सोमवार, 11 जनवरी 2010

राज ठाकरे ठरले 'युथ आयकॉन'

Tuesday, January 12, 2010 AT 01:05 AM (IST)


'ई सकाळ' आणि '५४३२१ एसएमएस सेवा' यांनी घेतलेल्या 'सांगा तुमच्या मनातील युथ आयकॉन' उपक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना सर्वाधिक ५६ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. त्याखालोखाल २६/११ च्या मुंबई हल्ल्यावेळी शौर्य बजावणारे पोलीस अधिकारी विश्‍वास नांगरे-पाटील यांचे नाव 'युथ आयकॉन' म्हणून ऑनलाईन वाचकांनी आणि तरूणाईने 'एसएमएस'द्वारे सुचविले आहे. आज (१२ जानेवारी) युवा दिन. त्यानिमित्त आपल्या मनातील युथ आयकॉन कळविण्याचे आवाहन गेल्या आठवड्यात 'ई सकाळ'ने वाचकांना केले होते.

'ई सकाळ'वरील आवाहनाला जगभरातून वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. कोणतेही विशिष्ट नाव समोर न ठेवता ऑनलाईन वाचकांना त्यांच्या दृष्टिने कोण 'युथ आयकॉन' वाटतो, हे सांगण्यास सुचविले होते. त्यातून या आवाहनावर जगभरातून सुमारे दीड हजार प्रतिक्रिया वाचकांनी 'ई सकाळ'वर पोस्ट केल्या. या प्रतिक्रियांमधून वाचकांनी सर्वाधिक संख्येने निवडलेल्या नावांवर '५४३२१ एसएमएस' सेवेमार्फत मतचाचणी घेण्यात आली. या दोन्ही प्रक्रियांमधून तरूणाईने त्यांच्या मनातील 'युथ आयकॉन'वर शिक्कामोर्तब केले. ठाकरे, नांगरे पाटील यांच्यासह क्रिकेटचा बादशाह सचिन तेंडूलकर, अभिनेता अमीर खान, माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, कॉंग्रेसचे युवा नेते राहूल गांधी, समाजसेवक प्रकाश आमटे, 'इन्फोसिस'चे संस्थापक नारायण मूर्ती, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन गडकरी अशी एकूण दहा नावे 'युथ आयकॉन' म्हणून वाचकांनी सुचविली होती.

1 टिप्पणी: