शुक्रवार, 31 दिसंबर 2010

वाढदिवसाचे होर्डिंग लावू नयेत - राज ठाकरे

वाढदिवसाचे होर्डिंग लावू नयेत - राज ठाकरे
सकाळ वृत्तसेवा
Saturday, January 01, 2011 AT 12:30 AM (IST)


मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 2011 या नवीन वर्षासाठी नवा संकल्प सोडला आहे. मनसेच्या कोणत्याही कार्यकर्त्याने स्वतःच्या वाढदिवसाचे होर्डिंग, बॅनर कुठेही लावू नयेत; अन्यथा त्याच्याविरुद्ध पक्षांतर्गत कारवाई करण्यात येईल. आपल्याही वाढदिवसाचे एकही होर्डिंग कुणी लावू नये, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिले.

नवीन वर्षाचा नवा संकल्प मांडताना राज यांनी होर्डिंगबाबत सूचना केल्या आहेत. मनसेच्या वरपासून खालपर्यंतच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी आपल्या सहीचे पत्र दोन-तीन दिवसांत मिळेलच. शहराचे विद्रुपीकरण वाढत चालत आहे. रस्त्यात जागाजोगी होर्डिंगबाजी दिसून येते. शहराला होर्डिंगपासून वाचविण्यासाठी हा आपला नवा संकल्प आहे, याची प्रत्येकाने काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. वाढदिवसाची होर्डिंग चुकूनही लागता कामा नयेत, असे स्पष्ट करतानाच राज म्हणाले, की माहीत नव्हते, विसरलो, अशा फुटकळ सबबी आपण ऐकून घेणार नाही. एखाद्या समाजोपयोगी घटनेचे वा उपक्रमांचे होर्डिंग फक्त एकच दिवस लावता येईल; मात्र तो दिवस झाल्यानंतर तातडीने ज्यांनी हे होर्डिंग वा बॅनर लावला आहे, त्याने तो उतरविला पाहिजे. शहर स्वच्छ ठेवणे हे प्रत्येकाचे काम आहे. त्यामुळे मनसेच्या प्रत्येक कार्यकर्त्याने स्वच्छतेचे आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
समाजोपयोगी व एखाद्या उपक्रमाचे होर्डिंग लावताना विविध ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या महापुरुांचे पुतळे अथवा फोटोंआड कुठलेही होर्डिंग येणार नाही याची दक्षता घ्या, शहरात कुठेही बकालपणा करू नका, अशा सूचना देताना राज म्हणाले, की शाळा, रुग्णालये, ट्रॅफिक सिग्नल अशा ठिकाणी मनसेचे एकही होर्डिंग वा बॅनर लागता कामा नये. एवढे सांगूनही जर कोणी असा पराक्रम केला, तर त्याच्यावर पक्षातंर्गत कठोर कारवाई केली जाईल.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें