‘इंच.इंच विकू हाच राष्ट्रवादीचा अजेंडा’
महापालिका म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण आणि टेंडर, कंत्राटे काढण्याची आगारे बनत चालली आहेत. पाच वर्षे कसेही वागलो, तरी पैसा फेकून, दारु पाजून निवडणुका जिंकता येतात, अशा गुर्मीत सध्या काही पक्ष वागत आहेत. नवी मुंबईत तर खारफुटी कापून त्यावर मोठ-मोठय़ा इमारती उभ्या रहात आहेत. येथील डोंगर पोखरुन दगडखाणी तेजीत आहेत. महापालिका खरवडली जात आहे. ‘इंच इंच विकू’ असा विडाच राष्ट्रवादी कॉग्रेसने उचलला असून जे समोर दिसेल ते विकण्याचा धंदा या पक्षाचे सुरु केला आहे, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नेरुळ येथे केली. नवी मुंबईकरांनी मला एकदा आजमावून बघावे नाशिक शहराप्रमाणे नवी मुंबईच्या विकास प्रक्रियेत मी जातीने लक्ष घालेन, असे आवाहनही राज यांनी यावेळी नवी मुंबईकरांना केले.
महापालिका निवडणुकांच्या प्रचारानिमीत्त नेरुळ येथील रामलिला मैदानात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका भव्य प्रचार सभेत राज यांनी आपल्या नैहमीच्या शैलीत मुख्यमंत्री अशोक चव्हाणांपासून शरद पवारांपर्यंत कॉग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जोरदार टिका केली. भाषणाच्या सुरुवातीलाच राज यांनी राष्ट्रवादीने नवी मुंबईचा जो जोहीरनामा प्रसिद्ध केला आहे, त्यावर शरद पवारांच्या छायाचित्रामागील जी गर्दी दिसते, ती मनसेच्या शिवाजी पार्क येथे झालेल्या सभेची आहे, असे सांगत या जाहीरनाम्याची खिल्ली उडवली. यानंतर राज्य सरकारच्या धोरणावर त्यांनी जोरदार प्रहार केले. कॉग्रेस-राष्ट्रवादीच्या नाकार्त्यां सरकारमुळे मागून आलेली राज्य आज महाराष्ट्राच्या पुढे जाऊ लागली आहेत. टाटांचे मुख्यालय मुंबईत आहे, पण बंगालमधून बाहेर पडलेला नॅनो प्रकल्प गुजरातमध्ये जातो. या बावळटांना (राज्य सरकारला) तो राज्यात आणता आला नाही. बीएमडब्लू सारखी मोठी मोटार कंपनी महाराष्ट्रात प्रकल्प उभा करु पहात होती. परंतु, राज्य सरकारने न-न्नाचा पाढा वाचल्याने हा प्रकल्पही तमिळनाडूत गेला. मुंबईतील एका मोठय़ा गुजराथी बांधवाला पनवेलजवळ मोठे विद्यापीठ उभारायचे होते. दोन वर्षे सतत पाठपुरावा करुनही त्याला परवानगी दिली गेली नाही. नरेंद्र मोदींनी एके दिवशी त्याला फोन करुन गुजरातमध्ये येण्याचे आमंत्रण दिले. स्वतच्या देशाबद्दल, राज्याबद्दल प्रेम असेल, तर विकास होत असतो. परंतु, महाराष्ट्रातील राजकर्त्यांनी हितसंबंधाच्या राजकारणात विकासाचा बट्टयाबोळ केला, अशी टीका राज यांनी यावेळी केली. यावेळी मुख्यमंत्री अशोक चव्हाण तसेच जलसंपदा मंत्री अजितदादा पवार यांच्यावरही राज बरसले. तुम्ही मला महापौर द्या मी तुम्हाला एफएसआय देतो, अशी घोषणा परवा मुख्यमंत्र्यांनी केली. औरंगाबाद येथे अजित पवार यांनीही आम्हाला सत्ता द्या, २४ तास पाणी देतो, असे आश्वासन दिले. यांना सत्ता दिली नाही, तर मुख्यमंत्री एफएसआयच्या फायलीवर सही करणार नाहीत. २४ तास पाणी देतो असे म्हणता, म्हणजे पाणी आहे. सत्ता दिली मगच हे पाणी देणार, नाही तर तुम्हाला पाण्यावाचून ठेवणार. याला कसला विकास म्हणायचा, असा थेट सवालही राज यांनी उपस्थित केला. गणेश नाईक म्हणतात, झाडे कशाला वाचवायची. नवी मुंबईसारख्या शहरात एकही विद्युत दाहिनी नाही. तेथे आजही स्मशाणात लाकडे वापरतात. असले नेते काय कामाचे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें