सकाळ वृत्तसेवा
Thursday, January 14, 2010 AT 01:17 AM (IST)
पुणे - ''मराठी भाषा हीच जगाच्या पाठीवर आपली ओळख आहे आणि माझा लढा हा भाषेसाठीच आहे. रिक्षाचालक, भाजी विक्रेता किंवा अन्य कोणीही असो; तुम्ही त्याच्याशी बोलताना मराठीतच सुरवात करा... तोसुद्धा नंतर मराठीत बोलू लागेल...!''
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिनानिमित्त प्रत्येक मराठी घरात अशा आशयाचे पत्र पाठविण्याचा संकल्प सोडला आहे. 'अक्षरधारा'च्या ३३९ व्या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन आणि आचार्य अत्रे यांच्या अग्रलेखांच्या 'हार आणि प्रहार' या पुस्तकाचे प्रकाशन ठाकरे यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, अप्पा परचुरे आणि रमेश राठिवडेकर या वेळी उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, ''माझा लढा मराठी भाषेसाठीच आहे. कारण "मराठी भाषा बोलतो, तो मराठी' हीच जगाच्या पाठीवरची आपली ओळख आहे आणि भाषाच आपल्याला जिवंत ठेवते. इतकी समृद्ध असलेली मराठी भाषा संपत चालली असेल, तर ती दुर्दैवी बाब आहे. ती पुढे नेणे, हे माझे कर्तव्य आहे. ते मी मनापासून करीत आहे. देश तुटावा असे माझ्या मनातही येणार नाही. पण महाराष्ट्र वाढवावा, हा माझा हट्ट आहे.''
ठाकरे म्हणाले, ''२७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिवस आहे. त्यानिमित्त प्रत्येक मराठी घरात पत्र पाठविणार आहे. भाजी खरेदी करताना, रिक्षात बसताना असे प्रत्येक ठिकाणी तुम्ही मराठीतूनच बोलण्यास सुरवात करा, मग तेसुद्धा मराठीतूनच बोलू लागतील. महाराष्ट्रात अशा सर्व ठिकाणी मराठीचा वापर होईपर्यंत माझा लढा सुरूच राहील. दाक्षिणात्य राज्ये असोत, की चीन-फ्रान्ससारखे देश; सगळेच आपल्या भाषेवर घट्ट असतात. खरे तर साहित्यिकांचे आणि माझे ध्येय एकच आहे. फक्त त्यांची आणि आमची भाषा वेगळी आहे. पण अनेकदा माझ्यावर चौफेर हल्ले होतात, तेव्हा "हे आपले मूल आहे,' असे समजून आमच्या चुका त्यांनी पोटात घ्याव्यात. "भारतमाता'सारखे चित्रपटगृह संकटात सापडते, तेव्हा सर्व कलाकार तेथे उभे राहतात. मग मुख्यमंत्र्यांनाही त्या प्रश्नाची सोडवणूक करावी लागते. त्याप्रमाणेच मराठीची गळचेपी होते, तेव्हा साहित्यिकांनी उघडपणे शक्य नसेल, तर दूरध्वनीवरून तरी आधार द्यावा.''
आचार्य अत्रे यांनी प्रत्येक क्षेत्रात जो पराक्रम गाजविला, तेवढा अन्य कोणत्याही साहित्यिकास जमलेला नाही. महाराष्ट्र आणि मराठी भाषेवर विलक्षण प्रेम करणारे ते जनतेचे वक्ते आणि जनतेचे साहित्यिक होते, असे मिरासदार यांनी सांगितले. लक्ष्मण राठिवडेकर यांनी आभार मानले. समीरण वाळवेकर यांनी सूत्रसंचालन केले.
raj thakre desh todayla nighelenahit bagha
जवाब देंहटाएं