गुरुवार, 10 दिसंबर 2015

राज ठाकरेंची दुटप्पी भूमिका

नाशिक - "माझ्या हातात सत्ता द्या. अख्खा महाराष्ट्र सुतासारखा सरळ करतो...‘ अशी गर्जना करणाऱ्या राज ठाकरे यांना राज्यात सत्ता मिळाली नाही; पण ज्या नाशिकने विश्‍वासाने सत्ता दिली, तेथील कारभाराचे धिंडवडे मात्र निघाले आहेत. शहराच्या विकासाच्या आडून मते मिळवण्यासाठी कॉर्पोरेट जगताचा आधार घ्यावा लागला. त्याचवेळी स्मार्ट सिटीमधील "एसपीव्ही‘ला विरोध करत त्यांनी या जगताच्या मात्र विरोधात सूर आळवला आहे.

Slow Android Phone? Click Here
राज यांची ही दुटप्पी कार्यपद्धती राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे. राज यांच्यावर नाशिकच्या विकासासाठी बड्या उद्योग समूहांना निमंत्रित करण्याची वेळ आली. राज यांच्या स्वप्नातील गोदापार्क साकारण्यासाठी रिलायन्स जिओ फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. टाटा उद्योग समूहाच्या प्रयत्नातून बॉटनिकल गार्डनची निर्मिती केली जात आहे. चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांच्या स्मारकाला पुनर्जीवित करण्यासाठी एल. ऍण्ड टी. पासून रामोजी फिल्म सिटीपर्यंत अनेक कंपन्यांचे अधिकारी दर महिन्याला स्मारकाची वारी करताहेत. पाथर्डी फाटा ते आडगाव नाका दरम्यानच्या उड्डाण पुलाखालील जागेत झाडे लावण्यासाठी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीला निमंत्रण देण्यात आले आहे. सिडकोतील संभाजी स्टेडियम, तारांगण एवढेच काय उद्यानेदेखील खासगीकरणातून विकसित केली जात आहेत.
नाशिकच्या विकासासाठी भांडवलदारांच्या जिवावर उभारले जाणारे प्रकल्प राज यांना चालतात; मग "भांडवलदारांसाठी स्मार्ट सिटीचे प्रयोजन‘ हा आरोप कुठल्या आधारे ते करताहेत, असा थेट प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.

बुधवार, 9 दिसंबर 2015

केंद्र सरकार राजकीय खेळी करतेय- राज ठाकरे

मुंबई- स्मार्ट सिटी योजनेवरून केंद्र सरकार राजकीय खेळी करत आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषदेत केला.

ठाकरे म्हणाले, ‘प्रत्येकाला आपले शहर उत्तम झालेले आवडते. परंतु, स्मार्ट सिटी ही योजना पूर्णपणे फसवी आहे. या योजनेबाबत राज्यांनाच अनेक शंका आहेत. महानगरपालिकेत केंद्र सरकारची लुडबूड कशासाठी. शहरे स्मार्ट करणे हे केंद्र व राज्यांचे कर्तव्य आहे. स्मार्ट सिटी योजनेला अत्यल्प निधी देणार आणि महापालिकांकडून जी चांगली कामे होतील त्याचे श्रेय केंद्र सरकार घेणार स्मार्ट सिटी योजनेसाठी वेगळी कंपनी कशाला हवी. शहरात चांगल्या योजना राबवण्यासाठी केंद्र व राज्याने पुढाकार घ्यावा, त्याचे राजकारण करू नये.‘

‘नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्राला प्राप्तिकर देणार नसल्याचे सांगितले होते, मग आता राज्यांकडून मागणी का करत आहेत? निवडणुकीच्या तोंडावर कल्याण-डोंबिवलीसाठी पॅकेज जाहीर केले, पण शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. चांगल्या गोष्टींना माझा पाठिंबा असेल, मी विनाकारण राजकारण करणारा माणूस नाही,‘ असेही ठाकरे म्हणाले.

स्वतंत्र विदर्भाची मागणी चुकीची- ठाकरे
राज्याचे महाधिवक्ता ऍड. श्रीहरी अणे स्वंतत्र विदर्भाचा केलेली मागणी अत्यंत चुकीची आहे. त्यांचा बोलवता धनी कोण आहे, हे पाहिले पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्र राज्य एक राहिले पाहिजे.

रविवार, 8 नवंबर 2015

आता महाराष्ट्रात येणारे लोंढे थांबबावेत- राज

मुंबई - बिहार विधानसभा निवडणुकीत विजय मिळविल्याबद्दल मी नितीश कुमार व लालूप्रसाद यादव यांचे अभिनंदन करतो. आता त्यांनी महाराष्ट्रात येणारे बिहारी नागरिकांचे लोंढे थांबवावेत, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे म्हणाले, की प्रादेशिक अस्मिता, विकास आणि सामाजिक न्याय या त्रिसूत्रीवर आधारित राजकारणाचा हा विजय आहे. आता त्यांनी बिहारचा विकास इतक्या गतीने करावा, की महाराष्ट्रात येणारे लोंढे थांबवावेत. तसेच विकासाची दिशा अशी असावी की बिहारमधून बाहेर गेलेले बिहारीही परत बिहारकडे यावेत. विजयाबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन.
Slow Android Phone? Click Here

बिहार विधानसभा निवडणूकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी 150 पेक्षा अधिक धावांवर आघाडीवर आहे. तर, राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) 80 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर बिहारमधील जनतेने पुन्हा विश्वास ठेवला आहे आणि पुढील मुख्यमंत्री नितीश कुमारच असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. 

No Need to worry about Clearing Browser History  

सोमवार, 2 नवंबर 2015

कल्याणमध्ये फसला मनसेचा 'नाशिक पॅटर्न'

नाशिक : ‘गेल्या पावणे चार वर्षापासून सत्ता असलेल्या मनसेने नाशिकमध्ये काय केले,‘ याचे प्रेझेंटेशन सादर करीत राज ठाकरे यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेतील सत्ता देण्याचे आवाहन करीत जाहीर सभेतून टाळ्या मिळविल्या असल्या तरी त्या टाळ्यांचे रुपांतर मतांमध्ये करण्यात अपयश आल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. गेल्या निवडणुकीत अठ्ठावीस डब्यांचे इंजिन यंदाच्या निवडणुकीत सहा डब्यांवर आल्याने मनसेचा नाशिक पॅटर्न अयशस्वी झाला आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत विकासाचे ढोल वाजविताना राज यांना नवा पॅटर्न आणावा लागणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना व भाजप एकमेकांवर कुरघोडी करीत असताना मनसेने प्रचारात ‘विकास‘ हा मुद्दा लावून धरला होता. विकासाचे मुद्दे स्पष्ट करताना ‘नाशिकमध्ये काय केले,‘ याचे प्रेझेंटेशन राज ठाकरे यांनी केले होते. गोदापार्क, बोटोनिकल गार्डन, ट्रॅफीक सिग्नल पार्क या हक्काच्या मुद्यांबरोबरचं सिंहस्थाच्या निमित्ताने पायाभुत सुविधांचा झालेला विकास, महापालिकेने विकसित केलेले ऍम्प्लिफिकेशन, भव्य रस्त्यांच्या कामांचेही श्रेय घेत राज ठाकरे यांनी कल्याणमधील नागरिकांच्या टाळ्या मिळविल्या होत्या. ‘कल्याणमध्येही मला सत्ता द्या.. मग बघा कसा विकास करतो‘ असा शब्द त्यांनी दिला होता. परंतु, ठाकरे यांच्या ‘नाशिक पॅटर्न‘ला कल्याणकरांनी दाद दिली नाही. येथे मनसेचे अवघे सहा नगरसेवक निवडून आल्याने सत्ता तर दूरच, विरोधी पक्ष म्हणूनही फारसे स्थान मिळविता आलेले नाही. पुढील वर्षभरात मुंबई आणि नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीचे ढोल वाजण्यास सुरवात होणार आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये पक्षाला मिळालेल्या अल्प प्रतिसादातून नाशिकमध्ये काय होईल, या विचाराने पक्षाच्या नेत्यांना आताच धडकी भरली आहे.

थापा मारून एकवेळ सत्ता आणता येते; पण हा प्रयोग वारंवार यशस्वी होत नाही, हे कल्याण-डोंबिवलीच्या निवडणुकीतून लोकांनी मनसेला दाखवून दिले आहे. ‘नाशिक पॅटर्न‘मधून थापा मारण्याचा प्रयोग फसला आहे. आगामी नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये काय होईल, हे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. - अजय बोरस्ते, शिवसेना

गुरुवार, 29 अक्टूबर 2015

केडीएमसीच्या नवनिर्माणाची संधी द्या - राज ठाकरे

कल्याण - नाशिकमध्ये करून दाखवले आता कल्याण-डोंबिवलीचे नवनिर्माण करण्याची संधी द्या, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी (ता. 28) येथे केले. साई चौकातील सभेत नाशिकच्या विकासाचा लेखाजोखा त्यांनी मांडला.
नाशिकचा विकास कुंभमेळ्यामुळे झाला. मनसेचे त्यात कर्तृत्व नाही, अशी टीका विरोधक करत असल्याने राज यांनी महापालिकेने शहराचा कसा विकास केला याचे सादरीकरण केले. तेथे जे नव्हते ते करून दाखवले. इथे मात्र होत्याचे नव्हते केले, अशी टीका त्यांनी शिवसेनेचे नाव न घेता केली. नाशिक महापालिकेत सत्ता मिळाल्यानंतर 11 महिने आयुक्त नव्हते किंवा काहीकाळ सक्षम आयुक्त नव्हते. त्यामुळे 33 महिन्यांत मनसेने काय काय केले याची झलक सादर करतोय, असे ठाकरे म्हणाले. शहरातील रस्ते, गोदा नदीवरील पूल आणि गोदापार्क अशा अनेक प्रकल्पांचे फोटो त्यांनी दाखवले. ही सर्व कामे राज्यात भाजपचे सरकार येण्यापूर्वी सुरू केल्याचे त्यांनी तारीखवार सांगितले.

सामान्य नागरिकांचा विचार करून महापालिकेने केलेल्या कामांचा आढावा त्यांनी घेतला. तेथे 33 महिन्यांत जे केले ते इथे करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. या कामांसाठी अनेक उद्योजक पुढे आले. त्यांनी सढळ निधी दिला. राज्यकर्त्याची इच्छाशक्ती प्रामाणिक असेल तर असे हात पुढे येतात; मात्र कल्याण-डोंबिवलीमध्ये 20 वर्षे सत्ता हातात असतानाही या शहरात काहीच करता न आल्याने आज पुन्हा बाळासाहेबांच्या नावाने मते मागावी लागत असल्याबाबत त्यांनी खेद व्यक्त केला.
विधानसभेतील पराभवाने खचलो नसल्याचे सांगताना असे पराभव पाहतच लहानाचा मोठा झालोय, असे त्यांनी सांगितले. संघाच्या स्थापनेनंतर पक्षाला बहुमत मिळण्यासाठी किती वर्ष वाट पाहावी लागली ते पाहा, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. मला लोकांशी प्रतारणा करायची नाही. एकदा विश्‍वास ठेवून पाहा तुम्ही विचार केला नसेल इतकी चांगली कामे करून दाखवीन, असे आश्‍वासन त्यांनी नागरिकांना दिले