गुरुवार, 2 मार्च 2017

मनसे पुन्हा आळवणार मराठीचा सूर - विकासकामांची चर्चा करुनही मते मिळत नाही.

मुंबई- महानगरपालिकेच्या निवडणुकीत केवळ 7 नगरसेवक निवडून आणण्यात 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'ला (मनसे) यश आले आहे. या सुमार कामगिरीनंतर पुन्हा एकदा संघटनेला नवी उर्जा देण्याचा मनसेचा मानस आहे. त्यासाठी मराठी अस्मितेच्या शिळ्याच कढीला नव्याने ऊत आणण्याच्या प्रयत्न पक्षाकडून सुरु आहे. रेल्वे तिकीट आणि वीजबिलावर छापण्यात आलेल्या गुजराथी भाषेतील मजकुराच्या निमित्ताने मराठीला वाचविण्यासाठी आगामी काळात मनसे तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
राजकीय महत्वाकांक्षेतून जन्माला आलेल्या मनसेने सुरुवातीपासूनच भाषिक अस्मितेचा मुद्दा लावून धरला. परप्रंतीयांना केलेली मारहाण, दुकानांवर मराठी पाट्यांसाठी धरलेला आग्रह अशा अनेक आंदोलनांतून मनसेने लोकप्रियता मिळविली होती. गेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये या लोकप्रियतेच्या जोरावर पक्षाला चांगले यशही मिळाले. मात्र, त्यानंतरच्या काळात ठोस कार्यक्रम राबविण्यात आलेले अपयश आणि सामान्यांशी तुटलेली नाळ यामुळे मनसेची अवस्था केविलवाणी झाली.
2014 च्या विधानसभा निवडणुका आणि नुकत्याच झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेला चांगलाच धक्का बसला. या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीआधी स्वतः निवडणुक लढविण्याचे जाहिर केले होते. मात्र, मिळालेल्या थंड प्रतिसादामुळे राज ठाकरेंनी तो मुद्दा गुंडाळला. यंदाच्या पालिका निवडणुकांमध्ये विकासकामांबाबत चर्चा करुन मनसेने पुन्हा आपला पिंड बदलण्याचा प्रयत्न केला. तरीही नाशिक महानगरपालिकेतील सत्तेतून मनसेला पायउतार व्हावे लागले आणि मुंबईत नगरसेवकांचा आकडा 27 वरुन 7 वर घसरला.
त्यामुळे विकासकामांची चर्चा करुनही आपली डाळ शिजत नसल्याचे मनसेच्या लक्षात आले आहे. म्हणूनच पुन्हा एकदा मराठी अस्मितेचा झेंडा खांद्यावर घेतच 'मनसे स्टाईल' आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहे. पश्‍चिम उपनगरातील बोरिवलीतील मनसे उपाध्यक्ष नयन कदम यांनी गुजराथी भाषेत वीजबील पाठविल्याबद्दल 'रिलायन्स एनर्जी'ला पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. तसेच भविष्यात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. आता हाच मुद्दा घेऊन मनसे पुन्हा नव्याने 'खळ खट्याक' आंदोलनाच्या तयारीत असल्याची माहिती मनसेच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात येत आहे.

शनिवार, 25 फ़रवरी 2017

राज ठाकरे यांचे तुर्तास मौन

मुंबई - मुंबई महापालिकेतील मनसेचे कलिना येथील प्रभाग क्रमाकं 166 चे विजयी उमेदवार संजय तुरडे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात गेलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी सकाळी माध्यमांशी बोलायचे टाळले. राजाला साथ द्या, असे आवाहन जनतेला करुनही मनसेला नाशिकसह राज्यातील महापालिका निवडणुकीत दारुण पराभव सहन करावा लागला. निकालानंतर राज यांनी माध्यमांपासून दूर राहणे पसंत केले.
भाजपाच्या पराभुत उमेदवारांकडून मारहाण झालेल्या जखमी मनसे उमेदवारांना भेटल्यानंतर राज ठाकरे हे काय बोलणार याकडे लक्ष लागले होते. परंतु. त्यांनी कोणतेही प्रतिक्रिया दिलेली नाही. तुर्तास तरी राज ठाकरे यांनी मौन घेतलेले दिसते. भाजपाचे उमेदवार सुधीर खातू यांच्या समर्थकांनी 23 फेब्रुवारीच्या रात्री तुरडे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात मनसेचे 10 ते 12 पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली होती. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तुरडे यांना राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तुरडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद मुंबईभर उमटले होते. या हल्ल्यानंतर भाजपाबाबतही मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली होती. राज ठाकरे यांनी संजय तुरडे आणि कुटुंबियांची भेट घेतली. मनसेचे नेते बाळा नांदगांवकर, नितीन सरदेसाई हे त्यांच्यासोबत होते. तरडे यांच्या आपण पाठिशी असल्याचे बाळा नांदगांवकर यांनी स्पष्ट केले.
राज्यातील नाशिक, पुणे, मुंबईसह महापालिकेत मनसेच्या पदरी अपयश पडल्यानंतर राज हे कृष्णकुंज बाहेर पडल्यामुळे ते आपली प्रतिक्रिया देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु नाशिक महापालिकेत झालेल्या दारुण पराभवामुळे मनसेला मोठा धक्का बसला आहे. नाशिक महापालिकेत सत्तेवर असलेल्या मनसेला केवळ पाच जागांवर यश मिळाले तर मुंबई 7, उल्हासनगर 2 आणि पुणे 1 असे 15 मनसेचे नगरसेवक निवडून आले आहेत. नाशिक महापालिकेत केलेल्या कामाच्या बळावर मनसेने अन्य महापालिकेत पक्षाला मतदान करावे असे आवाहन केले होते. परंतु, मनसेला मतदारांनी नाकारले. मुंबई महापालिकेत मनसेला 7 जागा मिळाल्या आहेत. 227 जागा असलेल्या महापालिकेत शिवसेना किंवा भाजपाला बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेत मनसे कोणाला साथ देणार याकडे लक्ष लागलेले आहे.

गुरुवार, 16 फ़रवरी 2017

Full Video - राज ठाकरे, पुणे संपुर्ण भाषण : 25 वर्ष काय केलंत?गोट्या खेळलात

राज ठाकरेंची पुण्यात रेकॉर्डब्रेक सभा | शिवसेना-भाजप वर तुफान हल्लाबोल
राज ठाकरे पुणे संपुर्ण भाषण : 25 वर्ष काय केलंत?गोट्या खेळलात ! 

मंगलवार, 14 फ़रवरी 2017

सेना-भाजपने सत्ता असून काय केलं : राज ठाकरे



मुंबई- आता आम्ही हे करू, ते करू असं सांगत आहेत. परंतु आतापर्यंत सत्ताधारी शिवसेनेने पाचवेळा मुंबई महापालिकेमध्ये सत्ता उपभोगली. इतकी वर्षे त्यांनी काय केलं ते सांगा, असे आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले.

मुंबई महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत राज यांनी पहिलीच प्रचारसभा घेतली. आपला मुलगा रुग्णालयात होता, त्यामुळे मी मैदानात लवकर उतरू शकलो नाही, असे त्यांनी स्पष्ट करीत सत्ताधारी युती सरकारमधील पक्षांवर जोरदार टीकास्त्र सोडले.
मुंबईतील भ्रष्टाचाराबद्दल भाजपवाले शिवसेनेवर टीका करीत आहेत. परंतु मागील 25 वर्षे ते शिवसेनेसोबत महापालिकेत सत्तेत आहेत. त्यांनीही भ्रष्टाचार केलाच ना, असा सवाल राज यांनी उपस्थित केला.
नवा भारत कुठे आहे?
पाच राज्यांमध्ये 3365 एवढे उमेदवार आहेत. भाजपने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला एक कोटी रुपये दिले होते असे एका भाजप नेत्यानेच मला सांगितले. आता उत्तर प्रदेशात भाजपचे 400 उमेदवार आहेत. तिथे भाजप, सप-काँग्रेस, बसप यांनी प्रत्येकी 400 कोटी रुपये खर्च केले तर एकूण 1200 कोटी रुपये असेच तिथे रोख खर्च होणार आहेत. मग, कुठे आहे कॅशलेस इंडिया, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
नोटाबंदी करताना फार आवेशाने सांगितले जात होते की तुम्हाला नवा भारत दिसेल. कुठे आहे तो नवा भारत? त्याच पद्धतीने कारभार चालू आहे.
मुंबईत केवळ खड्डे बुजविण्यासाठी दरवर्षी शंभर कोटी रुपयांचे टेंडर काढले जाते. त्यामध्येही भ्रष्टाचार करण्यात येतो.
काही वर्षांपूर्वी मला नाशिकमध्ये काय केलं असा प्रश्न विचारत होते. आता का विचारत नाहीत. कारण, तिथे आम्ही केलेलं काम दिसत आहे. पुढील 40 वर्षे नाशिक शहराला पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही.
बाळासाहेबांचे स्मारक उभे केले. गोदावरी नदीवरील कारंजा, बोटॅनिकल गार्डन पाहा. तिथे 50 ते 60 हजार लोकांनी भेटी दिल्या. मुंबईतही असं गार्डन नाही, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

गुरुवार, 2 फ़रवरी 2017

फेकू मोदींचा मुंबई तोडण्याचा डाव : राज ठाकरे

मुंबई - भारतीय जनता पक्षाचा मुंबई तोडण्याचा डाव हाणून पाडावा यासाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी मी हात पुढे केला होता. मुंबई ही मराठी माणसांची राहावी. मराठी मतांमध्ये दुफळी नसावी, यासाठीच सात वेळा मातोश्रीवर दूरध्वनी केला होता. मराठी माणसांसाठी कुणाचेही पाय चाटण्यास तयार आहे; मात्र मुंबई व मराठी माणूस कोणी तोडत असेल तर तेच पाय छाटण्यासही मागेपुढे पाहणार नाही. अशा आवेशात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पालिका निवडणूक प्रचाराच्या पहिल्याच कार्यकर्ता मेळाव्यात मनसेची भूमिका स्पष्ट केली.

दादर येथे ते बोलत होते. शिवसेनेसोबत युतीसाठी प्रयत्न केले यामागची भूमिका स्पष्ट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षावर त्यांनी सडेतोड हल्लाबोल केला.
भारतीय जनता पक्षाची सत्ता मुंबईत नको, म्हणून शिवसेनेसोबत युतीसाठी प्रयत्न केला, पण मातोश्रीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही असे सांगून आता मराठी माणसांनी एकत्र येऊन थापा मारणाऱ्या भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. "थापा म्हणजेच भाजपा' अशा शब्दांत राज यांनी टीका केली.
भारतीय जनता पक्षाच्या डोक्‍यात अनेक गोष्टी वळवळत असून, पहिल्यांदा विदर्भ महाराष्ट्रापासून बाजूला करण्याचा त्यांचा डाव आहे. त्यानंतर मुंबईदेखील महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची खेळी खेळत असल्याचा आरोप त्यांनी केला. यासाठीच मुंबई ते अहमदाबाद अशी बुलेट ट्रेन सुरू करण्याचे भाजपचे षड्‌यंत्र असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
नोटाबंदीनंतर सर्वाधिक पैसा भाजपकडे कसा आला, असा सवाल करत राज म्हणाले, की आता याच पैशांच्या जोरावर ते निवडणुका लढवतील. पाच राज्यांच्या निवडणुकांत भाजप कुठून पैसा आणतो ते आता सर्वांनाच दिसेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
पारदर्शकता व उत्तम प्रशासन काय असते ते नाशिक महानगरपालिकेचा कारभार पाहून लक्षात घ्या, असे आवाहन करताना मुंबईत भाजप-शिवसेना युतीला जे 25 वर्षांत जमले नाही ते मी नाशिकमध्ये पाच वर्षांत करून दाखवले, असा दावा त्यांनी केला. राज यांनी या वेळी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. शिवसेनेला केंद्र व राज्याच्या सत्तेतून बाहेर पडायचे नाही. मुंबईवर त्यांना सत्ता हवी आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र राहून परस्परांवर कठोर टीका करत जनतेची दिशाभूल करत आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत ते स्पष्ट झालेच आहे. असा दाखला देत राज यांनी भाजप व शिवसेना यांच्यात मॅच फिक्‍सिंगचा खेळ असल्याची टीका केली.
शिवसेनेला बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या नावाखाली महापौर बंगल्याची जागा बळकावायची असल्याचा आरोपदेखील राज यांनी केला.
राज म्हणाले..
. मुंबई तोडण्याचा भाजपचा डाव
. थापा म्हणजेच भाजपा
. मोदींची जगभरात फेकू अशी प्रतिमा
. माझ्यासाठी युतीचा विषय संपला