इतर भाषांबद्दल आकस नाही : राज ठाकरे
केदार लेले/कीर्तीमालिनी गद्रे
Saturday, July 24, 2010 AT 11:43 AM (IST)
झुरीच (स्वित्झर्लंड) येथे शुक्रवारी युरोपीय मराठी संमेलनाचे उद््घाटन झाले. या सोहळ्यासाठी खास उपस्थित (डावीकडून) मंदा आमटे, प्रख्यात समाजसेवक प्रकाश आमटे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर.
झ्युरीक (स्वित्झर्लंड) - 'इतर प्रांत; भाषांविषयी माझ्या मनात अजिबात राग नाही', अशी भूमिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शुक्रवारी घेतली. युरोपीयन मराठी संमेलनाच्या उद््घाटन सोहळ्यात ते बोलत होते. प्रख्यात समाजसेवक प्रकाश आमटे, मंदा आमटे, महान क्रिकेटपटू सुनिल गावस्कर यांच्या उपस्थित स्वित्झर्लंडच्या आर्थिक राजधानीत हा सोहळा पार पडला. 'इथंली माती; आपली माणसं' अशी २५ जुलैपर्यंत चालणाऱया यंदाच्या संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना आहे.
राज यांच्या भाषणाबद्दल युरोपीय मराठी समुदायात उत्सुकता होती. आटोपशीर भाषणात राज यांनी त्यांची निर्भिड शैली तर दाखवलीच; शिवाय मराठी समुदायाची मनेही जिंकली.
'मला हिंदीच काय कोणत्याही भाषेबद्दल राग नाही,' असे सांगून राज म्हणाले, 'उलट माझे तर मत आहे की मराठी व्यतिरिक्त इतर भाषाही मराठी माणसाला यायलाच हव्यात. माझा विरोध आहे, तो मुंबईत जाणिवपूर्वक लोंढे आणण्याला. असे कोणी करत असेल, तर माझा ठाम विरोध आहे आणि राहिल.'
'मी जे बोलतो ते युरोप समजू शकतो', अशी सुरूवात करून त्यांनी भारत आणि युरोपमधील साम्य स्पष्ट केले. ते म्हणाले, 'या भारतात आणि युरोपात खूप साम्य आहे. भारतात जशी अनेक राज्ये आहेत, तसेच युरोपात आहे. भारतात जसे एकाच चलनाने ही राज्ये जोडली गेली आहेत; तशीच स्थिती युरोमुळे युरोपात आहे. युरोपातील चांगल्या गोष्टी जरूर स्विकारा. त्याचवेळी आपली संस्कृतीही टिकवून ठेवा.'
युरोपमध्ये राहणा-या मराठी माणसांना एकत्र आणणे आणि युरोपात वाढणा-या नव्या पिढीला मराठी संस्कृतीची ओळख व्हावी, यासाठी हा सोहळा आयोजित केला आहे. संमेलनात विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम होत आहेत. कार्यक्रमाची सुरुवात गणेश पूजन व नांदीने झाली. अतिशय सुरेल नांदी इंग्लंडच्या 'महफिल' समुहाने सदर केली. दोन स्विस मराठी मुलांनी सरस्वती पूजन केले. त्यानंतर पाहुण्यांची व युरोपीयन मराठी संमेलनाच्या कार्यकारिणी समितीची ओळख करून देण्यात आली. श्री. गावस्कर यांच्या हस्ते 'सेतू' या स्मरणिकेचे प्रकाशन झाले.
स्वित्झर्लंडमधील वेळेनुसार दुपारी २ ते ४ च्या दरम्यान शिस्तबद्ध वातावरणात नाव नोंदणीचा कार्यक्रम पार पडला.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें