ते भेटले की क्रांती, आम्ही भेटलो की डील? सकाळ वृत्तसेवा Thursday, October 28, 2010 AT 12:15 AM (IST) डोंबिवली - 'जनतेच्या कामासाठी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, की युतीचे नेते आघाडीशी आतून समझोता झाल्याची टीका करतात. ते भेटले, की क्रांती आणि आम्ही भेटलो की डील? आमच्यावर अशी टीका करणारी शिवसेना-भाजप युती निवडणुका लढवितेच कशाला? त्यांनी निवडणुका लढवू नयेत,'' असे सडेतोड उत्तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी युतीच्या नेत्यांना दिले. 'ठाकरे घराण्यातील भांडणे कल्याण-डोंबिवलीच्या निवडणूक रिंगणात कशाला?'' अशी ओरड आघाडीच्या नेत्यांनी सुरू केली आहे. त्यावर राज ठाकरे म्हणाले, 'आधी त्यांनी त्यांचे धोतर सांभाळावे. मग आमच्या वादाविषयी बोलावे. दोन महिने मी काहीच बोललो नव्हतो, तेव्हा काहीच बोलत नाही, अशी टीका सुरू होती. आता तोंड उघडले, की म्हणतात, "पेटवतो'.'' "दोन ठाकरेंमधील वादामुळे मराठी मतांचे विभाजन होत नाही का' असा प्रश्न विचारला असता, 'कॉंग्रेस-राष्ट्रवादीला काय कानडी माणूस मतदान करतो का? हे प्रश्न मराठी माणसाला विचारले गेलेच पाहिजेत. कारण मतदान तो करणार आहे.'' कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीचा मनसेचा वचकनामा राज ठाकरे यांच्या हस्ते डोंबिवली पूर्वेतील हेरिटेज हॉलमध्ये प्रकाशित करण्यात आला. याप्रसंगी मनसेचे आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, रमेश पाटील, शिशिर शिंदे, राजन गावंड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे बोलत होते. ""गेली साडे बारा वर्षे सत्तेत असलेली युती राज्य सरकारने सापत्न वागणूक दिली, शहर विकासाला निधी दिला नाही,'' असा प्रचार करीत आहे. त्यावर ""राज्य शासन कामे अडवून ठेवत असेल आणि निधी देत नसेल; तर शिवसेना-भाजप युती निवडणुका लढवितेच कशाला. नका लढवू निवडणुका,'' असा टोला ठाकरे यांनी दिला. 'शिवसेनाप्रमुखांनी नऊ वर्षांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्याध्यक्षपदाच्या नेमणुकीचा मुद्दा उकरून काढला आहे. एकच मुद्दा किती वेळा बोलणार आहात, असे सांगत डोंबिवलीतील प्रचारसभेत भाषणाच्या सुरुवातीला मी "कॉपी'च्या आणि उद्धवच्या नेमणुकीच्या मुद्द्याला उत्तर दिले; बाकीचे सगळे भाषण हे कल्याण-डोंबिवली शहरातील समस्यांशी निगडित होते. पेपरवाल्यांनी ते प्रसिद्ध न करता नेमका हाच मुद्दा उचलून धरला. तसेच खोबरे नसलेल्या करवंट्या आणि शेंदूर फासलेले दगड, असे विधान शिवसेनाप्रमुखांच्या आजूबाजुला असलेल्या लोकांविषयी केले होते,'' याकडे राज यांनी लक्ष वेधले. "माय नेम इज खान' या चित्रपटाला विरोध करून त्यानंतर त्याच चित्रपटाची जाहिरात शिवसेनेच्या मुखपत्रात छापण्यात आली. ही जाहिरात मागितलेली होती. आता ते म्हणतील, की जाहिरात त्यांनी (शाहरूखच्या कंपनीने) पाठविली होती. पण मग ती नाकारण्याचा अधिकार होता ना,'' असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आणि अप्रत्यक्षरित्या आंदोलनासाठी लाठ्या खाणाऱ्या शिवसैनिकांवर अन्याय झाल्याची बाजू मांडली. राज ठाकरे यांनीच महाबळेश्वर येथे उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्षपदी निवडल्याची चित्रफीत शिवसेना प्रचारात दाखविणार आहे, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता, ती काय ऍडल्ट फिल्म आहे का? असे सांगत राज ठाकरे यांनी ही फिल्म दाखवून काय साध्य होणार, असा प्रतिप्रश्न केला. कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक मला अन्य कोणत्याही मुद्द्याभोवती फिरवायची नसून जनतेच्या प्रश्नाभोवतीच ठेवायची आहे. नागरिकांच्या प्रश्नांशी संबंधित असलेल्या मुद्द्यांवरच मनसे निवडणूक लढवित असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आणि यापुढील सभांत याच मुद्द्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगितले. | स |
गुरुवार, 28 अक्टूबर 2010
ते भेटले की क्रांती, आम्ही भेटलो की डील?
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें