध्ये पाच मंडळी बसलेली आहेत. सहाव्या भिडूला गाडीत यायचे आहे. पण, कारमध्ये जागाच नसल्याचे सांगून कारमधील एक जण या भिडूला आतमध्ये येऊ देत नाही. त्याला धडा शिकवायचा विचार भिडूने केला आहे. पण, कार तर दिल्लीला पोचली पाहिजे, असेही त्याला वाटते आहे. या भिडूला आतमध्ये न घेणाऱ्याला बाहेर ढकलता येणे शक्‍य नसल्याने त्याने गाडीच पंक्‍चर करायची ठरवली आहे. पंक्‍चर केलेली गाडी हलत नाही. पण, ती दिल्लीला पोचण्यासाठी हा भिडू पाठीमागून गाडीला धक्का मारत आहे. कशी आहे सिच्युएशन? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा नरेंद्र मोदी यांना पाठिंबा आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धडा शिकविण्यासाठी शिवसेनेच्या विरोधात उभे केलेले उमेदवार पाहिल्यावर या कारचे चित्र समोर उभे राहते. राज यांना महायुतीत येण्यास उद्धव यांनी विरोध केला, असे त्यांनी पुण्यातील सभेत सांगितले. याचाच दुसरा अर्थ असा, की मी युती करायला तयार होतो, असे त्यांना सांगायचे असावे. ""उद्धव यांनी त्यास विरोध केल्याने आता माझी औकात दाखवितो,'' असे आव्हान राज यांनी दिले आहे. हे "औकात' दाखविणे म्हणजे काय? तर सारी ताकद पणाला लावून शिवसेनेचे उमेदवार पाडतो, असेच राज यांना सांगायचे आहे. शिवसेनेची ताकद घटली, तर भाजपला मनसेशिवाय पर्याय नाही. त्यामुळे मोदी यांना पाठिंबा देऊन राज एक पाऊल पुढे आले आहेत. शिवसेनेच्या विरोधात उमेदवार उभे करण्यासाठी उद्धव यांनी मला भाग पाडले आहे, असे ते सांगत आहेत. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार पडले, तर त्याला मी जबाबदारी नाही, उद्धव यांचा कोतेपणा त्यास जबाबदार असल्याचे त्यांचे सांगणे आहे.

हे सारे मतदारांना समजावून सांगणे अवघड आहे. त्यांची अडचण ही पुण्यातील सभेत लक्षात आली. पुण्यात भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभा आहे. त्याविरोधात मनसेने उमेदवार दिला आहे. आता थेट मोदींच्या पक्षाचा उमेदवार असताना परत मोदींना पाठिंबा द्यायचा म्हणून मनसेच्या उमेदवाराला मतदान कशाच्या आधारावर करायचे, हा गोंधळ मतदारांपुढे आहे. राज यांच्यापुढेही हा गोंधळ असावा. त्यामुळे त्यांनी पुण्यातील पहिल्या सभेत भाजपवर आणि भाजपच्या उमेदवारावर टीका करायचे टाळले. कदाचित, यानंतर होणाऱ्या पुण्यातील दोन सभांत ते भाजपला लक्ष्य करतीलही. भाजपचा उमेदवार पाडा आणि मोदींना पाठिंब्यासाठी मनसेच्या उमेदवाराला मत द्या, असे विसंगत वाटणारे आवाहन मतदारांच्या पचनी पडेल?

लोकसभेच्या 2009च्या निवडणुकीत मनसेची पाटी कोरी होती. मात्र, या निवडणुकीत मुंबईतील शिवसेना-भाजपचे सर्व उमेदवार पाडल्यानंतर मनसेची पाटी कोरी राहिली नाही. "मी कोणाला पाडण्यासाठी किंवा निवडून आणण्यासाठी उमेदवार उभे केलेले नाहीत,' असे राज ठाकरे सांगत असले, तरी त्यांच्या उमेदवारीचा फटका हा अंतिमतः शिवसेनेलाच बसणार आहे. शिवसेनेचे काही उमेदवार पराभवाच्या छायेत उभे करण्याचे काम मनसेने चोखपणे बजावले आहे. या साऱ्या बाबींचा फायदा अंतिमतः कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी ज्या जागा धोक्‍याच्या वाटत होत्या, त्या जागांवर मनसेने उमेदवार उभे केल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी सुस्कारा टाकला आहे. "लोकसभा निवडणूक लढविणे, हे राज ठाकरे यांच्यासाठी अपरिहार्य होते,' हे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे विधानही बरेच काही सांगून जाते. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने या दोन्ही सेनांना योग्य वेळी छानपैकी सांभाळले आहे. त्यांना सांभाळल्यामुळे कॉंग्रेसला थेट असा विरोधक तयार झाला नाही. (झालाच तर, कॉंग्रेसमधीलच मंडळी एकमेकांचे विरोधक म्हणून काम करतात.)

तार्किकदृष्ट्या योग्य न वाटणारे निर्णय जनतेच्या मनात उतरविण्यात राज यशस्वी होतील का? त्यांचे म्हणणे वरकरणी तर्कदृष्ट्या योग्य वाटत नसल्याने ते कोणाच्या तरी हातातील बाहुले झाल्याचे मतदारांचा समज झाल्यास त्याचा दोष मतदारांवर कसा टाकता येईल? कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला राज यांचा मनापासून विरोध आहे, असे मानले तरी त्यांची कृती प्रत्यक्षात उलटाच परिणाम घडवून आणणारी आहे. मराठी पाट्यांचे आंदोलन असो की टोलचा विषय असो, हे विषय असेच मध्येच मनसेकडून सुटल्यासारखे दिसतात. त्याचा "लॉजिकल एंड' नजरेस येत नाही. त्यांच्या भाषणासारखाच. त्यांच्या भाषणातही असेच मुद्दे एकावर एक आदळत असतात. विशिष्ट मुद्द्यावर ते आणखी काही बोलतील, असे वाटत असतानाच दुसराच मुद्दा ते भाषणात सुरू करतात.

मोदींना सहकार्याचा हात आणि दुसरीकडे त्याविरोधात उलटा परिणाम घडवून आणणारी कृती मतदारांच्या लक्षात येते. असे किती वेळा होणार? राज यांच्या मनसुब्यांमुळेच मनसे "डेंजर झोन'मध्ये आहे. दिल्लीत सत्तास्थापनेसाठी कॉंग्रेसशी हात जवळ केलेले अरविंद केजरीवालही सध्या "डेंजर झोन'मध्ये आहेत. त्यांचेही वागणे तर्कदृष्ट्या जनतेला पटले नाही. कॉंग्रेसला विरोध करायचा आणि त्यांच्याच सहकार्याने सरकार स्थापन करायचे आणि त्यांनाच शिव्या देत सरकारमधून बाहेर पडायचे. हा "शो' म्हणून ठीक आहे. राजकारण म्हणून या "शो'चे प्रयोग सतत होऊ शकत नाहीत. या "शो'मुळे विश्‍वासार्हतेला धक्का बसतो. मनसेसाठीचा "डेंजर झोन' म्हणजे एकदम एक्‍झिट नव्हे; पण एक्‍झिटकडे जाणारा दरवाजा आहे. येथून "लाइफलाइन' मिळाली तर पुढे टिकता येते. लोकसभेची ही निवडणूक मनसेला लाइफलाइन देणारी ठरेल का? काही जागांवर यश मिळाले, तर मनसेला लाइफलाइन मिळेल. गेल्या वेळेप्रमाणे अनेक मतदारसंघांत तिसऱ्या क्रमांकावरच मनसेला मतदारांनी रोखले, तर हा "डेंजर झोन' अधिक गडद होईल.

राज यांचा 'संकल्प'

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आपणच वारस आहोत, असा दावा करणारे ठाकरे बंधू कधी तरी एकत्र येतील आणि राज्यावर पुन्हा एकदा "शिवशाही'ची गुढी उभारतील, अशी स्वप्ने पाहणाऱ्यांची झोप कायमची उडवण्याचे काम राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याचाच मुहूर्त साधून केले आहे. पुण्यातील जाहीर सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रचाराचा प्रारंभ करताना, त्यांनी आपल्या स्वभावधर्मानुसार नेहमीप्रमाणे एका दगडात अनेक पक्षी तर मारलेच; पण त्याच वेळी महायुतीतील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या प्रमुख घटकांमधील परस्परसंबंधांबाबत मतदारांमध्ये अधिकाधिक दुराव्याचे, तसेच अविश्‍वासाचे वातावरण निर्माण करण्याचे कामही केले. त्यानंतर लगोलग शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेबरोबर समझोता अशक्‍य असल्याचे स्पष्ट केल्याने आता ही भाऊबंदकी अशीच पुढे चालत राहणार, यावर शिक्‍कामोर्तबही होऊन गेले.

खरे तर या निवडणुकीत मनसेने भाजपला बहुतांशी सूट देऊन केवळ शिवसेनेविरोधातच उमेदवार उभे करण्याचा निर्णय जाहीर केला, तेव्हाच राज यांचे डावपेच स्पष्ट झाले होते. शिवाय, त्याच वेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा जाहीर करत, आपण भाजपबरोबर जाऊ इच्छितो हेही सूचित केले होते; पण या "गुगली'नंतरही पुण्यातील सभेत मात्र त्यांचा बहुतांश वेळ आपण हे का केले, याबाबतचा खुलासा करण्यातच गेला. राज यांना महायुतीत सामील होण्याची मनापासून इच्छा होती, हे त्यांच्या शब्दाशब्दांतून आणि देहबोलीतूनही स्पष्ट होत होते. "मला खरोखरच बरोबर घ्यायचे होते, तर ती चर्चा मीडियातून कशी होऊ शकते, त्यासाठी एक फोन करावयाचा होता. मी विचार केला असता...' या विधानातूनच त्यांची अंतरीची इच्छा जाहीर झाली, शिवाय त्याचवेळी मतदारांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण करण्याचा त्यांचा उद्देशही स्पष्ट झाला.

पण या सभेतील राज यांचा "दुसरा' हा अधिक रोखठोक होता. "मनसे' महायुतीत येऊ नये, ही उद्धव यांचीच इच्छा असल्याचे भाजप नेत्यांनीच आपल्याला सांगितल्याचे त्यांनी एकवीरादेवीची शपथ घेऊन जाहीर केले! त्यामुळे भाजप नेते तर अडचणीत सापडलेच; शिवाय आपण भाजपबरोबर जाऊ इच्छितो, हेही जाहीर करून ते मोकळे झाले. शिवाय, आपली "औकात' नेमकी काय आहे, ते या निवडणुकीत दाखवून देण्याचा विडाही त्यांनी मुळा-मुठेच्या साक्षीने उचलला आहे. त्यामुळे एकदा का लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा बोजवारा उडाला, की मोदी-गडकरी आदी कंपनी विधानसभेच्या वेळी शिवसेनेशी काडीमोड घेऊन मनसेबरोबर जाण्याचा आग्रह धरणार, हेही उघड आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर होणाऱ्या पहिल्या-वहिल्या निवडणुकीतच शिवसेनेला नामोहरम करण्याचा राज यांचा इरादाही उघड झाला आहे. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीत देशापुढील अजेंडा काहीही असला तरी, या दोन भावांची लढाई मात्र एकमेकांशीच राहणार आहे. एका अर्थाने ही निवडणूक या दोन्ही पक्षांसाठी अस्तित्वाचीच लढाई आहे, हेच खरे!

सोमवार, 31 मार्च 2014

शिवसेनेला औकात दाखवतोच - राज ठाकरे

पुणे - 'लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष-शिवसेना यांच्या महायुतीमध्ये घ्यायचे होते, तर चर्चा पसरविण्यापेक्षा मला थेट फोन करायचा होता. पण, शिवसेनेला मला युतीमध्ये घ्यायचेच नव्हते. माझी औकात काय, असे विचारणाऱ्या शिवसेनेला या निवडणुकीत माझी औकात दाखवूनच देतो,'' असे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभेत शिवसेनेला सोमवारी थेट आव्हान दिले. पंतप्रधानपदासाठी भाजपचे नरेंद्र मोदी यांनाच "मनसे' पाठिंबा देणार असल्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

लोकसभा निवडणुकीतील "मनसे'च्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ राज ठाकरे यांनी फोडला. येथील नदीपात्रात सायंकाळी झालेल्या सभेत ठाकरे बोलत होते. या प्रसंगी "मनसे'चे सर्व उमेदवार, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. राज-गडकरी भेट, तर शिवसेना आणि दै."सामना'तून त्यावर झालेली टीका, यावर राज ठाकरे यांनी भर देतानाच उद्धव ठाकरे यांचे नाव घेऊन त्यांच्यावर प्रखर टीका केली. एकीकडे मुंडे आणि उद्धव ठाकरे यांना लक्ष करतानाच दुसरीकडे मात्र नितीन गडकरी यांची पाठराखण केली. "त्यांच्या पोटात एक आणि ओठात असा हा माणूस नाही. तो एक चांगला माणूस आहे, आजही माझे त्यांच्याबद्दल हेच मत आहे,' असे स्पष्ट करून ठाकरे यांनी गडकरींशी मैत्री असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले. शिवसेनेने कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसविरुद्ध लढण्याऐवजी "मनसे'च्या अंगावर येण्याचे कारण काय, असा प्रश्‍नही ठाकरे यांनी उपस्थित केला. कोणाला मदत व्हावी म्हणून नाही, तर विजयी होण्यासाठी, दिल्लीत मराठी माणसाचा आवाज काढणारे कोणीतरी असावे, यासाठीही उमेदवार उभे केले आहेत, असा दावाही राज यांनी केला.

ठाकरे म्हणाले, 'लोकसभा निवडणुका एकत्रित लढण्याचा प्रस्ताव गडकरी आणि गोपीनाथ मुंडे यांनी दिला होता. त्यानंतर शिवसेनेच्या "सामना'तूनही त्याबाबत भाष्य प्रसिद्ध झाले होते. शिवसेनेने हात पुढे केला असून, "मनसे'ने टाळी द्यायला हवी, असे त्यात म्हटले होते. पण खरोखरच मनसेला बरोबर घ्यायचे होते, तर एक फोन तरी करायचा होता. सगळी चर्चा वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांमधूनच. महायुतीमध्ये मनसेला घेण्यास शिवसेनेचा नकार होता. शिवसेनेला फक्त आम्ही किती उदार आहोत, हेच दाखवायचे होते. शिवसेनेचा विरोध होता, असे भाजपचे नेते सांगत होते. याबाबत खरे-खोटे करायचे असेल, तर केव्हाही समोर येण्यास मी तयार आहे.''

मुंबई महापालिका ताब्यात असूनही शिवसेनेला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारता येत नाही. त्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याकडे शिवसेनेचे शिष्टमंडळ जाते, ही शिवसैनिकांशी प्रतारणा नाही का, असा प्रश्‍न उपस्थित करून राज ठाकरे म्हणाले, ""पाहिजे तेव्हा वापरायचे, पाहिजे तेव्हा भेटायचे असे उद्योग यांचे.''

भारती विद्यापीठाकडून डोनेशन परत घ्या कॉंग्रेसचे युवा नेते राहुल गांधी आणि पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. विश्‍वजित कदम यांच्यावरही राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली. या देशाला कॉंग्रेसने आजपर्यंत लुटले. त्यामुळे निवडणुका हाच त्यांना लुटण्याचा एक मार्ग आहे, असे सांगून ठाकरे म्हणाले, ""भारती विद्यापीठात प्रत्येक प्रवेशासाठी डोनेशन घेतले जाते. ज्यांनी ज्यांनी डोनेशन दिले त्यांनी आता भारती विद्यापीठात जाऊन डोनेशन परत मागावे. त्यांना ते लगेचच मिळेल. प्रवेशापोटी कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या भारती विद्यापीठाकडून आता निवडणुकीत मतदारांना पैसे मिळणार आहेत. ते जरूर घ्या, पण "मनसे'लाच मत द्या,''

पंतप्रधानपदासाठी मोदींना पाठिंबा पक्षाचे उमेदवार निवडून आल्यानंतर पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोंदी यांनाच पाठिंबा देतील, असे राज ठाकरे यांनी यापूर्वी जाहीर केले होते. त्यामुळे शिवसेनेसह भाजपमध्येही खळबळ उडाली होती. या प्रकरणी भाजपने आयोगाकडेही तक्रार केली. त्यावर राज यांनी या पुढेही "मोदी अजेंडा' राहणार असल्याचे सूचित केले. ठाकरे म्हणाले, ""या देशाला सक्षम आणि खंबीर नेतृत्वाची गरज आहे. असे नेतृत्व मोदी देऊ शकतात. म्हणूनच त्यांना पाठिंबा देऊ केला आहे.'' काही गोष्टी त्यांच्या मला पटल्या नाहीत. त्यामुळे मध्यंतरी मी त्यांच्यावर बोललो. परंतु ती टीका नव्हती. तर तो मैत्रीचा सल्ला होता, असेही खुलासा ठाकरे यांनी केला.

'बाळासाहेबांना आणि शिवसेनेला सोडून का गेला म्हणून मला विचारता. परंतु मला पक्ष सोडण्याची वेळ या नालायकांच्या गोतवळ्यामुळेच आली. बरे झाले शिवसेना सोडली, आता असे वाटते.''
- राज ठाकरे

रविवार, 9 मार्च 2014

नवनिर्मित गणित! (अग्रलेख)

गेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या अर्ध्या डझनाहून अधिक उमेदवारांच्या विजयात ज्यांनी हातभार लावला ती "महाराष्ट्र नवनिर्माण सेना' यंदा लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार की नाही, याबाबत गेले काही दिवस सातत्याने उठणाऱ्या वावड्यांवर अखेर पडदा पडला आहे. मनसेच्या वर्धापन दिन सोहळ्यात सात उमेदवारांची घोषणा करून, राज ठाकरे यांनी हा पडदा टाकला असला, तरी त्याच वेळी आपली आगामी खेळी नेमकी काय असेल, याबाबतची जनतेच्या मनातील उत्सुकता कायम राहावी, याचीही दक्षता घेण्यात ते यशस्वी झाले आहेत! त्याचे प्रमुख कारण म्हणजे आपल्या उमेदवारांची घोषणा करतानाच, आपले खासदार हे पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांनाच पाठिंबा देतील, असेही जाहीर करून ते मोकळे झाले आहेत. केंद्रात भाजपला मदत, राज्यात युतीला विरोध, असे अजब समीकरण मांडून ज्याला त्याला हवा तो अर्थ काढण्याची सोय मनसेच्या घोषणेने करून ठेवली आहे. मनसेचे किती खासदार विजयी होतील, हा प्रश्‍नच असला, तरीही यात एक गोम आहेच. मुंबई या आपल्या बालेकिल्ल्यात भाजप उमेदवारांच्या विरोधात राज यांनी एकही नाव जाहीर केलेले नाही.

त्यांच्या सात उमेदवारांपैकी फक्‍त एकच उमेदवार पुण्यात भाजपविरोधात लढणार आहे! शिवाय, मोदी हेच देशाचे पंतप्रधान व्हावेत, अशी आपली इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले. अर्थात आपले आणखी काही उमेदवार आपण येत्या दोन-चार दिवसांत जाहीर करू, असे त्यांनी सांगितल्यामुळे याबाबतची त्यांची खेळी त्यानंतरच स्पष्ट होऊ शकते. राज यांच्या या भूमिकेमुळे अनेक प्रश्‍न तर निर्माण झाले आहेतच; पण त्यामुळेच त्यांच्या मनात नेमके काय आहे, याबाबतही लोकांच्या मनात साशंकता निर्माण होऊ शकते. मनसेचे खासदार मोदी यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देणार असतील, तर मग त्यांनी शिवसेना-तसेच भाजप यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचे कारणच काय? मोदी पंतप्रधान व्हावेत, असा विचार राज यांनी आजच केलेला असणे शक्‍य नाही. मोदी आणि राज यांचा दोस्ताना जुना आहे. 2007 मध्ये गुजरातेत झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी नरेंद्रभाईंना शुभेच्छा पोचवण्यासाठी राज यांनी शिशिर शिंदे यांना धाडले होते. शिवाय, गुजरातमधील विकासकामांची पाहणी करण्यासाठी आपल्या "थिंक टॅंक'ला घेऊन मध्यंतरी राज जातीने गुजरातेत गेले होते आणि तेथे त्यांचे लाल गालिचा घालून स्वागतही झाले होते. तरीही दोन महिन्यांपूर्वी त्यांनी मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. त्यांनंतर भाजपच्या नेत्यांनी त्या टीकेचा खरपूस समाचार घेतल्यामुळे आधी भाजप आणि राज यांच्यात असलेल्या कमालीच्या "सौहार्द'पूर्ण संबंधांमध्ये बराच तणावही निर्माण झाला होता. मग आता नेमके असे काय घडले, की मोदी हेच पंतप्रधान व्हावेत, असे राज यांना अचानक वाटू लागले, या प्रश्‍नाचे उत्तर गेल्या पंधरवड्यात नितीन गडकरी यांनी मनसेने निवडणूक लढवू नये, यासाठी घेतलेल्या राज यांच्या भेटीत आहे काय? की ही विधानसभा निवडणुकीसाठी वेगळ्या समीकरणांची जुळवाजुळव आहे? या आणि अशाच अनेक प्रश्‍नांचा भूलभुलैया राज यांच्या निर्णयामुळे निर्माण झाला आहे. मुळात, उद्धव आणि राज या दोघांच्या कट्टर शत्रुत्वामुळेच त्या दोघांबरोबरच भाजपचेही राजकारण पेंड खात आहे, ही बाब आता लपून राहिलेली नाही. महायुतीत राज यांना सामावून घेण्यास भाजपमधील कोणाचाच विरोध नव्हता आणि केवळ उद्धव यांच्यामुळेच ते शक्‍य झालेले नाही, हेही आता गुपित राहिलेले नाही. खरे तर राज यांची गेल्या काही दिवसांत भलतीच कोंडी झालेली होती. एकीकडे उद्धव यांच्याशी असलेले हाडवैर आणि दुसरीकडे भाजपशी असलेली मैत्री, अशा पेचात ते सापडले होते. त्या वेळी शेकापचे जयंत पाटील आणि जनसुराज्य पार्टीचे विनय कोरे यांनी त्यांची भेट घेतली आणि तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू करून दिली. त्यामुळे देशात गेले चार महिने लोकसभा निवडणुकांचे नगारे वाजू लागले असताना, स्वस्थचित्त राहिलेल्या राज यांच्या ताकदीचे महत्त्व अधोरेखित झाले. पण तिसऱ्या आघाडीच्या या चर्चेवर पुन्हा भाजप नेत्यांनी विधान परिषद निवडणुकांसाठी मतांची बेगमी करण्यासाठी राज यांची भेट घेऊन पाणी फिरवले, पण त्यामुळेच राज ठाकरे जोरात आले, ही बाबही नाकारण्याजोगी नाही. या पार्श्‍वभूमीवर अखेर राज मैदानात उतरले आहेत. त्यामुळे शिवसेना उमेदवारांचे धाबे काही प्रमाणात दणाणून गेले असणार, हे उघड आहे. पण आता मनसेचे बळ पाच वर्षांपूर्वीइतके राहिले आहे काय, याचा विचार साऱ्यांनीच करायला हवा. शिवाय, या वेळी जनतेपुढे आम आदमी पक्षाचाही पर्याय खुला आहेच. पण एक मात्र नक्‍की! राज मैदानात उतरल्यामुळे प्रचारात रंगत येणार आणि टीव्ही चॅनेलांचाही टीआरपी वाढणार, हेही नसे थोडके!

शनिवार, 8 मार्च 2014

राज ठाकरेंनी जाहीर केले लोकसभेचे उमेदवार ,नरेंद्र मोदी यांना पाठिंबा.

ठाणे - आगामी लोकसभा निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) लढविणार असून, निवडून आलेले खासदार भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतील, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (रविवार) स्पष्ट केले.

मनसेच्या आठव्या वर्धापनदिनानिमित्त ठाण्यातील षण्मुखानंद सभागृहात कार्यक्रम पार पडला. यावेळी मनसेचे सर्व आमदार व राज्यभरातून कार्यकर्ते याठिकाणी जमले होते. 'एम एन एस अधिकृत' या नावाने मनसेच्या अधिकृत ऍपचे उदघाटन राज यांच्या मातोश्रींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या भारतीय विद्यार्थी सेनेचे माजी अध्यक्ष अभिजीत पानसे यांनी मनसेत प्रवेश केला. 

राज ठाकरे म्हणाले, ''लोकसभा निवडणूक लढविणार न लढविणार अशी आतापर्यंत अनेकांची चर्चा सुरू होती. पण, सर्वांना बोलून दिल्यानंतर योग्यवेळी मुसंडी मारायची असते. आज मी मनसे निवडणूक लढविणार हे स्पष्ट करतो. या निवडणुकीत माझी काय ताकद आहे, ती सर्वांना दाखवून देणार आहे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी मनसेच्या सात उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत पुढील यादी जाहीर होईल. लवकरच पहिल्या सभेची तारिख जाहीर करणार आहे. यावेळी मी सर्वकाही स्पष्ट करणार आहे. आपण सर्वांनी निवडणुकीच्या तयारीला लागा. मला खात्री आहे, की आपले खासदार निवडून येतील. निवडून आलेले खासदार भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देतील. देशाच्या भविष्यासाठी त्यांना पाठिंबा देणे गरजेचे असल्याचे, मला वाटते.'' 

सर्वांच्या सहकार्यामुळे मी पक्ष यापुढेही नेत राहिन. गारपीटीमुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारने त्वरित सर्व पाहणी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी. येत्या काही दिवसांत मी गारपीटग्रस्त भागाचा दौरा करणार आहे. आचारसंहितेचा विषय मधे न घेता सरकारने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

राज ठाकरेंनी जाहीर केले लोकसभेचे उमेदवार
दक्षिण मुंबई - बाळा नांदगावकर,
दक्षिण मध्य मुंबई - आदित्य शिरोडकर,
 उत्तर पश्चिम मुंबई - महेश मांजरेकर,
 कल्याण - राजीव पाटील,
शिरूर - अशोक खांडेभराड,
 नाशिक - डॉ. प्रदीप पवार,
 पुणे - दिपक पायगुडे

मंगलवार, 4 मार्च 2014

लोकसभा निवडणूक नऊ टप्प्यांत;16 मेला निकाल

नवी दिल्ली - बहुप्रतिक्षित लोकसभा निवडणुकीच्या तारखांची आज (बुधवार) मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी केली. देशभरात नऊ टप्प्यांत मतदान होणार असून, 16 मे रोजी मतमोजणी होणार आहे. या घोषणेबरोबरच सरकार आणि राजकीय पक्षांसाठी निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

व्ही. एस. संपत पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करताना म्हणाले, की लोकसभा निवडणुकांबरोबरच विभाजन झालेल्या तेलंगण व सीमांध्र, ओडिशा आणि सिक्कीम या राज्यांत मतदान होणार आहे. या तिन्ही विधानसभांचे निकालही 16 मे रोजीच लागणार आहेत. देशभरात सात एप्रिल ते 12 मे दरम्यान मतदान होणार आहे.

या आधीची, म्हणजे 2009ची लोकसभा निवडणूक 16 एप्रिल-13 मे या काळात व पाच टप्प्यांत झाली होती. विद्यमान लोकसभेचा कालावधी एक जूनला संपत असल्यामुळे 31 मेपर्यंत नवे सभागृह अस्तित्वात येणार आहे.

निवडणुकांची वैशिष्ट्ये -
  • लोकसभा निवडणुका नऊ टप्प्यांत होणार
  • सात एप्रिल ते 12 मे दरम्यान देशभरात मतदान होणार
  • पहिला टप्पा 7 एप्रिल, दुसरा 9 एप्रिल, तिसरा 10 एप्रिल, चौथा 12 एप्रिल, पाचवा 17 एप्रिल, सहावा 24 एप्रिल, सातवा 30 एप्रिल, आठवा 7 मे आणि नववा 12 मे 
  • 16 मे रोजी मतमोजणी होणार
  • 10, 17, 24 एप्रिलला तीन टप्प्यांत महाराष्ट्रात मतदान होणार
  • आंध्र प्रदेश, सिक्कीम, ओरिसामध्ये विधानसभा निवडणुका होणार
  • निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी दिली माहिती
  • लोकसभा निवडणुकांच्या तारखा ठरविताना परीक्षा, हवामानाचा विचार
  • विभाजनानंतर आंध्र प्रदेशात प्रथमच निवडणुका होणार
  • यंदाच्या निवडणुकीत देशातील 81.4 कोटी मतदार मतदान करणार
  • 31 मे पूर्वी 16 वी लोकसभा स्थापन होणार
  • गेल्या निवडणुकीच्या तुलनेत 10 कोटी मतदार वाढले
  • मतदानासाठी 9 लाख मतदान केंद्रांची उभारणी
  • आजपासून आचारसंहिता लागू
  • गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदार केंद्रांची संख्या 12 टक्क्यांनी वाढली
  • लोकसभा निवडणुकीत नकारात्मक मतदानाचा वापर होणार
  • मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी 9 मार्चला राबविण्यात येणार विशेष मोहिम
  • उमेदवाराच्या निवडणूक खर्चावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार

सोमवार, 3 मार्च 2014

मनसेने लोकसभा लढवू नये;भाजपचा प्रस्ताव

गडकरी-राज ठाकरे यांच्या भेटीची चर्चा
मुंबई - नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरू नये, हा प्रस्ताव घेऊन आज भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी वरळी येथील फोर सीझन हॉटेलमध्ये आज दुपारी सुमारे दीड तास चर्चा केली. ही भेट गुप्त ठेवण्याची खबरदारी घेण्याचा दोन्ही नेत्यांचा प्रयत्न होता; पण बातमी फुटल्याने, हिंदुत्ववादी शक्‍तींना बळकट करण्यासाठी मनसेने मदत करावी, अशी विनंती करण्यासाठी ही भेट झाल्याचे सायंकाळी गडकरी यांनी सांगितले.

राज ठाकरे यांनी मात्र या भेटीबाबत मौन बाळगले असून येत्या एक-दोन दिवसांत ते या संदर्भात बोलतील अशी चर्चा आहे. मनसेने अद्याप उमेदवारांची नावे घोषित केली नसल्याने या निवडणुकीत ते केवळ काही जागा लढवणार की पूर्णत: विश्रांती घेणार, अशी विचारणा सुरू झाली आहे. केवळ काही महिन्यांच्या कालावधीने होणारी विधानसभा निवडणूक लक्षात घेता, मनसे लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेईलच कसा, असाही विषय मांडला जातो आहे.

गडकरी बऱ्याच दिवसांच्या मध्यांतरानंतर आज मुंबईत आले. निवडणुकीविषयी चर्चा करण्यासाठी आज भाजपचे राष्ट्रीय कोशाध्यक्ष पियूष गोयल आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांच्यासह गडकरी वरळी परिसरात गेले. काही वेळातच तेथे राज ठाकरे दाखल झाले. ही बातमी बाहेर फुटल्याने माध्यमांचे प्रतिनिधी तेथे हजर झाले. आशीष शेलार यांनी प्रारंभी अशी कोणतीही भेट झाली नसल्याचे ट्‌विट केले; पण त्यानंतर लगेचच भारत कॉंग्रेसमुक्‍त करण्यासाठी ही भेट झाल्याचे त्यांनीच माध्यमांना कळवले.

राज ठाकरे काय करणार? मोदी यांच्यासंदर्भात काही वर्षांपूर्वी घेतलेल्या कौतुकाच्या भूमिकेमुळे राज ठाकरे यांची लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात पंचाईत होणार असल्याची चर्चा आहे. त्यातच केवळ काही दिवसांनी विधानसभा निवडणूक होणार असल्याने मनसेचे आमदार लोकसभेच्या रिंगणात उतरण्यास तयार नाहीत. गेल्या निवडणुकीत झालेल्या मतविभाजनामुळे भाजपला फटका बसला. त्यामुळे आता काळजी घेत मनसेला समजावण्याचा हा प्रयत्न आहे काय, अशी चर्चा आहे. मात्र राज यांनी मोदींच्या विरोधात केलेल्या विधानांमुळे ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होणार नाहीत, असे मानले जाते. गडकरी यांच्याशी झालेल्या भेटीने हा मुद्दा चर्चेत आला आहे.

सेनेची संघटना कामाला
या गुप्त भेटीची माहिती फोर सीझन हॉटेलातील शिवसेनेच्या कामगार संघटनेने चोखपणे नेत्यांना कळवल्याची जोरदार शक्‍यता आज वर्तवण्यात येत होती. राज यांना भाजपने कोणत्याही प्रकारे मदत करू नये, अशी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. त्यामुळे या भेटीबाबत सेनेची प्रतिक्रिया फारशी अनुकूल नसेल, असे सांगण्यात येत आहे.

""होय, मी राज ठाकरे यांची भेट घेतली. हिंदुत्ववादी शक्‍तींचे हात बळकट करण्यासाठी मनसेनेही वेगळे धोरण स्वीकारावे, अशी विनंती मी त्यांना केली आहे.''
नितीन गडकरी, भाजप नेते

मनसे महायुतीत आल्यास फायदा : आठवले
गडकरी यांनी राज यांची भेट घेताच महायुतीत सहभागी झालेले नवे भिडू रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले, तसेच स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी यांनी बेरजेच्या राजकारणाचा फायदाच होईल, असे मत व्यक्‍त केले.