कणकवली - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आज सकाळी साडेअकरा वाजता येथे जल्लोषी स्वागत करण्यात आले. कणकवली, देवगड, वैभववाडी येथील कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून तसेच ढोल-ताशांच्या दणदणाटात स्वागत केले. तत्पूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांनी येथील पटवर्धन चौकापासून शासकीय विश्रामगृहापर्यंत मिरवणूकही काढली.
मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरे प्रथमच येथे येत असल्याने मनसे कार्यकर्त्यांबरोबरच शहरवासीयांमध्येही उत्सुकता होती. सकाळी नऊपासूनच शासकीय विश्रामगृह येथे देवगड, कणकवली आणि वैभववाडीतील मनसे कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. शहरात वातावरणनिर्मितीसाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी अप्पासाहेब पटवर्धन चौक ते शासकीय विश्रामगृह अशी ढोल-ताशांच्या दणदणाटात मिरवणूकही काढली. मनसे कार्यकर्त्यांच्या गाड्यांचा ताफाही यात समाविष्ट होता. मालवण येथून निघालेले राज ठाकरे शासकीय विश्रामगृहावर साडेअकरा वाजता आले. या वेळी त्यांच्याभोवती कार्यकर्त्यांचा गराडा पडला. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर फटाक्यांची आतषबाजीही झाली. "राज ठाकरे झिंदाबाद।।'च्या घोषणाही कार्यकर्त्यांनी दिल्या. मनसेचे कोकण संपर्कनेते शिरीष सावंत, संपर्कप्रमुख उदय सावंत, जिल्हाध्यक्ष राजन दाभोळकर, सहसंपर्कप्रमुख गुरुदत्त काडगे, विजयानंद पेडणेकर, सुधीर जाधव आदींनी श्री. ठाकरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी श्री. ठाकरे यांचे आरती ओवाळून स्वागत केले. त्या नंतर कार्यकर्त्यांच्या अभिवादनाचा स्वीकार करीत श्री. ठाकरे यांनी तडक शासकीय विश्रामगृह गाठले. दरम्यान, राजना पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनीही शासकीय विश्रामगृहावर गर्दी केली होती.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें